Raju Shetti  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sugarcane Frp Agitation : सोलापूरनंतर राजू शेट्टींचा मोर्चा बारामतीकडे वळणार : 3800 ते 3900 रुपयांच्या उचलेसाठी इशारा

Raju Shetti News : सोलापूरनंतर राजू शेट्टी बारामतीतील साखर कारखान्यांविरोधात आंदोलन करणार आहेत. ऊस उत्पादकांना 3800 ते 3900 रुपये पहिली उचल देण्यासाठी 25 तारखेपर्यंत मुदत दिली आहे.

विश्वभूषण लिमये

Solapur, 16 November : सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिल्यानंतर माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील स्वाभिमानी शेतकरी संघटना आपला मोर्चा बारामतीकडे वळवणार आहे. बारामती परिसरातील कारखान्यांची रिकव्हरी ही जास्त आहे, त्यामुळे त्यांनी 3800 ते 3900 रुपये पहिली उचल दिली पाहिजे. त्यासाठी बारामती परिसरातील कारखान्यांना येत्या 25 तारखेपर्यंत मुदत दिली आहे, त्यानंतरही उचल दिली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला आहे.

माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली सोलापुरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी चार हुतात्मा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा काढला. शेट्टी यांच्यासह हजारो शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या मांडला आहे. जिल्हाधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत ठोस निर्णय होऊ शकला नाही, त्यामुळे आंदोलक कार्यालयासमोर बसून आहेत.

दरम्यान, माध्यमांशी बोलताना राजू शेट्टी म्हणाले, आमचं एक शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा करायला गेलेलं होतं. त्या बैठकीत कर्नाटक आणि महाराष्ट्रातील मुखमंत्र्यांच्या सुचनेवरून काही मंत्री आणि कारखानदारांबरोबर चर्चा करून सर्वमान्य फॉर्म्युला तयार केलेला होता. तोच फॉर्म्युला सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगितला असून त्यांनी तत्वतः तो मान्यही केला आहे.

उसाचा दर हा साखरेपासून मिळणाऱ्या उत्पन्नावरच ठरतो, त्यानुसार 10 ते 11 टक्के रिकव्हरी असणाऱ्या साखर कारखान्यांनी पहिली उचल 3500 ते 3600 दिली पाहिजे. सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना कळवले आहे की, 3100 ते 3150 याच्यापुढे साखर कारखानदार जायला तयार नाहीत. त्यामुळे आणखी 1 तास आम्ही थांबतोय आणि मागणी मान्य नाही झाली तर आमचं आंदोलन चालूच राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, धाराशिवमध्ये धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दुपारपासून आंदोलन सुरु आहे. ऊसदरासोबतच पीकविमा, दुष्काळी परिस्थिती, चारा छावणी याविषयावर ते आंदोलन सुरू आहे. शेतकऱ्यांच्या भावना अतिशय तीव्र आहेत, ज्यापद्धतीने कारखानदार वागत आहेत, त्यामुळे त्यांचा संयम सुटत चालला आहे, वेळीच हस्तक्षेप करून मी त्या सर्वांना मागे बोलावलं, असेही त्यांनी नमूद केले.

ते म्हणाले, आमचं इथलं आंदोलन अतिशय शिस्तीत चालू आहे, त्याला कोणी गालगोट लावू नका, म्हटल्यानंतर सर्वजण मागे फिरले आहेत. सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना न्याय मिळवून द्यायचाच, असा चंग बांधून आम्ही इथे आलेलं आहोत. आम्हाला न्याय मिळाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. आम्ही प्रशासनाच्या निरोपाची वाट पाहतोय आणि काही झालं तरी इथून हलायचे नाही, असा निर्धार आम्ही सकाळीच जाहीर केला आहे.

दरम्यान, बारामती परिसरातील कारखान्यांची रिकव्हरी ही जास्त आहे, आपल्या फॉर्मुल्यानुसार 3800 ते 3900 रुपये पहिली उचल कारखान्यांनी दिली पाहिजे, त्यासाठी आम्ही येत्या 25 तारखेपर्यंत बारामतीमधील कारखान्यांना मुदत दिली आहे, तोपर्यंत निर्णय न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा शेट्टी यांनी दिला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT