Sharad Pawar and Ajit Pawar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Ajit Pawar : शरद पवारांनंतर अजितदादांनी 'तो' कित्ता गिरवला; आमदार लंके पुन्हा लोकसभेच्या चर्चेत!

Ajit Pawar Parner Visit : अजित पवारांच्या पारनेर दौऱ्याची सध्या जोरदार चर्चा होत आहे. या मागील राजकीय कांगोरेही आता समोर येत आहेत.

Sachin Fulpagare

Ahmednagar News : राष्ट्रवादीचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार आज पारनेर दौऱ्यावर आहेत. आमदार नीलेश लंके यांनी आयोजित केलेल्या मोहटा देवी यात्रेचा प्रारंभ अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. यात्रेला प्रारंभ करण्यापूर्वी अजित पवार हे लंके यांच्या घरी गेल्याने पुन्हा राजकीय चर्चेला उधाण आले आहे.

राष्ट्रवादी फुटीपूर्वी नीलेश लंके यांचे नाव लोकसभेसाठी चर्चेत होते. शरद पवार यांनी नीलेश लंके यांच्या घरी भेट देऊन या चर्चेला अधिक बळ दिले होते. आता अजित पवारदेखील नीलेश लंके यांच्या घरी गेल्याने पुन्हा एकदा चर्चेला हवा मिळाली आहे.

नीलेश लंके यांनी कोरोना महामारीत केलेले काम आजही चर्चेत आहे. नीलेश लंके यांचे दोन खोल्यांचे घर साधे आहे. यावर नेहमीच चर्चा होत असते. शरद पवार यांनी २ ऑक्टोबर २०२१ ला नीलेश लंके यांच्या घरी भेट दिली होती.

लंकेंच्या अत्यंत साध्या घरात शरद पवार गेल्याने नीलेश लंके आणि त्यांचे कुटुंबीय भारावले होते. शरद पवार यांनी लंके यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला होता. शरद पवार यांच्याबरोबर त्यावेळी धनंजय मुंडे आणि रोहित पवार हेदेखील होते. शरद पवार यांच्याप्रमाणेच अजित पवार यांनी आज लंके यांच्या घरी भेट दिली. लंके यांचे अत्यंत साधे घर पाहून अजित पवार काहीसे भारावून गेले होते. लंके यांच्या कुटुंबीयांनी पुष्पहार घालून त्यांचे स्वागत केले. या वेळी अजित पवार यांनी त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधला.

शरद पवार यांच्यापासून वेगळे झाल्यानंतर अजित पवार आणि त्यांच्याबरोबर असलेल्या नेत्यांनी राष्ट्रवादीची ताकद महाराष्ट्रासह देशात वाढवण्याचा निर्धार केला आहे. यासाठी लोकसभा आणि विधानसभेच्या जागा वाढविण्याचेदेखील नियोजन आहे. नीलेश लंके यांच्या घरी अजित पवार यांनी भेट देणे ही लोकसभेची तयारी तर नाही ना, अशी चर्चा पुन्हा रंगली आहे.

अजित पवार हे महायुतीत आहेत. राज्याच्या सत्तेत सहभागी आहेत. अजित पवार महाराष्ट्रात लोकसभेच्या किती जागा लढणार हे निश्चित नाही. परंतु राष्ट्रवादीची महाराष्ट्रात जिथे ताकद आहे, तिथे उमेदवार देण्याची चाचपणी अजित पवारांकडून सुरू आहे. अजित पवार यांचा हा पारनेर दौरा त्याचाच भाग असल्याचे सांगितले जात आहे.

शरद पवारांचे छायाचित्र झळकले

आमदार नीलेश लंके यांनी या कार्यक्रमासाठी व्यासपीठ उभारले आहे. या व्यासपीठावर फलक लावण्यात आला आहे. यावर अजित पवार यांच्यासह शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांचे छायाचित्र वापरले आहेत. अजित पवार गटाला आणि त्यांच्या नेत्यांना शरद पवार यांनी छायाचित्र वापरू नका, नाहीतर न्यायालयात खेचू, असा इशारा दिलेला आहे. यानंतरही आमदार नीलेश लंके यांनी फलकावर शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे छायाचित्र लावले आहे. यावर शरद पवार आणि त्यांच्या गटाकडून काय प्रतिक्रिया येते याकडे आता लक्ष लागले आहे.

शक्तिप्रदर्शनात घड्याळाने वेधले लक्ष

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या स्वागतासाठी आमदार नीलेश लंके यांच्याकडून पारनेरमध्ये जोरदार तयारी करण्यात आली आहे. एकप्रकारे शक्तिप्रदर्शन करण्यात आले. फुलांची रांगोळी काढण्यात आली आहे. तसेच जेसीबीतून फुले उधळण्यात आली. यात लक्ष वेधून घेतले ते रांगोळीद्वारे रेखाटलेल्या घड्याळाने! शरद पवार आणि अजित पवार यांच्यात पक्ष आणि पक्षचिन्हावरून संघर्ष सुरू आहे. यातच पारनेरमध्ये अजित पवार यांच्या स्वागतासाठी रांगोळीद्वारे घड्याळाची प्रतिकृती रेखाटल्याने चर्चेचा विषय ठरला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT