Anil Madnaik
Anil Madnaik  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

राजू शेट्टींच्या कट्टर समर्थकाने एका दिवसात सोडले सत्तेचे पद!

सरकारनामा ब्यूरो

जयसिंगपूर (जि. कोल्हापूर) : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख आणि माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी महाविकास आघाडीतून (Mahavikas Aghadi) बाहेर पडण्याचा निर्णय महिनाभरापूर्वी घेतला आहे. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीच्या (NCP) कोट्यातून विधान परिषदेसाठी पाठविण्यात आलेल्या आमदारकीच्या यादीतून आपले नाव वगळावे, यासाठी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटून पत्र दिले आहे. त्यानंतर त्यांचे कट्टर समर्थक, ‘स्वाभिमानी‘चे नेते सावकर मादनाईक यांनीही सत्तेचे पद असलेल्या कोल्हापूर (Kolhapur) जिल्हा नियोजन समिती सदस्यत्वाचा राजीनामा आज दिला आहे. (Anil Madnaik resigns from Kolhapur District Planning Committee)

कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी सभापती, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते अनिल ऊर्फ सावकर मादनाईक यांनी जिल्हा नियोजन समिती सदस्यत्वाचा राजीनामा जिल्हाधिकारी यांच्याकडे आज (ता. १३ मे) दिला. विशेष निमंत्रित सदस्य म्हणून गुरुवारी (ता. १२ मे) त्यांच्या नियुक्तीची घोषणा झाली होती. सहा महिन्यांपूर्वी मुख्यमंत्र्यांकडे यादी पाठवली होती, त्यावर गुरुवारी शिक्कामोर्तब झाले होते. त्यामुळे राजू शेट्टी यांचा उजवा म्हणून ओळख असलेल्या मादनाईक यांनी अवघ्या एका दिवसांत सत्तेच्या पदावर पाणी सोडले आहे.

दरम्यान, कोल्हापूरचे सहायक जिल्हा नियोजन अधिकारी गजानन पाटील यांच्याकडे सावकार मादनाईक यांनी राजीनाम्याचे पत्र दिले आहे. ‘स्वाभिमानी शेतकरी संघटना महाविकास आघाडीतून बाहेर पडली आहे. शेतकऱ्यांचा विश्वासघात करणाऱ्या महाविकास आघाडी सरकारकडून आम्हाला कोणतेही पद नको आहे. शेतकरी, पूरग्रस्त कामगार, शेतमजूर यांना या सरकारने न्याय दिलेला नाही. उस उत्पादकांच्या अन्नात विष कालवणाचे काम या सरकारने केले आहे. त्यामुळे जिल्हा नियोजन समिती सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे, अशी प्रतिक्रिया सावकार मादनाईक यांनी राजीनाम्यानंतर बोलताना दिली.

माजी खासदार राजू शेट्टी यांनीही महाविकास आघाडीकडून आपली फसवणूक झाल्याचे सांगत आघाडीतून बाहेर पडण्याचा निर्णय कोल्हापुरातून जाहीर केला होता. भाजप आणि काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीकडून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसली जात आहे. त्यामुळे यापुढची वाटचाल ही स्वबळावर करण्याचा निर्णय राजू शेट्टी यांनी त्यावेळी जाहीर केला होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT