Kalyanrao Kale
Kalyanrao Kale Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

राष्ट्रवादीच्या कल्याणराव काळेंच्या दारात ईडी : पक्षाच्याच माजी पदाधिकाऱ्याची तक्रार

सरकारनामा ब्यूरो

पंढरपूर : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते कल्याणराव काळे (Kalyanrao Kale) यांनी सीतराम साखर कारखान्यात जो काही महाघोटाळा केलेला आहे. त्याची सक्तवसुली संचनालय (ईडी), प्राप्तीकर विभाग (इन्कम टॅक्स), कंपनी कार्यालय तसेच पोलिसांत तक्रार दिली आहे. या संस्थांकडून त्याचा तपास सुरू आहे, त्यामुळे ईडी ही आता कल्याणराव काळे यांच्या उंबरठ्यावर आहे, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे पंढरपूरचे माजी तालुकाध्यक्ष दीपक पवार यांनी केला आहे. (Another NCP leader on ED's radar; Complaint of a former office bearer of the party)

सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या सभेत दीपक पवार यांचे कारखान्याचे सभासदत्व रद्द करण्यात आले आहे. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत पवार यांनी वरील गौप्यस्फोट केला आहे. दीपक पवार म्हणाले की, सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याने माझे सभासदत्व रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय बेकायदेशीर आहे, त्याविरोधात आम्ही प्रादेशिक सहसंचालक आणि निबंधक, सोलापूर तसेच साखर आयुक्त पुणे, सहकार आयुक्त आणि सहकर मंत्री यांच्याकडे दाद मागणार आहोत. त्यामध्ये कायदेशीर विजय आमचाच असेल, या प्रकरणात सत्याचाच विजय होईल, असा दावाही त्यांनी केला.

कल्याणराव काळे यांना पराभवाची चाहूल लागल्यामुळेच सहकार शिरोमणी कारखान्यातून माझे सभासदत्व रद्द करण्याचा डाव रचला आहे. मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबीयांतील व्यक्तींना उमेदवारी न देता सामान्य माणसाला उभे करून निवडणूक लढविण्याची आमची तयारी आहे. पण, त्यासाठी काळे यांची तयारी आहे का, ते त्यांनी जनतेला सांगावे. सीताराम कारखान्याबाबत मी ईडी, इन्कम टॅक्स आणि कंपनी कार्यालय, पोलिसांत ज्या तक्रारी केलेल्या आहेत. या सर्वच विभागाकडून त्यांची चौकशी सुरू आहे. सभासदत्व कमी करून ते मला काखान्यातून बाजूला करू इच्छित आहेत. पण, त्यांनीदेखील निवडणुकीपर्यंत मैदानात राहावे; अन्यथा या संस्थांच्या एखाद्या जाळ्यात अडकले तर अडचणीचे होईल, असा इशाराही पवार यांनी कल्याणराव काळे यांना दिला.

कल्याणराव काळे यांनी सीताराम कारखान्यात जो काही महाघोटाळा केला आहे. त्याची वेगवेगळ्या तपास यंत्रणांनी चौकशी सुरू ठेवलेली आहे. ईडी ही आता कल्याणराव काळे यांच्या उंबरठ्यावर आहे. याची चाहूल आणि जाणीव त्यांना झालेली आहे, हे आजच्या निर्णयावरून दिसत आहे, असा टोलाही पवार यांनी लगावला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT