Ajit Pawar News : सहकारी संस्था चांगल्या चालल्या पाहिजेत हा उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा नेहमीच आग्रह असतो. संस्था चांगल्या चालल्या नाहीत, तर पक्ष, आघाडीतील नेता असला तरीही टीका करण्यासाठीही मागे-पुढे बघत नाहीत. नुकतेच कोल्हापूर दौऱ्यात अजित पवार यांनी शिवसेना आमदार चंद्रदीप नरके, काँग्रेस नेते आणि जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहुल पाटील, शिवसेनेचे माजी खासदार संजय मंडलिक यांच्यावर कारखाना नीट चालवला नसल्याचे म्हणत सडकून टीका केली.
माजी आमदार के पी पाटील यांचा शुक्रवारी (23 मे) राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश झाला. यासाठी अजित पवार कोल्हापूरला आले होते. या पक्षप्रवेश सोहळ्यात बोलताना अजित पवार यांनी के. पी. पाटील यांच्या सद्गुरु बाळुमामा शिक्षण प्रसाकर मंडळाचा उल्लेख करत कौतुक केले. याशिवाय पाटील यांचा कारखाना देखील राज्यातील पाच कारखान्यांमधील एक आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वातील कोल्हापूर जिल्हा बँक, गोकुळ दूध संघ , कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समिती यांचा कारभार आदर्शवत आहे, असे प्रमाणपत्र दिले.
पण याचवेळी जिल्ह्यातील भोगावती, कुंभी कासारी, हमीदवाडा, गडहिंग्लज आणि आजरा या कारखान्यांचा उल्लेख करत इथल्या नेतृत्वावरही टीका केली. ते म्हणाले, नेतृत्व चांगलं असेल तर संस्था चांगल्या चालतात. नेतृत्व योग्य नसेल तर संस्था रसातळाला जातात. उदाहरणार्थ भोगावती कारखान्याची काय अवस्था आहे? कुंभी-कासारीची काय अवस्था आहे? हमीदवाड्याची काय अवस्था आहे? गडहिंग्लज, आजरा कारखान्याची काय अवस्था आहे? असा सवालही त्यांनी केला.
त्याच कोल्हापूर भागातील शेतकरी, ऊस पिकवण्याची पद्धत सारखी, जमिनीचा पोत सारखा, रिकव्हरी महाराष्ट्रात सगळ्यात जास्त, पाण्याची स्थिती चांगली, शेतकरी मेहनत घेतो. पण तिथलं नेतृत्व योग्य नसेल तर संस्थांची काय अवस्था होती? मला यातून टीका करायची नाही. उद्या त्यांना अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सरकार म्हणून आम्हीच मदत करणार आहोत. पण संस्थांचे आर्थिक नियोजन चांगले हवे. आज या संस्थांमध्ये पाच, सहा महिने पगार होत नाहीत. भाव चांगले दिले जात नाहीत, अशी खंतही अजित पवार यांनी व्यक्त केली.
अजित पवार यांनी उल्लेख केलेल्यापैकी भोगावती कारखान्यावर दिवंगत माजी आमदार पी. एन. पाटील यांच्यानंतर आता त्यांचे पुत्र राहुल पाटील यांची सत्ता आहे. तर कुंभी-कासारी कारखान्यावर शिवसेना आमदार चंद्रदीप नरके यांचे वर्चस्व आहे. तर हमीदवाडा कारखान्याची सत्तेच्या चाव्या शिवसेनेचे माजी आमदार संजय मंडलिक यांच्या हातात आहेत. तर गडहिंग्लज आणि आजरा या दोन्ही कारखान्यांवर मंत्री हसन मुश्रीफ यांच्या नेतृत्वात स्थानिक आघाड्यांच्या सत्ता आहेत.
त्यामुळे एकप्रकारे अजित पवार यांनी मुश्रीफ यांचे जिल्हा बँक, गोकुळ दूध संघ आणि बाजार समितीच्या कामाबाबतीत कौतुकही केले. पण गडहिंग्लज आणि आजरा या कारखान्यांवरील कामावर बोट ठेवत कानउघडणीही केली. अजित पवार यांच्या या टीकेनंतर महायुतीमधील नेत्यांनी नाराजी व्यक्त केली. अजित पवार यांनी ज्या काही सूचना आहेत त्या सांगाव्यात. आम्ही त्याचा स्वीकारू, अशी प्रतिक्रिया आमदार चंद्रदीप नरके यांनी दिली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.