Ashok chavan
Ashok chavan Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

कोल्हापुरात अशोक चव्हाणांनी घेतली नागेश पाटलांची भेट; २ वर्षांपूर्वीचा शब्द आठवणीने पाळला

सरकारनामा ब्युरो

कोल्हापूर : राजकीय नेते दिलेले आश्वासन, शब्द पाळत नाहीत असे कायम म्हटले जाते. मात्र कोल्हापुरमध्ये (Kolhapur) काल दि. ९ (शनिवार) घडलेल्या एका प्रसंगात राज्याचे मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी तब्बल २ वर्षांनंतर देखील दिलेला शब्द पाळला आहे. अशोक चव्हाण काल कोल्हापूर उत्तर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या उमेदवार जयश्री जाधव (Iayshree Jadhav) यांच्या प्रचारासाठी कोल्हापुरमध्ये आले होते. यावेळी २०२० मध्ये त्यांनी दिलेल्या शब्दांनुसार नागेश पाटील आणि त्यांच्या ४ वर्षांच्या लेकीची आवर्जून भेट घेतली.

पण हे नागेश पाटील नेमके आहेत तरी कोण?

६ जानेवारी २०२० रोजी सोशल मीडियावर एक व्हिडीओ अशोक चव्हाण यांच्या पाहण्यात आला. या व्हिडीओमध्ये मूळचे कोल्हापुरचे असलेले नागेश पाटील (Nagesh Patilआपल्या नव्या गाडीच्या बॉनेटवर आपली दोन वर्षांची लेक निहारिका हिची कुंकवात भिजलेली पावले उमटवून त्या गाडीची पूजा करत होते. लेकीची पावले म्हणजे लक्ष्मीची पावले मानणारा आणि बाप-लेकीच्या नात्याचा ओलावा अनोख्या पद्धतीने दर्शवणारा पाटील कुटुंबियांचा तो व्हिडीओ अशोक चव्हाण यांना भावला. इतकेच नाही तर या बापलेकीला भेटायला मला आवडेल, असे म्हणतं अशोक चव्हाण यांनी हा व्हिडीओ फेसबुकवर शेअर केला. पाटील यांच्या या व्हिडीओला तब्बल २८ मिलियन म्हणजे २ कोटी ८० लाख व्हुव्ज मिळाले आहेत.

आपला व्हिडीओ मंत्री अशोक चव्हाण यांनी सोशल मीडियावर पोस्ट केल्याची बातमी नागेश पाटील यांच्यापर्यंत पोहोचली. तसेच भेटायला आवडेल असेही लिहील्याने नागेश पाटील यांनी त्या रात्री एका मित्राच्या मदतीने अशोक चव्हाण यांच्या ट्विटर हॅंडलवर मॅसेज करून आपला फोन नंबर पाठवला. दुसऱ्या दिवशी सकाळी अशोक चव्हाण सार्वजनिक बांधकाम मंत्री म्हणून मंत्रालयातील नव्या दालनातून कामकाजाला सुरूवात करणार होते. यावेळी मंत्रालयात आल्यावर आपल्या कार्यालयातून पहिला फोन त्यांनी नागेश पाटील यांनाच केला आणि मुलीवरील त्यांच्या प्रेमाचं आणि तिच्या पदचिन्हांनी गाडीची पूजा करण्याच्या अभिनव कल्पनेचं कौतुक केलं. सोबतच "मी जेव्हा-केव्हा कोल्हापूरला येईल, तेव्हा तुम्हाला आणि तुमच्या मुलीला भेटायला नक्की येईल", असा शब्दही अशोक चव्हाण यांनी त्या संभाषणाच्या वेळी दिला.

त्यानंतर तब्बल २ वर्षांनी म्हणजे ८ एप्रिल २०२२ रोजी अशोक चव्हाण प्रथमच कोल्हापूरला आले. त्यावेळी त्यांनी दिलेला शब्द पाळून नागेश पाटील यांना सहकुटुंब भेटीचे निमंत्रण दिले. सुमारे २० मिनिटांच्या या भेटीत अशोक चव्हाण यांनी पाटील कुटुंबाची विचारपूस केली. तसेच आता ४ वर्षांच्या निहारिकाला कडेवर घेत तिच्याशी संवाद साधला. नागेश पाटील हे सध्या वाहन चालक असून, नोकरीनिमित्त ते पुण्यात आहेत. तर त्यांचे वडील चांदोली धरणावर चौकीदार म्हणून काम करतात. या हृदयस्पर्शी भेटीनंतर अशोक चव्हाण आणि पाटील कुटुंब दोहोंच्याही चेहऱ्यावर आनंद झळकत होता.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT