Kolhapur News : आगामी विधानसभा निवडणुका नोव्हेंबरमध्ये होण्याची शक्यता आहे.त्याच पार्श्वभूमीवर महायुती, महाविकास आघाडीसह सर्वच राजकीय पक्षांनी दौरे, बैठका,मेळावे, विविध यात्रा यांच्यासह जोरदार तयारी सुरू केली आहे.
याचधर्तीवर केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप नेते अमित शाह (Amit Shah) यांनी विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रावर पूर्णत:फोकस केला आहे. कोल्हापूरमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांचा बुधवारी (ता.25) मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातील दिग्गज नेते, पदाधिकारी यांची फौज अवतरली होती. त्यावेळी अमित शाह यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांना बूस्टर डोस दिला आहे.
भाजपचे (BJP) चाणक्य अमित शाह भाजपच्या कार्यकर्त्यांना आगामी विधानसभा निवडणुकीतील विजयाचा कानमंत्रही दिला.ते म्हणाले,2024 ला भारतीय जनता पार्टी आणि मित्रपक्षांचे सरकार आणायचं, हा संकल्प घेऊन आपण सगळे इथे आला आहात.लोकसभेत अपेक्षित यश मिळालं नाही, त्यामुळे कार्यकर्ते थोडे उदास झाले.मात्र, आपण राजकीय कार्यकर्ते आहोत. आपल्याला राजकीय विज्ञान आणि गणित समजलं पाहिजे.
आज लोकसभेत सत्ताधारी गटाच्या बाकावर पंतप्रधान नरेंद्र मोदी आहे तर विरोधकांच्या बाकावर राहुल गांधी आणि त्यांची टीम आहे.मग आता सांगा ही निवडणूक कोण जिंकलं.साठ वर्षानंतर पहिल्यांदा एक नेता सलग तीन वेळा निवडणुका जिंकून पंतप्रधान झाला.मात्र, माहीत नाही का आपण सगळेच जण लोकसभा निवडणुकीनंतर उदास होऊन बसलो आहोत अशा शब्दांत अमित शाहांनी कार्यकर्त्यांमध्ये हुंकार भरला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांच्यावर टीकेची झोड उठवली.ते म्हणाले, तुम्ही आणि तुमचे मित्रपक्ष मिळून जेवढ्या जागा जिंकल्या आहेत, तेवढ्या एकट्या भाजपच्या जागा आहेत. राहुल बाबा..हे तुम्ही लक्षात ठेवा, तुमच्या आयुष्यातील हे सर्वात मोठे यश आहे. यानंतर भारतीय जनता पार्टी ही संधी तुम्हाला देणार नाही.पण या विरोधी पक्षांच्या यशामुळे भाजपचे कार्यकर्ते उदास झाले आहेत. आम्ही असे यश -अपयश खूप पाहिले असल्याचे अनुभवी बोलही शाहांनी उपस्थितांना ऐकवले.
आमचं तारुण्यच पक्षाच्या अपयशात गेलं. निवडणुकीत अपयश आल्यानंतर निराश ते लोक होतात, जे पद मिळवण्यासाठी निवडणूक लढवतात.भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते देशाला सुरक्षित करण्यासाठी निवडणूक लढवतात.पक्षाची सुरुवात करताना हा विचार सुद्धा केला नव्हता की, पक्ष सत्तेत येईल. मात्र, आमचा संघर्ष सुरू राहिला आणि अखेर यश आलं असेही शाह यांनी यावेळी सांंगितले.
अमित शाह म्हणाले, आमची सत्ता येताच 370 कलम हटवलं, राम मंदिर बांधले CAA कायदा आणला.राहुल बाबा...तुम्ही कितीही विरोध करा. आम्ही वक्त बोर्डाचा कायदा आणणार म्हणजे आणणारच.भारताच्या मूळ विचारधारेला आम्ही देशाची अस्मिता बनवलं आहे.नक्षलवाद,आतंकवाद आपण दहा वर्षांत पूर्णतः संपवल्याचे शाहांनी आपल्या भाषणात ठणकावून सांगितले.
आम्हाला भारतमातेचा आशीर्वाद आहे, त्यामुळे 2024 च्या निवडणुकीत आम्हाला कोणीच हरवू शकत नाही.विरोधकांच्या रणनीतीला बारकाईने उत्तर आपण दिले पाहिजे. मी इथे भाषण द्यायला आलो नाही तुम्हाला काम द्यायला आलो आहे. मंडल अध्यक्षांनी शक्ती केंद्रांच्या बैठका आता बोलवायच्या आहेत. येत्या काळात शक्ती केंद्रांना रिचार्ज करायचा आहे.
शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या बूथ लेवलवरच्या कार्यकर्त्यांना भाजपशी जोडायचं आहे.तुम्हाला वाटत असेल, बाहेरच्या लोकांना घेतलं तर आपलं स्थान कमी होईल पण असं काही होणार नाही.गेली दहा पंधरा वर्षे पक्षाशी जोडले गेलेल्यांना पक्षानं काही दिलं नाही.या दोन्ही पक्षांच्या इमारतीची नाव आपल्याला समाप्त करायचे आहे.दहा वर्षांत तुम्हाला काही मिळालं नाही तर काल येणारा कसं घेऊन जाईल.
महाराष्ट्रात भारतीय जनता पक्षाचे पूर्ण बहुमत आणायचं असेल तर विरोधकांची नाव कमकुवत केलीच पाहिजे. पक्ष मागणाऱ्याला काही देत नाही. पण न मागणाऱ्याला शोधून देतो.आपण कमळ, धनुष्यबाण आणि घड्याळ ही तिन्ही चिन्हं एकच मानून काम केलं पाहिजे.आपणच घड्याळ आणि धनुष्यबाणाला हरवलं तर जिंकणार कोण आहे असा सवालही अमित शाहांनी यावेळी उपस्थित केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.