Ajara Sugar Factory News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ajara Sugar Factory Election: आजरा निवडणुकीत बनावट मतदान; तिघांवर गुन्हे

Kolhapur Politics: विरोधक दिशाभूल करणारी विधाने करत आहेत.

Rahul Gadkar

Kolhapur News: आजरा साखर कारखान्याच्या निवडणुकीत बनावट मतदानप्रकरणी तिघांवर आजरा पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संजय शिवराम देसाई (वय ४८), प्रभाकर चिमासाहेब देसाई (वय ५०) आणि रामचंद्र गणपती देसाई (वय ४८) अशी आरोपींची नावे आहेत. दिलीप शामराव पाटील (रा.घोटवडे, ता. पन्हाळा) यांनी आजरा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीमध्ये म्हटले आहे की, ते शंकरलिंग विद्यामंदिर या निवडणूक मतदान केंद्र क्रमांक १८ या केंद्रावर मडिलगे (ता. आजरा) केंद्राध्यक्ष होते. या केंद्रावर सायंकाळी ३ ते ५ वाजण्याच्या सुमाराला संजय देसाई यांनी शामराव लक्ष्मण पाटील यांच्या नावे बनावट मतदान केले.

प्रभाकर देसाई हा बाबूराव आण्णाप्पा शिंदे तर रामचंद्र देसाई हा शंकर गोविंद जाधव यांच्या नावाने बनावट मतदान करण्यास आला होता. त्यांच्याकडे वेगवेगळ्या नावाची आधारकार्ड सापडले आहेत. सहायक पोलिस निरीक्षक सुनील हारुगडे तपास करीत आहेत.

आजरा साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी झालेल्या मतदानानंतर विरोधी आघाडीला पराभव दिसत आहे. विरोधकांचा जनाधार कमी झाल्याने मडिलगे येथे झालेल्या प्रकाराचे खापर राष्ट्रवादीवर फोडले जात आहे. या प्रकरणाशी राष्ट्रवादीचा काडीचाही संबंध नाही. विरोधकांचे आरोप बेछूट असून, स्वतः बनावट मतदानाची यंत्रणा वापरणाऱ्यांना विरोधकांचे हे आरोप चोराच्या उलट्या बोंबा आहेत, असे रवळनाथ विकास आघाडी प्रमुख सुधीर देसाई यांनी सांगितले.

येथील तालुका संघाच्या कार्यालयात पत्रकार बैठक झाली. विरोधकांनी केलेले आरोप पाहता त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. गडहिंग्लज येथील दोन कॉलेजांमध्ये झालेले बनावट आधारकार्ड तयार करण्याच्या बाबी कोणाच्या होत्या. पोळगाव (ता. आजरा) येथील झालेले बनावट मतदान कोणाचे होते? याचे आत्मपरीक्षण केल्यानंतर या प्रश्नांची उतरे निश्चितच विरोधकांना मिळतील.

या निवडणुकीत दीड हजार ते दोन हजार मतांनी रवळनाथ आघाडीचा विजय निश्चित असल्याचा दावा केला. यावेळी त्यांनी ब वर्ग सभासद मतदानाच्या अधिकाराबाबत आमच्या आघाडीला काहीही कल्पना नव्हती. पण विरोधक या मतदानाच्या अधिकाराबाबत दिशाभूल करणारी विधाने करीत आहेत, असेही त्यांनी सांगितले.

Edited by: Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT