Arbaz Shaikh: सैराट सिनेमात परशाच्या मित्राचं म्हणजेच सल्याचं पात्र साकारलेल्या अभिनेता अरबाज शेख याच्या आवाहनाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिसाद दिला आहे. एकनाथ शिंदे यांनी त्याला मदत देऊ केली आहे.
ब्रेन हॅमरेज झाल्यानं अरबाज शेख याच्या वडिलांवर सालोपुरातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. या उपचारांसाठी मोठा खर्च तर आलाच पण त्यामुळं रुग्णालयाकडून होत असलेली मोठी लूट याबाबत त्यानं एक भावनिक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला होता. या व्हिडिओच्या बातम्या आल्यानंतर त्यावर चर्चा सुरु झाली. यानंतर एकनाथ शिंदे यांनी या व्हिडिओची दखल घेत अरबाजला मदतीचा हात पुढे केला.
शिवसेना वैद्यकीय कक्षाचे प्रमुख मंगेश चिवटे यांना याबाबत महत्वाच्या सुचना दिल्या. त्यानंतर चिवटे यांनी सोलापूरात जाऊन अरबाजची भेट घेतली आणि त्याच्या वडिलांच्या प्रकृतीची देखील विचारपूस केली. त्याचबरोबर रुग्णालयाच्या प्रमुख डॉक्टरांशी चर्चा केली त्यानंतर या रुग्णालयानं अरबाजच्या वडिलांच्या उपचारांसाठी पूर्ण मदत करण्याचा निर्णय घेतला.
शिवसेनेकडून देण्यात येणाऱ्या मदतीविषयी बोलताना चिवटे म्हणाले की, "अरबाजच्या वडिलांच्या उपचारांसाठी जो काही खर्च येणार आहे. तो आपण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सहकार्यानं मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून करणार आहोत. महत्वाचं म्हणजे रुग्णालयानं देखील याप्रकरणी सर्वतोपरी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे. तसंच इतरही काही संस्थांच्या मार्फत आपण उपचारांसाठी मदत उपलब्ध करुन देणार आहोत, अशी माहिती यावेळी चिवटे यांनी दिली"
अरबाज शेख यानं काही दिवसांपूर्वी सोलापुरातील नोबेल हॉस्पिटलच्या आवारातून एक व्हिडिओ शूट केला होता. यामध्ये त्याच्या वडिलांना ब्रेन हॅमरेज झाला असून त्यांच्यावर नोबेल हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असल्याचं त्यानं सांगितलं तसंच उपचारांदरम्यान त्यांना हृदविकारांसंबंधी गुंतागुंत निर्माण झाल्याचंही सांगितलं. सुरुवातीला अॅडमिट केल्यानंतर हॉस्पिटलनं त्याला १० हजार रुपये भरायला सांगितले त्यानंतर उपचार सुरु झाल्यानंतर काही गोळ्या आणि इंजेक्शन याच हॉस्पिटलच्या मेडिकल स्टोअरमधून घेण्यास सांगितलं. या औषधांचा खर्च तब्बल ४०,००० रुपये इतका होता. जर ही औषध बाहेरच्या मेडिकलमधून घेतली असतील तर ती जवळपास निम्म्या किंमतीत म्हणजे २०,००० रुपयांमध्ये मिळाली असती असा दावाही अरबाजनं आपल्या व्हिडिओमध्ये केला आहे. त्यामुळं आपल्याला नाईलाजानं वडिलांनी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करावं लागल्याचंही त्यानं सांगितलं.
तसंच आपल्याला आपल्या वडिलांचा जीव वाचवायचा असून जर एखादं हॉस्पिटल इतक्या मनमानी पद्धतीनं कारभार करत असेल तर जाणकार लोकांनी यावर मला मार्गदर्शन करावं असं रडत आवाहन त्यानं या व्हिडिओतून केलं आहे. दरम्यान, अरबाजचा हा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाल्यानंतर सर्वात आधी तुकाराम मुंढे यांनी संबंधित हॉस्पिटलच्या मेडिकल स्टोअरवर कारवाई केली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.