Solapur, 19 April : श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या मतमोजणीला शनिवारी (ता. 19 एप्रिल) सकाळी आठपासून सुरुवात झाली असून पहिल्या टप्प्यातच आमदार नारायण पाटील यांचे पॅनेल तब्बल दीड ते दोन हजार मतांनी आघाडीवर होते. नारायण पाटील गटाच्या तीन उमेदवारांनी दुपारी दोनपर्यंतच बाजी मारली आहे, त्यामुळे पाटील गटाने विधानसभेनंतर काखारखाना निवडणुकीतही विजयाच्या दिशेने घौडदौड सुरू केली आहे. मात्र विरोधातील उमेदवारांनीही कडवी लढत दिल्याचे मताच्या आकडेवारीवरून दिसून येत आहे.
आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या (Adinath Sugar Factory Election) जेऊर गटातील नारायण पाटील गटाचे तीनही उमेदवार विजय झाली आहेत. त्यात दत्तात्रेय रामचंद्र गव्हाणे, महादेव श्रीपती पोरे, श्रीमान त्रिंबक चौधरी यांचा समावेश आहे. दत्तात्रेय गव्हाणे यांनी सर्वाधिक ८६०७ मते घेऊन जेऊर गटातून बाजी मारली आहे. महादेव पोरे यांना ८१९५, तर श्रीमान चौधरी यांना ८०६१ मते पडली आहेत.
आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत गुरुवारी ६०.७९ टक्के मतदान झाले होते. आमदार नारायण पाटील (Narayan Patil), माजी आमदार संजय शिंदे, दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रा. रामदास झोळ यांचे तीन पॅनेल आदिनाथ कारखान्या निवडणुकीच्या रिंगणात होते. मात्र, खरी लढत ही आमदार नारायण पाटील आणि माजी आमदार संजय शिंदे यांच्या पॅनेलमध्येच झाली.
आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलला माजी आमदार जयवंतराव जगताप, मोहिते पाटील समर्थकांची साथ होती. गेली वीस वर्षांपेक्षाही अधिक काळ काखान्यावर सत्ता असणाऱ्या बागल गटानेही शेवटपर्यंत आपले पत्ते खुले केले नव्हते. मात्र, त्यांनीही नारायण पाटील गटाला पाठिंबा दिल्याचे मतदानादिवशी स्पष्ट झाले, त्यामुळे नारायण पाटील यांच्या पॅनेलचे पारडे निवडणुकीत जड होते, यावर मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यातच शिक्कामोर्तब झाले.
आदिनाथ सहकारी साखर काखान्याच्या मतमोजणीला आज सकाळी आठपासून सुरुवात झाली. कारखान्याचा पहिला निकाल दोनपर्यंत हाती आला. त्यात पहिलाच निकाल आमदार नारायण पाटील गटाच्या बाजूने लागला आहे. त्यात जेऊर गटातील तीनही उमेदवार सरासरी आठ हजार मते घेऊन विजय झाली. त्यांचे निकटवर्तीय विरोधी उमेदवारांनीही सरासरी ६८०० मते घेतली आहेत, त्यामुळे संजय शिंदे गटानेही कडवी लढत दिल्याचे जेऊर गटातून तरी दिसून येत आहे.
संजय शिंदे हे मागील टर्ममध्ये करमाळ्याचे अपक्ष आमदार होते. मात्र, आमदारीकच्या काळात त्यांनी आदिनाथ कारखान्याच्या राजकारणात लक्ष घातले नव्हते. मात्र, विधानसभेच्या २०२४ च्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर माजी आमदार शिंदे यांनी कारखान्याची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला होता.
माजी आमदार संजय शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पॅनेलला आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्राचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांचा पाठिंबा होता. गुळवे यांनी विधानसभा निवडणुकीत आमदार नारायण पाटील यांच्यासोबत होते. मात्र, आदिनाथ सहकारी साखर काखान्याच्या निवडणुकीत त्यांनी संजय शिंदे यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला होता.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.