Raju Shetti  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sugarcane FRP : राजू शेट्टींच्या घोषणेनंतर कोल्हापूरकरांचं ठरलं; पण सातारकरांचं मौन : कारखानदारांचा 4200 रुपयांच्या ऊसदाराबाबत अभ्यास सुरू

Satara News : कोल्हापुरात निश्चित झालेला 4200 रुपयांचा ऊस दर सातारा आणि सांगलीलाही लागू करण्याची राजू शेट्टी यांची मागणी आहे. मात्र, साताऱ्यातील कारखानदारांनी दराबाबत अद्याप निर्णय घेतलेला नाही.

हेमंत पवार - Hemant Pawar

Karad, 06 November : कोल्हापूर येथे झालेल्या बैठकीत चार हजार २०० रुपयांचा निश्चित झालेला दर हा सातारा व सांगलीसाठी लागू असल्याची भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी मांडली आहे; परंतु कोल्हापूर अणि साताऱ्यातील साखर उताऱ्याचा फरक व साखरेच्या दराबाबत केंद्र सरकारच्या भूमिकांमुळे हा दर देणे शक्य होईल का? याबाबत सातारा जिल्ह्यातील साखर कारखानदार ठाम नाहीत. त्यामुळे आज दर जाहीर न करता ते अभ्यास करण्याच्या भूमिकेत आहेत. त्यामुळे शेतकरी संघटनांनी आंदोलन मागे घेतले, तरी सातारा जिल्ह्यात उसाला किती दर मिळणार, हे स्पष्ट झालेले नाही. त्यामुळे कोल्हापूरप्रमाणे दर मिळणार की पुन्हा आंदोलन करावे लागणार, याकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.

ऊसदरासाठी झालेल्या आंदोलनात कोल्हापूरमध्ये चार हजार २०० रुपये दराचा सकारात्मक तोडगा निघाला. त्यामुळे राजू शेट्टी यांनी नागठाणे येथे महामार्ग रोखलेल्या आंदोलकांना आंदोलन स्थगित करण्यास सांगितले. त्यामुळे तब्बल ६१ तासांनंतर शेतकरी संघटनांनी रोखलेला महामार्ग मोकळा झाला. आंदोलन स्थगित करत असताना कोल्हापूरचा ३९००-१००-२०० हा फॉर्म्युला सातारा व सांगलीलाही लागू असल्याचे सांगितले. तसे न झाल्यास स्वत: या जिल्ह्यात आंदोलन करण्याची भूमिकाही त्यांनी मांडली.

या पार्श्वभूमीवर आमच्या प्रतिनिधीने जिल्ह्यातील प्रमुख साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींशी ऊसदर किती देणार, याबाबत चर्चा करत त्यांची मते जाणून घेतली. तेव्हा एकाही कारखान्याच्या प्रतिनिधीने ‘हो आम्ही कोल्हापूरच्या फॉर्म्युल्यानुसार दर देणार’, असे ठामपणे सांगितले नाही. राजू शेट्टी यांनी पुढे केलेल्या फॉर्म्युल्याबाबत त्यांच्यात अद्याप चर्चा सुरू आहेत. या फॉर्म्युल्यानुसार दर देण्याची तयारी दाखविताना काय करावे लागेल, याचा त्यांच्याकडून अभ्यास सुरू आहे.

सातारा जिल्ह्यात उसाला एवढा दर देताना साखरेच्या बाजारभावाचे मोठे आव्हान उभे असल्याचे मत कारखानदारांचे आहे. साखरेचे दर कमी झाले, तर कारखान्यांच्या उत्पन्नावर थेट परिणाम होतो. दर वाढले, तर शेतकऱ्यांना अधिक दर देण्याची आर्थिक क्षमता निर्माण होऊ शकते. त्यामुळे ऊसदर जाहीर करण्याबाबत साखरेच्या बाजारभावाकडे कारखानदारांनी बोट दाखवले. साखरेचा दर पाच हजार रुपयांच्या जवळपास स्थिरावल्यास उत्पादन, प्रक्रिया, व्याज, तोडणी आणि वाहतूक यांसह अन्य खर्च वजा जाता शेट्टींच्या फॉर्म्युल्यानुसार ऊसदर देणे शक्य होईल, असे मत एका कारखानदाराने व्यक्त केले.

कोल्हापूर येथे साखर उतारा सातारा जिल्ह्यापेक्षा जास्त आहे. त्यामुळे कोल्हापूरप्रमाणे दर देणे शक्य होईल का, याबाबत आमचा विचार सुरू असल्याचे एका कारखान्याच्या प्रतिनिधींनी सांगितले. दरम्यान, काहींनी काल पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यासोबत झालेल्या बैठकीत आम्हाला दर जाहीर करण्यासाठी दोन दिवसांचा अवधी दिला आहे. त्यानुसार आमच्या व्यवस्थापनाची चर्चा सुरू आहे. त्यानंतरच निर्णय घेण्यात येईल, अशी भूमिका काही प्रतिनिधींनी मांडली.

शेतकरी संघटनेने आंदोलन स्थगित केले असल्याने नागरिकांसाठी ऐन दिवाळीत निर्माण झालेला वाहतुकीचा प्रश्न सुटला आहे; परंतु कोणत्याच कारखान्याने आज दर जाहीर न केल्याने जिल्ह्यातील ऊसदराची कोंडी मात्र अद्यापही कायम आहे. दुसरीकडे साखरेच्या बाजारभावाचे कारण पुढे करून कारखानदारांना हात झटकता येणार नाही, अशी भूमिका शेतकरी संघटनांकडून घेतली जात आहे.

मागील वर्षी कारखान्यांनी कोल्हापूरप्रमाणे दर दिला आहे. त्यामुळे चार हजार २०० रुपये दर देणे अवघड नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे ऊसदराचा पेच लवकर न सोडवल्यास हा प्रश्न पुन्हा चिघळण्याची चिन्हे आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्याही ऊसदराकडे नजरा आहेत. त्याबाबत पालकमंत्री व प्रशासनाने तातडीने पावले उचलणे आवश्यक आहे.

सरकार तुमचेच, निर्णय घ्या

ऊसदराच्या प्रश्नावर शेतकरी आणि कारखानदार यांच्यातील ऊसदराच्या संघर्षात कारखानदारांकडून साखरेच्या बाजारभावाकडे निर्देश केला जात आहे. साखरेचा दर वाढला तर कारखान्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन शेतकऱ्यांना अधिक दर देण्याची क्षमता निर्माण होईल, असे त्यांचे म्हणणे आहे, तर ऊस उत्पादनासाठी शेतकऱ्यांना येणारा वाढता खर्च, मजुरी, खते, औषधे, मशागत आणि तोडणी-वाहतुकीचा खर्च लक्षात घेता यंदा उसाला चांगला दर मिळावा, अशी शेतकऱ्यांची ठाम मागणी आहे.

साखरेची किमान आधारभूत किंमत ठरवणे, हे केंद्र सरकारच्या हातात आहे. राज्यात व केंद्रात भारतीय जनता पक्षाचेच सरकार आहे. बहुतांश कारखानदारही भाजप किंवा महायुतीमध्येच आहेत. त्यामुळे साखरेच्या दराबाबत बोट दाखवत ऊसदर देणे टाळण्यापेक्षा केंद्रातील नेत्यांकडे बसून मार्ग काढण्यासाठी हालचाली करणे आवश्यक आहे. केवळ बाजारभावाच्या प्रतीक्षेत ऊसदराचा निर्णय लांबणीवर पडल्यास त्याचा फटका शेतकऱ्यांनाच बसणार आहे.

जो कारखाना लिहून देईल त्यालाच ऊस... राजू शेळके

सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील ऊसदरासाठी राजू शेट्टी यांनी आंदोलन केले होते. एकट्या कोल्हापूर जिल्ह्यासाठी केलेले नव्हते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दिलेला ३९०० रुपये अधिक १०० रुपये आणि साखरेचे दर वाढल्यावर २०० रुपये हा फॉर्म्युला जिल्ह्यातील कारखानदारांना मान्य करावाच लागेल. तो फॉर्म्युला मान्य असल्याचे जो कारखाना लिहून देईल त्यालाच शेतकरी ऊस घालतील; अन्यथा आंदोलनाशिवाय पर्यायच राहणार नाही, याची कारखानदार आणि प्रशासनानेही दखल घ्यावी, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी स्पष्ट केले.

कारखानदारांच्या दारात बस : अनिल पवार

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चार दिवस घरदार सोडून शेतकऱ्यांच्या घामाला दाम मिळावा, यासाठी आंदोलन केले. त्यामुळेच ३६५० रुपयांवर ३९०० अधिक १०० रुपये हा फॉर्म्युला द्यावाच लागेल; अन्यथा ज्याला जमत नसेल त्यांनी कारखाने बंद ठेवावेत. जे कारखाने देणार नाहीत, त्या कारखानदारांच्या दारात बसून राजू शेट्टी यांच्यासोबत आंदोलन करू, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष अनिल पवार यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT