कोल्हापूर : बंडखोर खासदार धैर्यशील माने यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर कोल्हापूरातील हजारो शिवसैनिक (Shivsena) त्यांच्याविरोधात चांगलेच आक्रमक झाले आहेत. कोल्हापूरमधील रुईकर काॅलनीमधील धैर्यशील माने यांच्या निवासस्थानावर शेकडो शिवसैनिकांनी मोर्चा काढला. गली गली शोर है, धैर्यशील माने चोर है, उद्धव ठाकरेंशी (Uddhav Thackeray) बेईमानी आणि गद्दारी केल्याच्या घोषणा यावेळी देण्यात आल्या.
मोर्चाला सुरुवात करण्यापूर्वी शिवसेना जिल्हाप्रमुख मुरलीधर जाधव यांनी मानेंवर सडकून टीका केली. बाळासाहेब माने यांचे नातू असाल, तर राजीनामा द्या आणि निवडणुकीला सामोरे जा, असे आव्हानच त्यांनी यावेळी दिले. इतकेच नव्हे तर एक शिवसैनिक 100 जणांना भारी पडेल. पोलिसांनी कितीही बंदोबस्त लावला, तरी आम्ही निवासस्थानी घुसणारच. माने गटाने दोनवेळा गद्दारी केली. यांची लायकी नसताना उद्धव ठाकरेंनी पाठीवर हात ठेवला. स्वत: चे पैसे खर्च करून त्यांना निवडून आणले. पण तरीही ते दुसऱ्या गटात गेले, हीच गद्दारी आहे. गद्दाराला क्षमा नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
मोर्चाच्या सुरुवातीलाच शिवसैनिकांकडून खासदार धैर्यशील मानेंवर प्रश्न करण्यात आले. आपला गट अडगळीत असतानाही उद्धव ठाकरे यांनी तुम्हाला लोकसभेत पाठवलं, प्रवक्ते पद दिलं. मातोश्रीवर जेव्हा जेव्हा गेला तेव्हा उद्धव साहेबांनी सन्मान दिला, ओ खासदार सांगा उद्धवसाहेबांचं काय चुकलं? हातकणंगले मतदारसंघातील शिवसैनिकांनी फुटक्या कवडीची अपेक्षा न करता स्वत:च्या घरातील भाकरी बांधून तुमच्या विजयासाठी जीवाचं रान केलं, ओ खासदार सांगा शिवसैनिकांचे काय चुकलं? अशी विचारणा आंदोलक शिवसैनिकांकडून खासदार धैर्यशील माने यांना करण्यात आली.
पण दूसरीकडे धैर्यशील माने यांनी आपली भूमिका मांडताना शांत राहण्याचं आवाहन केलं आहे. शिवसेनचे काही पदाधिकारी भावनाविवश झाल्यामुळं नेमकं हे का घडलं? कशामुळं घडलं? हा आक्रोश व संवेदना मी शिवसैनिक म्हणून समजू शकतो. याच उत्तर घेण्यासाठी काढण्यात आलेल्या या मोर्चाला कसलाही विरोध होऊ नये, अशी प्रतिक्रीया धैर्यशील माने यांनी दिली आहे. अशात धैर्यशील माने यांच्या घरावर मोर्चा काढणाऱ्या शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्या घरासमोर पोलिस तैनात करण्यात आले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.