Ahmednagar Corporation Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ahmednagar Corporation : नगरपालिकेचे कामगार आक्रमक; मंत्रालयापर्यंत काढणार पायी मोर्चा, काय आहे कारण?

राजेंद्र त्रिमुखे

Ahmednagar News : राज्यात मराठा, ओबीसी, धनगर समाज आरक्षणासाठी आक्रमक झाला आहे. यामुळे सरकारची चांगलीच धावपळ उडाल्याचे संपूर्ण महाराष्ट्राने पाहिले. यानंतर आपापल्या मागण्यांसाठी अनेक घटकांनी आंदोलनाचे अस्त्र उपसले. यातच नगरमहापालिका कामगार युनियनच्या वतीने 'नगर ते मंत्रालय' असा पायी मोर्चा काढण्यात येणार आहे. गांधी जयंतीनिमित्त आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी २ ऑक्टोबर रोजी या लाँग मार्चचे आयोजन करण्यात आले आहे. यात महापालिकेतील सर्व कर्मचारी सहकुटुंब सहभागी होणार आहेत. (Latest Political News)

शहरात २ ऑक्टोबरपासून अग्निशमन, आरोग्य व पाणीपुरवठा या अत्यावश्यक सेवाच सुरू राहणार असून, इतर सर्व कामकाज बंद राहणार असल्याची माहिती युनियनचे अध्यक्ष कॉ. अनंत लोखंडे यांनी पत्रकार परिषदेत दिली. अनंत लोखंडे म्हणाले, शासनासह राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्यासह लोकप्रतिनिधींना २७ दिवसांपूर्वी नोटीस दिली होती. मात्र, त्याची दखल घेतली गेलेली नाही. महापालिकेतील कामगारांच्या विविध मागण्या मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. त्या तातडीने सोडविण्याबाबत या लाँग मार्चचे आयोजन करण्यात आले आहे, असे लोखंडेंनी स्पष्ट केले आहे. (Maharashtra Political News)

राज्यातील इतर महापालिकांच्या आस्थापना खर्चाची टक्केवारी ही शासनाने निर्धारित केलेल्या टक्केवारीपेक्षा कित्येक प्रमाणात जास्त आहे. महापालिकांना सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशी करण्यात येऊन त्याचा लाभ देण्यात आले. मात्र, नगरमहापालिकेची केवळ आस्थापना लागू खर्चाची टक्केवारी ही शासन निर्धारित टक्केवारीपेक्षा जादा असल्याचे सांगितले जात आहे. यातून सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशींचे लाभ कामगारांना शासनामार्फत नाकारलेले आहेत. हे लाभ तातडीने लागू करावेत, अशी प्रमुख मागणी असल्याचेही लोखंडेंनी सांगितले.

लाड समितीच्या शिफारशीनुसार मृत कर्मचाऱ्यांच्या वारसांना नेमणुका देण्यात याव्यात, विविध प्रलंबित मागण्या या नोटिशीत देण्यात आलेल्या आहेत. मनपा कामगारांच्या या मागण्या मान्य व्हाव्यात, यासाठी आता हा लढा देण्यात येणार आहे. नगर ते मुंबई 'पायी लाँग मार्च' २ ऑक्टोबरला नगरमधून कल्याणमार्गे निघणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. (Ahmednagar News)

असा असेल लाँग मार्च

महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी सहकुटुंब लाँग मार्चमध्ये सहभागी होणार आहेत. १६ दिवसांचा पायी प्रवास करून मुंबईतील आझाद मैदानावर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल. मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत मैदान सोडणार नाही. या आंदोलनासाठी कर्मचारी सामूहिक रजेवर जाणार आहेत. शहरातील गैरसोय टाळण्यासाठी अग्निशमन, आरोग्य व पाणीपुरवठा या अत्यावश्यक सेवाच सुरू राहणार आहेत. इतर सर्व कामकाज बंद राहणार असल्याची माहिती युनियनचे अध्यक्ष कॉ. लोखंडेंनी दिली.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT