Anil Babar Latest News
Anil Babar Latest News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

बंड फसले तरी अनिल बाबर भाजपमध्ये जाणार...

सरकारनामा ब्यूरो

सांगली : शिवसेनेने (Shivsena) ज्या १६ बंडखोर आमदारांच्या बडतर्फीचा प्रस्ताव सादर केला आहे, त्यात खानापूरचे आमदार अनिल बाबर (Anil Babar) यांचा समावेश आहे. त्यांचा काँग्रेस, 'राष्ट्रवादी', (NCP) दोनवेळा बंडखोरीमार्गे शिवसेना असा प्रवास झाला. ते चारवेळा आमदार झाले आहेत. खानापूर मतदारसंघातील त्यांचे प्रमुख विरोधक, 'राष्ट्रवादी'चे नेते, माजी आमदार सदाशिवराव पाटील यांना पालकमंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांच्याकडून दिले जाणारे बळ आणि शिवसेनेची होणारी कोंडी हे बाबर यांच्या बंडाचे कारण ठरले. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचे बंड यशस्वी ठरले किंवा फसले तरी बाबर भविष्यात भाजपमध्ये (BJP) जातील, अशी शक्यता अधिक आहे. (Anil Babar Latest Marathi News)

अनिल बाबर यांच्या बंडाचे जिल्ह्यात कोणाला आश्‍चर्य वाटले नाही. त्यांच्या समर्थकांना आणि जिल्ह्यातील शिवसैनिकांनाही त्याचा धक्का बसला नाही. साहजिकच, बाबर यांना केंद्रस्थानी ठेवून जिल्ह्यात कोणती प्रतिक्रिया उमटली नाही. खानापूर, आटपाडी येथे 'बाबर हाच आमचा पक्ष', अशी भूमिका त्यांच्या समर्थकांनी घेतली. तेथे 'बाबर गट' हाच पक्ष आहे. जिल्ह्याच्या राजकारणात त्यांची फार ढवळाढवळ नसते. गेल्या साडेसात वर्षात जिल्ह्यातील शिवसैनिकांशी त्यांचा फारसा संबंधही आला नाही. बाबर तळागाळातून आलेले नेते असल्याने पक्षापेक्षा स्वतःच्या राजकीय कौशल्यावर त्यांनी कार्यकर्त्यांची बांधणी केली आहे. त्यामुळेच त्यांनी सत्तेविरुद्ध बंडाचे धाडस केले.

गार्डी या छोट्या गावातील अनिल बाबर राजकीय वारसा नसताना यशस्वी ठरले. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, माजी आमदार संपतराव माने, आर. आर. पाटील यांचा स्नेह आणि पाठबळ त्यांना मिळाले. टेंभू उपसा सिंचन योजनेसाठी त्यांनी मेहनत घेतली. टेंभूसाठी निधी, हा त्यांच्या राजकारणाचा केंद्रबिंदू. ते आधी जिल्हा परिषदेत यशस्वी ठरले. सन १९९० ला काँग्रेसकडून आमदार झाले. दिवंगत नेते आर. आर. पाटील यांना ते भावासारखे. ते आबांसोबत ‘राष्ट्रवादी’त गेले. १९९९ ला आमदार झाले. काँग्रेस-राष्ट्रवादीची आघाडी झाली. २००४ ला खानापूर-आटपाडी मतदार संघ काँग्रेसच्या वाट्याला गेला. बाबर यांनी बंड केले. त्यांना पराभव पत्करावा लागला. पुन्हा २००९ ली तीच स्थिती. तेव्हांही त्यांनी बंड केले. या दोन्ही बंडांमागे अर्थातच 'राष्ट्रवादी'ची व पर्यायाने आर. आर. पाटील यांची ताकद व रसद होती. मात्र सन २००९ च्या निवडणुकीत आबांनी पूर्ण बळ दिले नाही, ही सल बाबर यांच्या मनात राहिली. ते सततच्या बंडाला वैतागले होते. त्यांनी युतीत जाण्याचा निर्णय घेतला. मतदारसंघ शिवसेनेकडे असल्याने तो पर्याय निवडत २०१४ ला हाती शिवबंधन बांधले. त्या निवडणुकीत युती तुटली, तरी बाबर यांनी तीन पक्षांच्या विरोधात ताकद लावून लढा दिला आणि तो जिंकला.

युतीची सत्ता असताना अनिल बाबर शिवसेनेत फार रमले नाहीत. त्यांची उठबस भाजपमध्ये अधिक. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी स्नेह. २०१९ ला ते भाजपमध्ये जातील, अशी शक्यता होती. परंतु मतदारसंघांच्या वाटणीचा मुद्दा पुढे आला आणि त्यांनी शिवसेनेत राहणे पसंत केले. पुढे महाविकास आघाडी करताना ‘नको’ म्हणणाऱ्या किंवा सावध भूमिका घेणाऱ्यांपैकी ते एक होते. गेल्या अडीच वर्षात जयंत पाटील यांनी सदाशिवराव पाटील यांना बाबर यांच्याविरोधात ताकद दिली. जलसंपदा मंत्री म्हणून पाटील यांनी टेंभू योजनेला निधी दिली, मात्र श्रेयवाद आलाच. अनिल बाबर हे पूर्वाश्रमीचे आबा गटाचे असल्याने जयंतरावांशी त्यांचे 'राष्ट्रवादी'त असतानाही सख्य नव्हते.

आता एकनाथ शिंदे यांचे बंड यशस्वी झाले तर बाबर भाजपच्या अधिक जवळ जातील आणि फसले तरी बाबर भाजपलाच जवळ करतील. शिवसेनेत परतीचे दोर कापले गेले आहेत. स्थानिक पातळीवर भाजपचे खासदार संजय पाटील यांच्याशी त्यांचा संघर्ष होतोय. भाजपचे माजी आमदार राजेंद्रअण्णा देशमुख गटही त्यांच्यावर नाराज आहे. फडणवीस यांनी ठरवले तर भाजपमध्ये बाबर यांना ‘स्पेस’ नक्कीच आहे. ते भाजपचे पुढचे उमेदवार ठरू शकतात. दरम्यान बाबरांचे बंड अनपेक्षित नाही. जिल्ह्यात तशी काही प्रतिक्रिया व्यक्त झाली नसून खानापूर, आटपाडी येथे मात्र बाबरांना पाठिंबा मिळत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT