Sambhajiraje Chhatrapati Latest Marathi News, Kolhapur Latest Marathi News  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

काँग्रेस प्रवेशाची ऑफर : संभाजीराजेंनी घेतला मोठा निर्णय; १२ मे रोजी करणार घोषणा

Satej Patil | Congress | Yuvraj Sambhajiraje Chhatrapati : तीन दिवसांपूर्वीच मिळाले होते आमंत्रण

सरकारनामा ब्युरो

Sambhajiraje Chhatrapati News

कोल्हापूर : कोल्हापूरचे माजी खासदार संभाजीराजे छत्रपती (Chhatrapati Sambhajiraje) यांची राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा खासदारकीची मुदत तीन मे रोजी संपली आहे. त्यानंतर नुकतेच त्यांनी नवी आपण राजकारणात उतरणार असून लवकरच आपली राजकीय भूमिका जाहीर करणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यावरून ते कोणत्या राजकीय पक्षात जाणार की एकला चलो रे ची भूमिका घेणार याबाबत राजकीय वर्तूळात तर्कवितर्क लढवले जात होते. अशातच आज संभाजीराजे छत्रपती यांनी १२ मेे रोजी आपण पुण्यातून आपली पुढची भूमिका मांडणार असल्याचे स्पष्ट केले आहे. (Sambhajiraje Chhatrapati Latest Marathi News)

संभाजीराजे काँग्रेसमध्ये जाणार?

११ जून २०१६ ला केंद्र सरकारच्या शिफारशीवरून तत्कालीन राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी संभाजीराजे छत्रपती यांची खासदार म्हणून नियुक्ती केली होती. थेट शिवाजी महाराजांचे वंशज, राजर्षी शाहूंच्या विचारकार्याचे वारसदार व त्यांच्या स्वत:च्या व्यक्तिमत्वाचे राज्यभरातील मराठा समाजात असलेले वलय याची दखल घेऊन भाजपने त्यांना हा बहुमान दिला. मात्र या काळात ते कधीही पक्षीय चौकटीत अडकले नाहीत किंवा कोणत्याही निवडणुकीत ते भाजपला मते द्या म्हणून सांगायला गेले नाहीत.

आपल्याला मिळालेली खासदारकी ही भाजप सरकारने दिली असली तरीही तो शाहू घराण्याचा सन्मान म्हणून दिली असल्याची त्यांची भूमिका राहिली. त्यामुळे आगामी काळात भाजपकडून त्यांना पुन्हा संधी मिळणार नाही हे स्पष्ट आहे. अशातच मराठा आरक्षणाचा प्रलंबित विषय आणि मराठा समाजात त्यांच्याबद्दल असलेली क्रेझ यामुळे दोन्हीही काँग्रेस त्यांना आपल्यासोबत घेण्यासाठी उत्सुक आहे. याशिवाय त्यांची यापुढील राजकीय वाटचाल पुरोगामी विचारांच्या पक्षांसोबतच व्हावी, असा छत्रपती घराण्याचाही आग्रह असल्याचे सांगण्यात येत आहे.

सतेज पाटील यांच्याकडून संभाजीराजेंना निमंत्रण :

दरम्यान, काँग्रेस नेते, गृह राज्यमंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) यांनी तीन दिवसांपूर्वी संभाजीराजे यांना काँग्रेस पक्षात येण्याचे जाहीर निमंत्रण दिले आहे. पाटील यांनी संभाजीराजे काँग्रेसमध्ये (Congress) आले तर त्यांचे स्वागत केले जाईल. त्यांनी यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमधून निवडणूक लढवली आहे. मालोजीराजे छत्रपती यांनी काँग्रेसमधून आमदार म्हणून चांगले काम केले आहे. संभाजीराजे आपली पुढील भूमिका लवकरच स्पष्ट करणार असून त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. ते काँग्रेसमध्ये आले तर स्वागतच आहे, असे पाटील म्हणाले होते.

खासदार संभाजीराजे हे छत्रपती घराण्यातील आहेत. त्यामुळे त्यांनी आपल्या पक्षात प्रवेश करावा, असे प्रत्येकच राजकीय पक्षाला वाटते. पण त्यांच्याशी राजकीय चर्चा झाली नसल्याचे सतेज पाटील यांनी स्पष्ट केलं. मराठा आंदोलन, आरक्षण, सारथी अशा विविध प्रश्नांवर चर्चा झाली. ते छत्रपतींच्या घराण्यातील असल्याने ते आपल्या पक्षात यावेत, असे वाटण्यात गैर काहीच नाही, असे पाटील यांनी सांगितले होते. त्यानंतर ३ दिवसातच संभाजीराजे यांनी मोठा निर्णय घेतला असून त्याची घोषणा ते १२ मे रोजी पुण्यातून करणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT