
Ajit Pawar News : विदर्भामधील नागपूर आणि अमरावती विभागातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंगळवारी (27 मे) मुंबईला बोलावले आहे. मागील काही दिवसांपासून स्वतंत्रपणे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक लढण्याची होणारी मागणी होत असतानाच विदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्य नोंदणी अभियानाला मिळालेला थंड प्रतिसाद या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे.
महापालिका, जिल्हा परिषद स्वबळावर लढायची की स्वतंत्रपणे याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मतभेद आहेत. विदर्भात भाजप फार काही जागा सोडणार नाही याची कुणकुण राष्ट्रवादीच्या नेत्यांना लागली आहे. हे बघता अनेकांचा आग्रह स्वबळाचा आहे. शुक्रवारी नागपूरमध्ये अमरावती आणि नागपूर विभागातील पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात अनेकांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे स्वबळाची भावना बोलून दाखवली.
दुसरीकडे पदाधिकारी गांभीर्याने सदस्य नोंदणी करीत नसल्याने राष्ट्रीय कार्याध्यक्ष आणि खासदार प्रफुल पटेल यांनी याच मेळाव्यात जाहीपरणे सर्वांना फटकारले. या सगळ्यानंतर निवडणुकीसाठी स्थानिकांनी केलेल्या तयारीचा आढावा आणि कोणी काय केले याची माहिती जाणून घेण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार विदर्भातील सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांना मुंबईत बोलावले आहे. या बैठकीत अजित पवार यांच्याकडूनही पटेल यांच्याप्रमाणेच कानउघडणी होण्याची शक्यता आहे.
शुक्रवारच्या मेळाव्यात प्रफुल्ल पटेल म्हणाले, फक्त टाईट कपडे घालून चालणार नाही तर पक्षात राहायचे असेल तर पक्षाचे कामही करावे लागले. सुमारे 20 वर्षांपासून राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत आहे. यानंतरही विदर्भात राष्ट्रवादी वाढली नाही. एकेकाळी राष्ट्रवादीचे 11 आमदार निवडून आले आहेत. आता विदर्भात फक्त 6 आमदार शिल्लक आहेत. पक्षाचे काम कोणी करत नाही, अनेक जण फक्त मुंबईत दिसतात, ग्राऊंडवर काम शून्य अशा शब्दात त्यांनी सर्वांना कानपिचक्या दिल्या.
राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस, आमदार संजय खोडके यांनी सुद्धा वेगळ्या शब्दात अशाच आशयाचे मत व्यक्त केले. त्यांनी तर आपण मेहनत घेत नाही असे स्पष्टपणेच सांगितले. सोबतच आघाडी आणि महायुतीमुळे राष्ट्रवादीला लढण्यासाठी विदर्भात फार स्कोप नाही, त्यामुळे पक्ष वाढत नसल्याचे सांगून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पक्षाने स्वबळावर लढाव्या असा सल्ला दिला. माजी वनमंत्री आणि गडचिरोलीचे आमदार धर्मरावबाबा आत्राम यांनी भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांना थेट तोफ डागली.
विधानसभेत बंडखोरांना ताकद दिल्याचा आरोप करून गडचिरोलीत महायुतीची गरज नाही, राष्ट्रवादी स्वबळावर लढेल असे जाहीर करून टाकले. एका बाजूला नेते आणि पदाधिकारी स्वबळासाठी आग्रही आहेत आणि दुसऱ्या बाजूला सदस्य नोंदणीही थंड आहे. या विरोधाभासात केवळ स्वबळाची मागणी करून चालणार नाही, तर आधी पक्षवाढीसाठी कष्ट घ्यावे लागले, अशी कानउघडणी अजित पवार करण्याची शक्यता आहे. या सर्व पार्श्वभूमीवर मंगळावारी मुंबई येथे बोलावण्यात आलेल्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.