president ramnath kovind
president ramnath kovind sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

राष्ट्रपतींच्या रायगड दौऱ्यासाठी 700 पोलिसांचा बंदोबस्त

सरकारनामा ब्यूरो

महाड : देशाचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद (President Ramnath Kovind) यांच्या उद्याच्या (ता. 6 डिसेंबर) रायगड किल्ला (Raigad Fort) दौऱ्यासाठी सरकारी यंत्रणा सज्ज झाली आहे. त्यासाठी किल्ला परिसरात मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त व इतर सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

राष्ट्रपती कोविंद यांच्या आगमनासाठी रायगडावरील होळीच्या माळावर त्यांचे हेलिकॉप्टर उतरवण्यास शिवप्रेमींनी विरोध केला होता. त्यानंतर हे नियोजन बदलण्यात आले व सार्वजनिक बांधकाम विभागाने पाचाड परिसरात आठ हेलिपॅड तयार केली. तेथून राष्ट्रपती रायगडावर रोप-वेने जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. राष्ट्रपतींच्या दौऱ्यामुळे रायगड परिसरात पर्यटकांना येण्यास बंदी घालण्यात आली आहे.

सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून पोलिस यंत्रणा, राखीव दल, शीघ्र कृती दल तसेच, इतर केंद्रीय सुरक्षा यंत्रणा असे एकूण 700 कर्मचारी तैनात करण्यात आले आहे. रायगड पायथा, पाचाड, हिरकणी वाडी, रोप-वे तसेच, रायगड किल्ल्यावरील महत्त्वाच्या ठिकाणी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. राष्ट्रपतींच्या दौऱ्यासाठी महाड-रायगड मार्ग व माणगाव-पाचाड मार्ग पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. प्रमुख रस्त्यांची देखभाल-दुरुस्ती करण्यात आली.

शिवरायांपुढे होणार नतमस्तक

सोमवारी (ता.6 डिसेंबर) सकाळी 11.45 वाजता राष्ट्रपतींचे रायगडावर आगमन होणार आहे. सर्वप्रथम मेघडंबरी येथील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर राष्ट्रपती शिवरायांच्या समाधीस्थळी नतमस्तक होतील. प्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी रायगडावर राष्ट्रपती व इतर महत्त्वाच्या व्यक्तींसाठी तात्पुरत्या स्वरूपाचे निवासव्यवस्था उभारली आहे. राष्ट्रपती दौऱ्यावेळी रायगड प्राधिकरणचे अध्यक्ष खासदार संभाजीराजे छत्रपती उपस्थित असणार आहेत.

दरम्यान, रायगडावर नगारखान्याच्या बाजूला होळीचा माळ आहे. तिथे शिवाजी महाराजांचा पुतळा आहे. 1996 पर्यंत या पुतळ्याजवळ हेलिपॅड होते. हेलिकॉप्टर उतरण्याच्या वाऱ्याने धूळ महाराजांच्या पुतळ्यावर जायची. यामुळे शिवप्रेमींनी आंदोलन करुन हेलिपॅड काढायला लावले होते. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या दौऱ्यावेळी हेलिपॅड होळीच्या माळावर तयार करण्याचे निश्चित झाले होते. मात्र, शिवप्रेमींनी विरोध केल्यावर हा निर्णय बदलण्यात आला असून राष्ट्रपती आता रोपवेने रायगडावर जाणार असल्याची माहिती संभाजीराजेंनी दिली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT