Pune Political Crime News : पुण्यातील शासकीय तंत्रशिक्षण महाविद्यालयातील कार्यालयातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो हटवण्यावरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. यावरून भाजपने जोरदार टीका केली असून, तीव्र संताप व्यक्त करण्यात आला आहे. तर, या प्रकरणात अमित ठाकरे यांच्यासह २५ जणांविरोधात चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, चतु:शृंगी पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर मध्यरात्री मोठी कारवाई करत मनसेच्या दोन पदाधिकाऱ्यांना बेड्या ठोकल्या आहेत. मनसे विद्यार्थी संघटनेच्या प्रशांत कनोजिया आणि विक्रांत भिलारे या दोन पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे.
मनसे नेते अमित ठाकरे सोमवारी (ता. ३१) पुणे दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी पुण्यातील सात महाविद्यालयांना भेटी देऊन जेन-झी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. दरम्यान, आता त्यांनी गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक महाविद्यालयाला दिलेल्या भेटीवरून वाद सुरू झाला आहे.
कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या फोटोंसोबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो लावण्यात आल्याने अमित ठाकरे यांनी आक्षेप घेत, तो हटवण्याचे सांगितले. यावरून मनसे पदाधिकाऱ्यांनी तो हटवला.
हीच कृती आता वादाचे कारण ठरली असून, त्यांच्यासह २० ते २५ मनसैनिकांवर विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला. कॉलेजचे प्राचार्य डॉ. राजेंद्र पाटील यांनी याबाबत तक्रार दिली होती. विनापरवानगी बेकायदेशीरपणे महाविद्यालयाच्या आवारात आणि प्राचार्यांच्या केबिनमध्ये प्रवेश करणे, प्रचंड घोषणाबाजी करण्यासह प्राचार्यांना व तिथल्या कर्मचाऱ्यांना दमदाटी करत शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा ठपका त्यांच्यासह मनसे कार्यकर्त्यांवर ठेवण्यात आला आहे.
यानंतर पुणे पोलिसांनी या प्रकरणात मोठी आणि धडक कारवाई करत मनसेला दणका दिला आहे. चतु:शृंगी पोलिसांनी मध्यरात्री उशिरा मनविसेच्या दोन प्रमुख पदाधिकाऱ्यांना अटक केली आहे. प्रशांत कनोजिया आणि विक्रांत भिलारे अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या घटनेमुळे पुण्यातील राजकीय वातावरण तापले असून, मनसेत प्रचंड संतापाची लाट पसरली आहे. तसेच, पुणे पोलिसांच्या या तातडीच्या कारवाईमुळे राजकीय वर्तुळासह शहरभर एकच खळबळ उडाली आहे.
अमित ठाकरेंना अटक होणार?
दरम्यान, एकीकडे प्रशांत कनोजिया आणि विक्रांत भिलारे या दोन प्रमुख पदाधिकाऱ्यांना पोलिसांनी अटक केली आहे. तर, दुसरीकडे अमित ठाकरेंवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. मात्र, त्यांना पोलीस नोटीस पाठवू शकतात. दाखल करण्यात आलेल्या कलमांनुसार त्यांची चौकशी होऊ शकते. त्यानंतरच त्यांच्या अटकेबाबतचा पोलिस निर्णय घेऊ शकतात.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.