Kolhapur Politics : गोकुळ दूध संघामध्ये अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी घेतलेल्या बंडखोर भूमिकेनंतर वातावरण तापले आहे. डोंगळे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा देण्यास नकार दिल्यानंतर दूध संघात सत्ताधारी काँग्रेसचे आमदार सतेज पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ यांची आघाडी एकसंघ ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. विद्यमान अध्यक्ष अरुण डोंगळे सोडून सगळे संचालक एकत्र आले असून, हसन मुश्रीफ यांचा मुलगा नावेद मुश्रीफ सतेज पाटील यांच्या पॅनल सोबत आहेत. त्यामुळे डोंगळे यांच्यावर अविश्वास ठराव आणला जाणार का? असा सवाल आता उपस्थित होत आहे.
याबाबत बोलताना माजी अध्यक्ष विश्वास पाटील म्हणाले, अध्यक्षपदाबद्दल सत्ताधारी आघाडीचे नेते देतील तो आदेश मान्य करण्याचा निर्णय संचालक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. विद्यमान अध्यक्षांविरोधात अविश्वास ठराव आणावा लागला तर नेत्यांशी बोलून निर्णय घेणार आहे. गोकुळ शिरगाव येथील मासिक बैठकीला सत्ताधाऱ्यातील सर्वच संचालक एकत्र होते. त्यामुळे आम्ही सर्वजण एकत्र असल्याचा दावाही पाटील यांनी केला. गोकुळमध्ये पक्षीय राजकारण नाही, आम्ही सर्वपक्षीय आहोत, गोकुळमध्ये शाहू आघाडीचे पॅनेल आहे, असेही त्यांनी सांगितले.
गोकुळचे विद्यमान अध्यक्ष अरुण डोंगळे यांचा कार्यकाळ 25 मे रोजी संपत आहे. त्या पार्श्वभूमीवर आज संचालक मंडळाची बैठक बोलावण्यात आली होती. मात्र त्यापूर्वीच आपण राजीनामा देणार नसल्याचे स्पष्ट करून डोंगळे यांनी संचालक मंडळाच्या बैठकीलाही दांडी मारली आहे. मुंबईवरून परतातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसारच आपण राजीनामा देणार नसल्याचे डोंगळे यांनी स्पष्ट केले. ते कोल्हापूर विमानतळावर माध्यमांशी बोलत होते.
डोंगळे म्हणाले, मी माझ्या वैयक्तिक कारणासाठी बैठकीला रजा कळवली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसारच आपण राजीनामा देणार नाही. माझा अध्यक्षपदासाठी आग्रह नाही. मात्र होणारा नवीन अध्यक्ष महायुतीचाच असावा अशी दोन्ही नेत्यांची इच्छा आहे. त्यामुळेच आज राजीनामा देऊ नका अशा सूचना मला सह्याद्री अतिथीगृहावर बोलवून दिल्या आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.