मंगळवेढा (जि. सोलापूर) : पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक हातात घालून लढणारे माजी आमदार प्रशांत परिचारक (Prashant Paricharak) आणि आमदार समाधान आवताडे (Samadhan Avtade) गटात अखेर फूट पडली आहे. मंगळवेढा तालुक्यातील श्री संत दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी माजी आमदार परिचारक गटाने चक्क भगिरथ भालके (Bhagirath Bhalke) गटाशी युती केली आहे. परिचारक-भालके गट आता आवताडे गटाला टक्कर देणार आहे. परिचारक गटाने आमदार समाधान आवताडे गटाबरोबर फारकत घेत नऊ जागा भालके गटाला देत १० जागांवर लढण्याचा निर्णय घेतला आहे. (Alliance of Prashant Paricharak-Bhagirath Bhalke group in Damaji Sugar Factory election)
परिचारक आणि भालके गटाने एक जागा बबनराव आवताडे यांचे चिरंजीव सिद्धेश्वर आवताडे यांना पाठिंबा दिला आहे. विशेष म्हणजे भाजपचे आमदार समाधान आतवाडे यांच्या विरोधात भाजपचे तालुकाध्यक्ष गौरीशंकर बुरकूल हे परिचारक-भालके गटातून लढत आहे. दरम्यान, कारखान्याच्या निवडणुकीत सत्ताधारी आमदार आवताडे गटाने ओबीसी प्रवर्गातील एक जागा बिनविरोध करत विजयी सलामी दिली होती.
दामाजी सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. त्यामुळे उपविभागीय कार्यालयाला जत्रेचे स्वरूप आले होते. या निवडणुकीच्या आखाड्यात अर्ज दाखल केलेल्या आमदार समाधान आवताडे व परिचारक गटाच्या उमेदवारावर कुणीही हरकत घेतली नाही. त्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात अर्ज शिल्लक होते. समविचारी गटाचे प्रमुख मातब्बरांचे अर्ज छाननीत बाद झाले होते. त्यांना तगड्या उमेदवाराचा शोध घ्यावा लागला. पण ऐनवेळी परिचारक गटाने हात दिल्याने सत्ताधारी गटाला आव्हान देणे भालके गटाला सोपे गेले. दरम्यान या नव्या युतीमध्ये परिचारक गट १० जागा जागा लढवत आहे, तर भालके गट ९ जागांवर लढत आहे.
परिचारक गटाने यापूर्वी युटोपियन कारखान्यावर तालुक्यातील प्रमुख कार्यकत्याची साखर कारखान्याच्या निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बैठक घेतली. त्याबाबतचा निर्णय प्रशांत परिचारकांवर सोपवला होता. समविचारी पॅनेलच्या बैठकीत माजी अध्यक्ष अॅड नंदकुमार पवार यांनीही परिचारकांनी कार्यकर्त्याच्या भावनांचा विचार करावा. मंगळवेढा तालुक्यातील कारखानदारी वाचवण्यासाठी लक्ष द्यावे, त्यामुळे कारखानदारी चालविणे व टिकवण्याच्या दृष्टीकोनातून परिचारकांची भूमिका महत्वाची मानली जाऊ लागली होती.
सध्या साखर कारखाना चालविणे सोपे नाही, फार अडचणीचे झाले आहे. साखरेचे भाव वारंवार कमी जास्त होतात. कर्मचाऱ्यांचे पगार, ऊसबिल वेळेवर देण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. दामाजी कारखान्याबाबत पक्षीय राजकारण न आणता हा कारखाना टिकला पाहिजे. या कारखान्याने अनेकांचे संसार उभे केले, ते मोडता कामा नये, असे सांगत तूर्त अर्ज दाखल करा. छाननीनंतर बैठक घेऊन भूमिका जाहीर करण्याची भूमिका घेतली होती. त्यानंतर परिचारक गटाने आज कट्टर विरोधक भालके गटाशी युती करत, गोपाळ भगरे, गौरीशंकर बुरकुल, राजेंद्र पाटील, शिवानंद पाटील, औदुंबर वाडदेकर, रेवणसिद्ध लिगाडे, गौडाप्पा बिराजदार, महादेव लुगडे, दिगंबर भाकरे, तानाजी कांबळे हे उमेदवार आखाड्यात उतरवले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.