Nagar Politics : राज्यात जातींमध्ये आरक्षणावरून लढाई सुरू आहे. आरक्षण हा संवेदनशील विषय. बोलण्यातून काही गेले, तर कोणता समाज दुखवेल हे सांगता येत नाही. समाज दुखवला, तर थेट व्होट बँकेवर परिणाम. त्यामुळे यावर भले-भले नेते बोलत नाहीत. परंतु आपल्या धडाकेबाज शैलीसाठी परिचित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आरक्षणावर लढणाऱ्यांचे आणि टोकाची भूमिका घेणाऱ्यांना चांगलेच फटकारले आहे. हे करताना त्यांनी नामोल्लेख टाळला आहे.
आमदार नीलेश लंके यांच्या वतीने मोहटा देवी दर्शन यात्रेचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आज प्रारंभ झाला. या वेळी अजित पवार यांनी राज्यात आरक्षणावरून निर्माण झालेल्या अस्थिरतेवर भाष्य केले. परिस्थिती समजावून घ्या, असे आवाहन त्यांनी केले.
अजित पवार म्हणाले, "राज्यात सध्या अस्थिरतेची परिस्थिती आहे. सर्वच जाती आरक्षण मागत आहेत. आपल्या राज्याला शाहू-फुले-आंबेडकराच्या विचारांचा वारसा लाभला आहे. त्यानुसार राज्य सरकारचा कारभार सुरू आहे. आरक्षण मिळावे, अशीच आमची भावना आहे. मदतीची भावना आहे. आरक्षणाची मागणी करताना वातावरण खराब होऊ देऊ नका. ओबीसी, मराठा, धनगर, आदिवासी आपापल्या भूमिका घेत आहेत. यातून जाती-जातीत आणि धर्मात भांडणे वाढत आहेत. ती कोणालाच नको आहेत". आम्हालाही मराठा समाजाला आरक्षण द्यायचे आहे. तसे प्रयत्न होत आहेत. मध्यंतरी केला, पण उच्च, सर्वोच्च न्यायालयात तो टिकला नाही. यात कोणतेही राजकारण नाही, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.
मराठा समाजाला आरक्षण द्यायचे आहे. परंतु मागासवर्गीय, आदिवासी, भटके, ओबीसी यांच्यासह इतर कोणत्याही आरक्षणाला धक्का न लागता द्यायचे आहे. कायद्याच्या चौकटीत आणि न्यायालयात टिकेल, असे हे आरक्षण असणार आहे. तशी तयारी सरकारकडून सुरू आहे. परंतु आरक्षणाच्या मुद्द्यावरून काहींना दमच निघत नाही. टोकाचे बोलत आहेत. समजून घ्यायला तयार नाही, असेही अजित पवार म्हणाले.
नगरमध्ये अकराशे कोंटीची कामे केली आहेत. आमदार नीलेश लंकेंच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात दीड हजार कोटींचे काम करणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. राजकारणात अनेकदा घराणेशाहीवर टीका केली जाते. आमदार लंके यांना कोणती घराणेशाही होती. लंके करत असलेल्या कामाचे दाखले देत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे भाषणात कौतुक केले. राज्याच्या सत्तेत सहभागी झाल्याच्या मुद्द्यावरून अजित पवार म्हणाले, 'लोकांना कोणाची सत्ता आहे, याचे काही देणे-घेणे नाही. त्यांना काम झालेली पाहिजे. तेच आम्ही करत आहोत. सत्तेसाठी आम्ही हापालेलो नाही. सत्तेचा अमरपट्टा घेऊन कोणीही आलेले नाही'.
Edited By- Anuradha Dhawade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.