Karad Palika meeting
Karad Palika meeting karad Reporter
पश्चिम महाराष्ट्र

जनक्षोभापुढे मुख्याधिकारी नमले; कराडला पुन्हा दोन वेळ पाणी पुरवठा...

- सचिन शिंदे

कऱ्हाड : जनतेचा वाढता विरोध, निर्णय विरोधातील तयार झालेला जनक्षोभ लक्षात घेवून कराड शहरात एकवेळ पाणी पुरवठ्याच्या निर्णयापासून कराड पालिकेचे मुख्याधिकारी रमाकांत डाके यांनी घुमजाव केले. निर्णय मागे घेत दोन वेळचा पाणी पुरवठा कायम केला. मात्र, त्यात दोन्हीवेळेला २५ टक्के पाणी कपातही होणार असल्याचे मुख्याधिकारी डाके यांनी सांगितले. त्याचवेळी एप्रिलपासून २४ तास पाणी योजनाही कार्यान्वित करणार असून त्याचे बील मीटरप्रमाणे आकारण्यात येणार असल्याचे श्री. डाके यांनी स्पष्ट केले.

एकवेळ पाणी पुरवठ्याच्या निर्णयावरून कालपासून कराड शहरात गोंधळ सुरू आहे. त्या विरोधात पहाटेपासून फ्लेक्सव्दारे गांधीगिरी स्टाईलने नागरीकांनी निषेध नोंदवला. कऱ्हाडकर अन्याय सहन करणार नाहीत, कऱ्हाडचे सेवक आहात मालक नाही, पाणी पुरवठा योजनेला अचानक तोटा का झाला, अशा आशयाचे एक सुज्ञ कऱ्हाडकर म्हणून फ्लेक्स लावून कऱ्हाडला एक वेळ पाणी पुरवठ्याचा निषेध करण्यात आला. शहरातील चौका चौकात निषेधाचे फ्लेक्स झळकले होते. शाहू, दत्त चौकासह शहरातील चौका चौकात लावलेल्या फ्लेक्सची चर्चा होती.

त्याचवेळी एकवेळ पाणी पुरवठ्याच्या निर्णयाविरोधात सकाळी अकराच्या सुमारास नागरीकांनी मुख्याधिकारी यांची भेट घेतली. त्यांच्या सोबत माजी नगरसेवक विजय वाटेगावकर, सौरभ पाटील, हणमंत पवार यांच्यासह गब्बर ग्रुपच्या सदस्यांचा त्यात समावेश होता. त्यांनी मुख्याधिकारी डाके यांच्यावर प्रश्नांचा भडीमार केला. प्रदीर्घ चर्चेनंतर मुख्याधिकारी डाके यांनी एकवेळच्या पाणी पुरवठ्याचा निर्णय मागे घेतल्याचे जाहीर केले. आलेल्या नागरीकांनाही त्यांनी पाणी कपातीचे आवाहन केले.

मंगळवार (ता. ११) पासून नेहमी प्रमाणे दोन वेळेला पाणी पुरवठा होणार असल्याचे यावेळी श्री. डाके यांनी जाहीर केले. ते म्हणाले, दोन वेळचा पाणी पुरवठा केवळ ४५ मिनीट असणार आहे. दोन्ही वेळचा पाणी पुरवठ्यातून २५ टक्के पाणी कपात होणार आहे. त्यामुळे त्याचाही फायदा होणार आहे. त्यासह एप्रिलपासून २४ तास पाणी योजना सुरू करणार आहे. त्याचे मीटर प्रमाणे बील दिले जाणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT