Ajit Pawar-Supriya Sule-Nilesh Lanke
Ajit Pawar-Supriya Sule-Nilesh Lanke Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

पवारसाहेबांना बोलावून नीलेश लंकेंनी माझा अन्‌ अजितदादांचाच 'करेक्ट कार्यक्रम' केला!

प्रमोद बोडके

सोलापूर : तुम्हाला आमदार नीलेश लंके (Nilesh Lanke) माहिती आहेत का? असा प्रश्‍न राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सभेतील उपस्थितांना विचारला. उपस्थितांपैकी पन्नास टक्के लोकांनी हात वर करून हो असे उत्तर दिले. त्याच आमदार नीलेश लंके यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आणि माझा कसा करेक्ट कार्यक्रम केला, हा किस्सा खासदार सुळे यांनी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात सांगितले. पारनेरच्या (जि. नगर) करेक्ट कार्यक्रमाचा किस्सा सोलापुरातील मेळाव्यात खळखळून हसवून गेला. (Ajit Pawar and Supriya Sule refused, Nilesh Lanke called directly Sharad Pawar for the Rally)

खासदार सुळे बुधवारी (ता. २० एप्रिल) सोलापूरच्या दौऱ्यावर होत्या. सोलापुरातील सुशील रसिक सभागृहात शहर व जिल्हा राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांशी त्यांनी संवाद साधला. या संवादात त्यांनी करेक्ट कार्यक्रमाची माहिती दिली. पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार नीलेश लंके यांना त्यांच्या मतदार संघात सभा घ्यायची होती. त्या सभेसाठी त्यांनी सर्वात प्रथम उपमुख्यमंत्री अजित पवार यांना वेळ मागितला. अजित पवार यांनी वेळ देता येत नसल्याचे कारण सांगितले. त्यानंतर आमदार लंके यांनी खासदार सुप्रिया सुळे यांची वेळ मगितली. खासदार सुळे यांच्या मुलीचा निकाल असल्याने आपण या कार्यक्रमाला येऊ शकत नसल्याचे सांगूनही आमदार लंके यांनी माझ्या डायरीत त्या कार्यक्रमाची नोंद पेनने केल्याची आठवण खासदार सुळे यांनी सांगितली.

मी देखील वेळ देऊ शकत नाही, हे आमदार लंके यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी माझ्या व दादांच्या परस्पर शरद पवार यांची वेळ घेतली. शरद पवार ज्या वेळी पारनेरमध्ये सभेला गेले, त्यावेळी मला आणि दादांना समजले की आमदार लंके यांनी आपला करेक्ट कार्यक्रम केला आहे. आमच्या परस्पर शरद पवार यांची वेळ घेऊन पारनेरमध्ये कार्यक्रम घेतला. मी व दादांनी पवार साहेबांना या कार्यक्रमाबद्दल विचारले, तेव्हा साहेब म्हणाले, ते मोठे नेते आहेत, व्यस्त असतात, मी लहान नेता आहे; म्हणून वेळ दिल्याची आठवण खासदार सुळे यांनी आजच्या सभेत सांगताच उपस्थितांमध्ये प्रचंड हशा पिकला. शरद पवार या वयातही ठणठणीत आहेत. कार्यकर्त्यांचे मन सांभाळणे, कार्यकर्त्यांना वेळ देणे या गोष्टी ते आजही पाळतात. हेच त्यांच्या तब्बेतीचे खरे टॉनिक असल्याचेही खासदार सुळे यांनी आवर्जून सांगितले.

पवारसाहेब नुसतं ‘हॅलो मनोहर’ म्हणाले तरी सपाटे सहा महिने खूष असतात

खासदार सुळे यांनी सोलापुरातील सिद्धेश्‍वर मंदिरालाही भेट दिली. खासदार सुळे दुसऱ्यांदा मंदिरात आल्याची आठवण ट्रस्टींनी सांगितली. शरद पवार आतापर्यंत या मंदिरात सर्वाधिक वेळा आले. मुख्यमंत्री असताना सिद्धेश्‍वर तलावातील गाळ काढण्यासाठी २५ लाख रुपये दिल्याची आठवणही खासदार सुळे यांनी या वेळी करून दिली. त्यावेळी महापौर असलेल्या मनोहर सपाटे यांनी खासदार सुळे यांना १९९४ ची आठवण करून दिली. माजी महापौर सपाटे यांच्याकडे कटाक्ष टाकत खासदार सुळे म्हणाल्या, सपाटे यांचे थेट रिपोर्टिंग शरद पवार यांना असते. ते अधी-मधी कोणालाही सांगत नाहीत. पवार साहेब, ‘हॅलो मनोहर,’ एवढे जरी म्हणाले तरीही सपाटे किमान सहा महिने खूष असतात. सपाटे यांच्यासारखे अनेक कार्यकर्ते महाराष्ट्रात आहेत. या कार्यकर्त्यांमधूनच पवार यांना ऊर्जा मिळत असल्याचेही खासदार सुळे यांनी या वेळी आवर्जून सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT