Amit Thackeray News : कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांची दुरवस्था आणि खड्ड्यांच्या प्रश्नावर महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष अमित ठाकरे यांनी सत्ताधाऱ्यांना थेट सवाल करत सरकारवर निशाणा साधला. “वर्षानुवर्षे हे शहर घाण होत चालले आहे. रस्त्यावर एका ठिकाणी डांबराचा पॅच, दुसऱ्या ठिकाणी पेव्हर ब्लॉक आणि तिसऱ्या ठिकाणी काँक्रीटचा पॅच दिसतो. हा कोणत्या प्रकारचा रस्ता आहे? असा रस्ता कसा बनवू शकतात?” असा संतप्त सवाल ठाकरे यांनी केला.
मनविसेच्या सदस्य नोंदणी अभियानाच्या निमित्ताने तसेच विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी अमित ठाकरे यांनी गुरुवारी डोंबिवली आणि कल्याणचा दौरा केला. यावेळी त्यांनी डोंबिवलीतील प्रगती महाविद्यालय, पेंढरकर महाविद्यालय तसेच कल्याणमधील बिर्ला महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशी संवाद साधला. या महाविद्यालयांमध्ये मनविसेच्या कॉलेज युनिटची स्थापना करण्यात आली असून, त्याचे उद्घाटन अमित ठाकरे यांच्या हस्ते झाले.
यावेळी मनसे नेते राजू पाटील, मनविसेचे राज्य सरचिटणीस संदीप पाचंगे, जिल्हाध्यक्ष धनंजय गुरव, डोंबिवली शहराध्यक्ष प्रतीक देशपांडे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
डोंबिवलीत येताना रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि ठिकठिकाणी पडलेले खड्डे पाहून ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली. “मी विद्यार्थ्यांच्या समस्या ऐकण्यासाठी आलो होतो. मात्र, येताना रस्त्यांची दुरवस्था पाहिली,” असे त्यांनी सांगितले.
कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांच्या प्रश्नावरून स्थानिक लोकप्रतिनिधींना जाब विचारण्याचे आवाहनही त्यांनी केले. “या ठिकाणी उपमुख्यमंत्र्यांचा मुलगा खासदार आहे. इथले खासदार आणि आमदार कोण आहेत, त्यांना हे प्रश्न विचारले पाहिजेत,” असे म्हणत त्यांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केले.
रस्त्यांचे खड्डे हा केवळ झेन झी किंवा अल्फा झेनचा प्रश्न नसून सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असल्याचे ठाकरे यांनी स्पष्ट केले. रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा मुद्दाही त्यांनी उपस्थित केला. “ट्रेनला दरवाजे नाहीत म्हणून दररोज आठ लोक मरत आहेत. ही विचित्र परिस्थिती आहे,” असे ते म्हणाले.
.
“पत्रकार आणि आपण सर्वांनी मिळून आता सरकारला प्रश्न विचारले पाहिजेत,” असे आवाहन करत त्यांनी नाशिकमधील मनसेच्या सत्ताकाळाचा दाखला दिला. “नाशिकमध्ये आमची सत्ता होती, तेव्हा रस्त्यावर एकही खड्डा नव्हता,” असा दावा त्यांनी केला.
दरम्यान, विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर त्यांच्या अनेक समस्या सहजपणे सोडवता येण्यासारख्या आहेत. सरकार आणि प्रशासनाने इच्छाशक्ती दाखवून विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे गांभीर्याने पाहिले, तर ते मार्गी लावणे अवघड नसल्याचेही अमित ठाकरे यांनी सांगितले
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.