Umesh Patil-Rajan Patil-Ajit Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Rajan Patil : अजितदादांनी बॅलन्स साधला; उमेश पाटलांना जिल्हाध्यक्ष, तर राजन पाटलांना लाल दिवा!

Mohol Political News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी आमदार राजन पाटील यांची राज्य सहकारी परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली. सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गटबाजी टाळून समतोल साधण्याचा हा रणनीतिक प्रयत्न आहे.

Vijaykumar Dudhale
  1. राजन पाटील यांना समतोलासाठी महत्त्वाचे पद – सोलापूर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अंतर्गत वाद शांत करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी आमदार राजन पाटील यांची राज्य सहकारी परिषदेच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली.

  2. राजन–उमेश पाटील कटुता – मोहोळ तालुक्यातील दोन्ही नेत्यांमध्ये तीव्र मतभेद असूनही ते अजित पवारांसोबत आहेत; 2024 निवडणुकीत याच अंतर्गत कलहामुळे पक्षाचा पराभव झाला होता.

  3. भाजप प्रवेशाच्या चर्चेवर विराम – उमेश पाटील यांना जिल्हाध्यक्षपदी नेमल्याने नाराज झालेल्या राजन पाटील यांचा भाजपकडे कल वाढल्याच्या चर्चेला या नव्या नियुक्तीने आळा बसण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Solapur, 18 September : मोहोळचे माजी आमदार राजन पाटील यांच्याकडे राज्य सहकारी परिषदेच्या अध्यक्षपदाची धुरा सोपवून उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूरच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये समतोल साधण्याचा प्रयत्न केला आहे. राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षपदाची सुत्रे उमेश पाटील यांच्याकडे सोपविताना अजितदादांनी मोहोळमधील माजी आमदार राजन पाटील नाराज होणार नाहीत, याची दक्षता घेतल्याचे दिसून येते. राज्य सहकार परिषदेच्या अध्यक्षपदाचे परिपत्रक काढून राजन पाटील यांना खूश करण्याचा प्रयत्न पक्षाकडून झाला आहे.

माजी आमदार राजन पाटील (Rajan Patil) आणि उमेश पाटील हे दोघेही मोहोळ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आहेत. दोघेही एकच पक्षात असूनही त्यांचे कोणत्याही मुद्यावर एकमत होऊ शकत नाही, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे दुर्दैव आहे. या दोन पाटलांमधून विस्तवही जाऊ शकत नाही, एवढी कटुता या दोन्ही नेत्यांमध्ये आहे. तरीही हे दोन्ही नेते अजित पवारांसोबत आहेत, हे आश्चर्य मानले जात आहे.

राजन पाटील हे मोहोळचे माजी आमदार आहेत. ते स्वतः तीन वेळा मोहोळमधून निवडून आले आहेत, तर तीन वेळा त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या श्रेष्ठींनी दिलेल्या उमेदवाराला निवडून आणले होते. विशेष म्हणजे २०१४ मध्ये महाराष्ट्रासह संपूर्ण देशात मोदी लाट असतानाही मोहोळमधून राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आमदार निवडून आणण्याची किमया साधली होती.

मोहोळ मतदारसंघावर माजी आमदार राजन पाटील यांनी वर्चस्व राखले होते. मात्र, मागील २०२४ च्या निवडणुकीत पक्षांतर्गत मतभेद आणि तालुक्यातील सर्वपक्षीय नेते विरोधात एकवटल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार यशवंत माने यांना पराभव पत्करावा लागला. विशेषतः राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील उमेश पाटील यांनीच राजन पाटील यांच्या विरोधात मोहिम उघडली होती, त्यामुळे पक्षाला हक्काची आणि जिंकून येऊ शकणारी जागा गमावावी लागली.

विधानसभा निवडणुकीत पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात भूमिका घेऊनही उमेश पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे राजन पाटील गट नाराज झाला होता. त्यानंतर राजन पाटील यांची भाजपशी जवळीक वाढली होती. त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा रंगली होती. मात्र, खुद्द राजन पाटील किंवा त्यांच्या गटाकडून कोणत्याही प्रकारचे भाष्य करण्यात आले नव्हते.

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकीत समतोल राहावा, राजन पाटील यांच्यासारख्या मातब्बर नेत्याने पक्ष सोडून जाऊ नये, याची काळजी अजितदादांनी घेतली आहे. राज्य सहाकरी परिषदेच्या अध्यक्षपदाची नियुक्ती जाहीर केली असून त्याचे परिपत्रक नुकतेच काढण्यात आले आहे. एकीकडे उमेश पाटील यांच्याकडे पक्ष सोपवताना राजन पाटील यांच्या निष्ठेची कदरही अजितदादांनी केल्याची भावना राजन पाटील समर्थकांकडून बोलून दाखवली जात आहे.

प्र.1: राजन पाटील यांना कोणते नवे पद मिळाले?
उ. – राज्य सहकारी परिषदेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे.

प्र.2: सोलापूर राष्ट्रवादीत वादाचे कारण काय आहे?
उ. – मोहोळमधील नेते राजन पाटील आणि उमेश पाटील यांच्यातील दीर्घकाळ चालत आलेले मतभेद.

प्र.3: 2024 निवडणुकीत पक्षाला पराभव का पत्करावा लागला?
उ. – पक्षांतर्गत मतभेद व उमेश पाटील गटाच्या विरोधी भूमिकेमुळे राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवाराचा पराभव झाला.

प्र.4: भाजप प्रवेशाची चर्चा का झाली होती?
उ. – जिल्हाध्यक्षपदावरून नाराज झाल्याने राजन पाटील यांचा भाजपकडे कल वाढल्याच्या चर्चा रंगल्या होत्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT