Satej Patil, Rajesh Kshirsagar  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Assembly Election Results 2023 : चार राज्यांच्या निकालानंतर कोल्हापुरातील नेत्यांनी लढवला वेगळाच तर्क

Assembly Elections Results Kolhapur Politician Reaction : विधानसभा निवडणुकांच्या निकालावरून कोल्हापुरातील राजकारण तापले...

Rahul Gadkar

Assembly Elections Results 2023 in Marathi : रविवारी चार राज्यांतील निवडणुकांचा निकाल जाहीर झाला. सर्वांनी दिलेला एक्झिट पोल खोटा ठरवत भाजपने तीन राज्यांत मुसंडी मारली. लोकसभेची सेमीफायनल जिंकून फायनलला दबदबा तयार केला. भाजपने मिळविलेल्या यशानंतर हर हर मोदीचा नारा अनेकांनी दिला. त्यात कोल्हापुरातील सर्वपक्षीय नेत्यांनी मोदींचा करिष्मा मान्य करून लोकसभेचा अंदाज व्यक्त केला आहे.

मध्य प्रदेशात सत्ता राखतानाच राजस्थान, छत्तीसगडमध्ये भाजपने सत्तांतर घडवत काँग्रेसचा पराभव केला. तेलंगणात मागील वेळी एक जागा होती तिथे यंदा आठ जागा मिळवल्या. भाजपचे वाढते प्रस्थ पाहता कोल्हापुरात भाजपच्या नेत्यांनी आनंदोत्सव साजरा केला, तर या निकालाबाबत, विधानसभेवरून लोकसभेचा अंदाज बांधता येत नाही. महाराष्ट्रातील प्रलंबित निवडणुका घ्या, अशी मागणी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी केली.

चारही राज्यांत काँग्रेसचे वातावरण चांगले होते. देशातही काँग्रेसला चांगले वातावरण आहे, पण हा निकाल अनपेक्षित आहे. महाराष्ट्रात धुमाकूळ घालण्याचा प्रयत्न करणाऱ्या बीआरएसला तेलंगणात रोखण्याचे काम काँग्रेसने केले आहे, अशी प्रतिक्रिया आमदार सतेज पाटील यांनी दिली. तीन राज्यांतील निकालावरून देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचाच करिष्मा असल्याचे दिसून आले आहे. भाजप हाच देशाचा विकास करू शकतो, याची जनतेला खात्री झाली आहे. त्यामुळेच भाजपची विजयी घाेडदौड कायम असल्याचे राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले.

तीन राज्यांतील भाजपचा विजय म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरील विश्‍वास व हिंदुत्वाचा विजय आहे. यापुढे होणाऱ्या सर्वच निवडणुकीत पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्‍वाखालील एनडीएचाच विजय होईल, असा विश्वास राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी व्यक्त केला.

विधानसभा निवडणुका स्थानिक प्रश्‍नावर होतात. राजस्थानात सत्तांतराची परंपरा आहे. तेलंगणात काँग्रेसने बाजी मारली आहे. याचा परिणाम लोकसभेवर होईल, असे नाही. पण इंडिया आघाडीला याचा गांभीर्याने विचार करून रणनीती ठरवावी लागेल, असे मत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांनी व्यक्त केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

केंद्र सरकार व पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्या लोकाभिमुख कारभाराचे प्रतिबिंब या निवडणुकीत दिसले. जे विश्‍वासार्ह वातावरण भाजपने तयार केले आहे, ते लोकांच्या पसंतीला पडल्याचे दिसते. भविष्यातील निवडणुकीत भाजपच विजयी होईल, असे मत भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राहुल देसाई यांनी व्यक्त केले.

मध्य प्रदेशातील निवडणूक निकाल धक्कादायक, पण विजयी भाजपचे अभिनंदन. राजस्थानमध्ये दर पाच वर्षांनी सत्ता बदलतेच. दक्षिणमध्ये मात्र भाजपचा सुपडासाफ झाला आहे. याचा अर्थ देशात सर्व आलबेल आहे असे नाही. तसे असेल तर मग महाराष्ट्रातील सर्व निवडणुका भाजपने घ्याव्यात आणि जनतेचा कौल बघावा, असे आव्हान ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांनी दिले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT