Popatrao Pawar
Popatrao Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

यशवंतरावांच्या समाधीवर पद्मश्री ठेवून पोपटराव पवारांनी केले अभिवादन

हेमंत पवार

सातारा (कऱ्हाड) : महाराष्ट्र राज्य आदर्शगाव समितीचे कार्यकारी अध्यक्ष आणि हिवरे बाजारचे माजी आदर्श सरपंच पोपटराव पवार (Popatrao Pawar) यांना दिल्लीत राष्ट्रपती भवनात पद्मश्री पुरस्कार नुकताच प्रदान करण्यात आला. त्यानंतर त्यांनी कऱ्हाड येथे जाऊन महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री (स्व.) यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) यांच्या समाधिस्थळी येऊन त्यांना मिळालेला पद्मश्री पुरस्कार समाधीवर ठेवून अभिवादन केले. (After receiving the PadmaShri, Popatrao Pawar went to Karhad and greeted Yashwantrao Chavan)

देशातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीसाठी मानाचा ‘पद्मश्री’ पुरस्कार देण्यात येतो. पोपटराव पवार यांनी ग्रामविकास, जलव्यवस्थापन, वृक्षलागवड आदी क्षेत्रात काम केले. पवार यांचे शिक्षण एम.कॉम.पर्यंत झाले असून १९८९ मध्ये हिवरे बाजार येथील पहिले तरुण सरपंच म्हणून ते निवडून आले. त्यानंतर गावातील जल, मृदा आणि वन संधारण या कामामध्ये स्वतःला झोकून देत गावाचा कायापालट केला. आज हिवरे बाजार पूर्णतः दुष्काळमुक्त झाले असून राज्यात हिवरे बाजार पॅटर्न म्हणून प्रसिद्ध आहे. तसेच, त्यांनी पाणी फाउंडेशनमध्ये देखील सहभाग घेतला होता.

पाणी आणि स्वच्छता यापुरतंच मर्यादित न राहता पोपटराव यांनी अनेक सामाजिक विषयावर कार्य केलं आहे. आदर्श गाव हिवरेबाजार हे राज्यासह देशात प्रसिध्द आहे. या गावामध्ये विविध उपाययोजना दुष्काळात राबविल्या आहेत. याची दखल घेऊन त्यांना दिल्लीतील राष्ट्रपती भवनात पद्मश्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यानंतर त्यांनी कऱ्हाडला यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी येऊन पद्मश्री पुरस्कार समाधीवर ठेवून अभिवादन केले.

या वेळी बाबासाहेब पवार, शिवाजी गोहोड, नवनाथ खाणगे, दत्ता पादीर उपस्थित होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना पवार म्हणाले की, पद्मश्री पुरस्कार स्वीकारुन दिल्लीवरुन आल्यावर पहिल्यांदा कऱ्हाडला येऊन मी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळी पुरस्कार ठेवून अभिवादन केले. ज्यांनी या देशात पंचायत राज व्यवस्था निर्माण करून स्थानिक स्वराज्य संस्थांचा पाया मजबूत करण्याचा मोठा प्रयत्न केला. त्या यशवंतराव चव्हाणांच्या प्रतिसंगमावरील समाधीस्थळी येऊन अभिवादन करुन साहेबांचे चरणस्पर्श केले. त्याचे मला आत्मीक समाधान लाभले. हिवरे बाजारसारखे एका छोट्याशा गावात सरपंच म्हणून काम करताना स्वावलंबी गाव करण्यात खूप मोठी प्रेरणा यशवंतराव चव्हाण यांच्या विचारांची होती.

महात्मा गांधींनी खेड्याकडे चला हा संदेश दिला होता. यशवंतराव चव्हाण यांनी पंचायत राज व्यवस्थेतूनच पुढे गेले, तर बलशाली भारताचे स्वप्न आपण साकार करु शकू असे सांगितले. हिवरे बाजारमध्य मला जे काम करता आले, त्याची प्रेरणा यशवंतरांवांची आहे, त्यामुळे दिल्लीत पद्मश्री मिळाल्यानंतर मी पहिल्यांदा कऱ्हाडला त्यांच्या समाधीस्थळी येऊन पदमश्री त्यांच्या समाधीवर ठेवून नतमस्तक झालाे, असे पवार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT