Solapur, 19 April : विधान परिषदेच्या नऊ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. त्यात सोलापूर जिल्ह्यातील रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या एका जागेचा समावेश आहे, त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातून विधान परिषदेसाठी कोणाला संधी मिळणार, याची प्रचंड उत्सुकता आहे. माजी आमदार प्रशांत परिचारक यांना भाजपश्रेष्ठींकडून देण्यात आलेल्या आमदारकीच्या शब्दाबाबत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मोठे विधान केले आहे. सोलापूर जिल्ह्यातून एकजण विधान परिषदेवर जावा, अशी माझी इच्छा आहे, असे गोरे यांनी म्हटले आहे.
विधान परिषदेतील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल मिटकरी, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, तर भाजपचे रणजितसिंह मोहिते-पाटील, संजय केणेकर, संदीप जोशी, दादाराव केचे, राजेश राठोड या नऊ सदस्यांचा येत्या १३ मे रोजी मुदत संपत आहे. त्या पार्श्वभूमीवर गोरे बोलत होते.
दरम्यान, माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी पंढरपूर-मंगळवेढ्यातून उमेदवारी अर्ज भरू नये, यासाठी तत्कालीन प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पंढरपुरात येऊन मनधरणी केली होती. त्यावेळी त्यांनी परिचारक हे लवकरच विधीमंडळात दिसतील, असे म्हटले होते. त्यामुळे परिचारकांच्या उमेदवारीचा विषय पुढे येत आहे.
पालकमंत्री गोरे म्हणाले, विधान परिषदेच्या नऊ जागा रिक्त होणार आहेत. या नऊ जागांपैकी भारतीय जनता पक्षाच्या वाट्याला येणाऱ्या जागांबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेत असतात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि कोअर कमिटी तसेच आमची केंद्रीय कमिटी आहे, असे सर्वजण मिळून निर्णय घेत असतात. सोलापूर जिल्ह्याला विधान परिषदेत प्रतिनिधीत्व मिळावं, अशी पालकमंत्री म्हणून माझीही भावना आहे. पण शेवटी निर्णय हा पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर होत असतो.
माजी आमदार प्रशांत परिचारक, राम सातपुते यांना पक्षाकडून कमिटमेंट होती, तसा काही रिपोर्ट तुम्ही पक्षाला देणार आहात का? यावर गोरे म्हणाले, कुणी कोणाला कमिटमेंट दिली होती, याची मला कल्पना नाही. पण पालकमंत्री म्हणून सोलापूर जिल्ह्यातील एक आमदार विधान परिषदेवर जावा, अशी माझी मनापासूनची भावना असेल. तो कोण असावा, यासंदर्भातील विषय नाही.
सोलापूर जिल्ह्याला प्रतिनिधीत्व मिळावं, अशी माझी भावना असेल पण निर्णय घेण्याचा अधिकार मला नाही. तो अधिकार कोअर कमिटी, दिल्लीतील आमच्या वरिष्ठ नेत्यांना आहे. त्याबाबत ते निर्णय घेतील आणि तसे खाली निर्णय घेतील, असेही गोरे यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.