MNS Amit Thackeray sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Police FIR : 'राज'पुत्राला पोलिसांचा दणका, मोदींचा फोटो हटवणे पडले महागात; गुन्हा दाखल

Police Complaint Against Amit Thackeray : पुण्यातील शासकीय तंत्रशिक्षण महाविद्यालयातील कार्यालयातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवण्यावरून आता राजकीय वाद होताना दिसत आहे.

Sudesh Mitkar

Pune News : पुण्यात मनसे नेते अमित ठाकरे यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. शासकीय तंत्रशिक्षण महाविद्यालयातील कार्यालयातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवण्यास सांगितल्याप्रकरणी अमित ठाकरे यांच्यासह २५ जणाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चतु:शृंगी पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

अमित ठाकरे सोमवारी पुणे दौऱ्यावर आले आहेत. या दौऱ्यात ते पुण्यातील सात महाविद्यालयांना भेटी देऊन जेन-झी विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. त्याच पार्श्वभूमीवर त्यांनी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक महाविद्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेत महाविद्यालयातील वसतिगृह, खानावळ आणि स्वच्छतागृहांची पाहणी केली.

दरम्यान, महाविद्यालयातील एका कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या छायाचित्रांसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्यात आल्याचे अमित ठाकरे यांच्या निदर्शनास आणून देण्यात आले. त्यानंतर अमित ठाकरे यांनी मोदींच्या फोटोबाबत नाराजी व्यक्त करत तो हटवण्याच्या सूचना मनसे कार्यकर्त्यांना दिल्या. त्यानंतर कार्यकर्त्याने कार्यालयाच्या भिंतीवरील मोदींचा फोटो खाली उतरवला.

फोटो हटवतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला. या घटनेनंतर भाजपकडूनही संताप व्यक्त करण्यात येत आहे. याबाबत महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी चतु:शृंगी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवण्यास सांगितल्याप्रकरणी अमित ठाकरे आणि संबंधित मनसे कार्यकर्त्यांविरोधात ही तक्रार करण्यात आली आहे. तक्रारीची दखल घेत पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अमित ठाकरे यांच्यासह २५ जणाविरोधात चतुरशृंगी पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून विनापरवाना महाविद्यालयात दाखल होणे आणि प्राचार्यांना धमकी देणे असा ठपका ठेवण्यात आला आहे.

दुसरीकडे, अमित ठाकरे यांनी याच दौऱ्यात महाविद्यालय प्रशासनाला विद्यार्थ्यांच्या विविध प्रश्नांवरून धारेवर धरले. वसतिगृहाची खराब अवस्था, अस्वच्छ स्वच्छतागृहे, खानावळीतील निकृष्ट दर्जाचे जेवण आणि सीसीटीव्ही कॅमेऱ्यांसह विविध समस्यांवर त्यांनी प्रशासनाकडे जाब विचारला.

मात्र, विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरून सुरू झालेला अमित ठाकरेंचा पुणे दौरा आता मोदींचा फोटो हटवण्याच्या मुद्द्यावरून पोलिस तक्रारीपर्यंत पोहोचला आहे. तक्रारीवरून नेमका कोणता गुन्हा दाखल केला जातो आणि त्यात अमित ठाकरे यांच्यासह कोणाकोणाचा समावेश होतो, याकडे आता राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT