Anil Babar, Amol Kolhe, Shambhuraj Desai, Jaykumar Gore
Anil Babar, Amol Kolhe, Shambhuraj Desai, Jaykumar Gore Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Amol Kolhe in Satara : साताऱ्यात अमोल कोल्हे अन् देसाई, गोरे, पाटलांत रंगल्या गप्पा

सरकारनामा ब्युरो

Satara News : अमोल कोल्हे यांनी त्यांच्या फेसबुकवर जागतिक पुस्तक दिनानिमित्त दोन फोटो शेअर केले आहेत. पहिल्या फोटोत त्यांच्या हातात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या भाषण संग्रहाचे 'नेमकची बोलणे' हे पुस्तक आहे. तर दुसऱ्या फोटोत नलिन मेहता यांचे 'द न्यू बीजेपी' हे पुस्तक दिसत आहे. त्यांच्या या पोस्टमुळे राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.

या चर्चांवर अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी स्पष्टीकरण दिले. ते म्हणाले, "माझ्या पोस्टमध्ये एक पुस्तक शरद पवार यांच्या भाषण संग्रहाचे 'नेमकची बोलणे' आणि दुसरे पुस्तक नलिन मेहता यांचे 'द न्यू बीजेपी' आहे. यातून एवढंच सुचवायचे आहे की की विचारधारा कुठलीही असली तरी तिचा विरोध करायचा असला तर तिचा आधी अभ्यास करावा लागतो. हे जास्त महत्वाचे आहे. हे फक्त तुमच्या वाचनातून येते. हे तुमच्या साहित्यातून येते. जेव्हा साहित्यातून तुमचे समाजमन हे सुसंस्कृत बनत जाते, तेव्हा न कळत राजकीय साक्षरता येते."

दरम्यान, डॉ. कोल्हे यांच्या भाजप (BJP), शिंदे गटातील नेत्यांसोबत वाढलेल्या गाठभेटी आणि दिलेल्या प्रतिक्रियेनंतरही पुन्हा उलटसुलट चर्चांना सुरूवात झाली आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी (ता. २४) सातारा येथील मंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांच्या भेटीने पुन्हा एकदा डॉ. कोल्हे चर्चेत आले आहेत. सातारा येथे शिवसेना, भाजप, राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांनी आमदार कोल्हे यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांच्यात कोपरखळ्या अन् हास्यविनोद रंगले होते.

कऱ्हाडला शिवपुत्र संभाजी महानाट्याचा प्रयोग २८ एप्रिल ते ३ मे या कालावधीत होत आहे. याचे निमंत्रण देण्यासाठी डॉ. कोल्हे सोमावरी साताऱ्यात आले होते. यानिमित्त त्यांनी शासकीय विश्रामगृहात पालकमंत्री देसाई यांची भेट घेतली. या वेळी आमदार अनिल बाबर, भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार जयकुमार गोरे (Jaykumar Gore), आमदार बाळासाहेब पाटील, आमदार दीपक चव्हाण उपस्थित होते. या नेत्यांत विविध विषयावर दिलखुलास गप्पा रंगल्या होत्या.

या गप्पानंतर डॉ. कोल्हे यांच्यासोबत मंत्री देसाई, आमदार गोरे, आमदार अनिल बाबर यांच्यात काहीवेळ बंद दाराआड चर्चा झाली. या चर्चेचा विषय समजू शकला नाही. दरम्यान, डॉ. कोल्हे यांनी 'न्यू बीजेपी' पुस्तक वाचल्यानंतर सोशल मीडियावर दिलेल्या प्रतिक्रियेनंतर त्यांच्या भाजप व शिवसेनेच्या नेत्यांशी गाठीभेटी वाढल्या आहेत. आज येथील विश्रामगृहात डॉ. कोल्हे यांच्याशी नेत्यांनी दिलखुलास गप्पा मारल्या. या वेळी उपस्थित नेते मंडळी कोपरखळ्या व हास्य विनोदात रंगले होते.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT