Rajan Patil, Dhananjay Mahadik & Umesh Patil Latest News
Rajan Patil, Dhananjay Mahadik & Umesh Patil Latest News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

धनंजय महाडिकांच्या त्या इशाऱ्यानंतर राजन पाटलांची भाजप प्रवेशाची चर्चा

सरकारनामा ब्यूरो

मोहोळ : मोहोळ तालुक्याचे माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) व त्यांचे दोन सुपुत्र भाजपात (BJP) प्रवेश करण्याच्या चर्चेला गेल्या महिन्या भरापासून ऊत आला असून, राजन पाटील यांनी गेल्या दोन दिवसांपूर्वी दिल्लीत साखर कारखान्याच्या कामाच्या निमित्ताने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट घेतल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या घडामोडीकडे लागले आहे. मात्र हे पिता पुत्र भाजपात जाणार का हा प्रश्न अद्याप अधांतरीच आहे.

जिल्ह्यात सुमारे 34 साखर कारखाने आहेत, त्यातील बहुतांश साखर कारखाने विविध कारणाने आजारी आहेत. असे असताना त्यांच्या अध्यक्षांनी उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट घेणे स्वाभाविक आहे. राजन पाटील यांचा कारखाना राज्यातील नामांकित व सुस्थितीतील कारखान्यापैकी एक आहे असे असताना, राजन पाटील यांचेच कारखान्याच्या बाबतीत काय काम निघाले ज्यामुळे त्यांना दिल्लीत जावे लागले हा मुद्दा तालुक्यात चर्चेचा विषय ठरला आहे. (Rajan Patil, Dhananjay Mahadik & Umesh Patil Latest News)

मोहोळ तालुका हा पुरोगामी विचाराचा आहे. स्व. संभाजीराव गरड, स्व. बाबुराव पाटील, स्व. शहाजीराव पाटील यांनी त्या विचाराची पाठराखण केली आहे. राजन पाटील भाजपात गेले तर पुरोगामी विचाराचा मतदार त्यांच्याबरोबर जाणार का? खासदार शरद पवार यांना मानणाऱ्या नेत्यांचे काय? याचीही चर्चा चवीने चर्चिली जात आहे. पाटील हे भाजपात गेल्यानंतर त्यांच्या जाण्याने जी पोकळी निर्माण होणार आहे. ती पोकळी राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील, माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर, माजी उपसभापती मानाजी माने हे भरून काढतील यात शंका नाही.

तालुक्यातील युवक मतदारांना उमेश पाटील यांनी आपलेसे करण्यात यश मिळविले आहे. मात्र राजन पाटील व त्यांच्या सुपुत्रांच्या जाण्याने उमेश पाटील यांच्या नेतृत्वाची व्याप्ती वाढण्यास पोषक वातावरण तयार होणार आहे. गावोगावी पवारांना मानणारा मतदार आपसूकच विनासायास उमेश पाटील यांच्या हाती लागणार आहे. दरम्यान येत्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने कोण किती पाण्यात आहे हे समजून येणार आहे. राजन पाटील भाजपात गेले तर त्यांचा गट वेगळा असणार आहे. त्यामुळे जुन्या निष्ठावान भाजपाच्या कार्यकर्त्याचे काय? का ते मिळून एकत्र काम करणार हे येणारा काळ ठरविणार आहे. त्यांचे मनभेद आहेत मतभेद नाहीत, त्यामुळे पक्षश्रेष्ठी यावर काय मार्ग काढतात हे पाहणे तितकेच महत्त्वाचे आहे.

दरम्यान खासदार धनंजय महाडिक हे राज्यसभेवर निवडून गेल्याने त्यांचा टाकळी सिकंदर येथे भव्य नागरी सत्कार सोहळा आयोजित केला होता. त्या मेळाव्यात त्यांनी "या अगोदर आम्हाला खूप त्रास दिला आहे, मी आता सत्तेत आहे एक अर्ज देईपर्यंत उशीर, आहे केंद्राच्या तपास यंत्रणा कशा असतात" असा इशारा दिल्यापासून आमदार पाटील व त्यांच्या सुपुत्रांच्या भाजपा प्रवेशाची चर्चा सुरू झाली, मात्र इतक्या टोकाचा संघर्षावर पक्षश्रेष्ठी कसा पडदा टाकणार हे पाहणे गरजेचे आहे. येत्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी भाजपाने संजय क्षीरसागर यांना उमेदवारी दिली तर राजन पाटील यांचा क्षीरसागर यांच्या आमदारकी साठी मोठा हातभार लागणार आहे. त्यामुळे क्षीरसागर यांच्या आमदारकीचा मार्ग सुकर होणार आहे हे तितकेच खरे आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT