Prakash Abitkar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Assembly Winter Session : माझं गावच मला नावं ठेवायला लागलंय; प्रकाश आबिटकर विधानसभेत असं का म्हणाले?

Vijaykumar Dudhale

Nagpur News : माझ्या राधानगरी मतदारसंघातील माझ्या स्वतःच्या गावातील एसटी स्टॅंड मी खूप आत्मयतेने बांधले. पण, दुर्दैवाने आमचं गावच मला नावं ठेवायला लागलंय. कारण, नव्याने बांधलेल्या एसटी स्टॅंडपेक्षा जुनं बरं होतं, असं म्हणायची पाळी आली आहे, अशा शब्दांत राधानगरीचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी एसटी स्टॅंड कामाबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित केले. (Prakash Abitkar's complaint in Assembly regarding ST stand in Radhanagari Constituency)

विधानसभेत आज राज्यातील एसटी स्टॅंडच्या मुद्यावर चर्चा झाली आहे. तसेच, एसटी बसस्थानकाच्या बीओटी तत्वावरही आमदारांनी आपली मते मांडली. त्यात चर्चेत बोलताना आमदार प्रकाश आबिटकर यांनी आपल्या राधानगरी विधानसभा मतदारसंघातील एसटी बसस्थानकाचा मुद्दा उपस्थित केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आमदार आबिटकर म्हणाले की, राज्यात नवीन एसटी स्टॅंड बांधण्यासाठी आणि सध्याच्या स्टॅंडच्या दुरुस्तीसाठी सरकारने चांगले पैसे दिले आहेत. त्या पैशाचा योग्य विनियोग व्हावा, अशी अपेक्षा असते. पण, सध्या ज्या पद्धतीने हे कामकाज सुरू आहे, त्याची चौकशी करण्याची आवश्यकता आहे.

माझ्या मतदारसंघातील माझ्या गावातील चाळीस वर्षांपूर्वी बांधलेल्या एसटी स्टॅंडसाठी मी खूप मेहनत करून दीड कोटी रुपये मंजूर करून घेतले. पण, दुर्दैवाने पहिलं एसटी स्टॅंडच बरं हेातं, आताचं नको, असे म्हणायची पाळी आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील क्वॉलिटी कंट्रोल विभाग काय करतोय. अधिकारी आणि अभियंता यांच्यात लागेबांधे असल्यामुळे अनेक कामांबाबतच्या तक्रारी आहेत, असा आरोपही प्रकाश आबिटकर यांनी केला.

कोल्हापूर विभागातील एसटी स्टॅंडच्या बांधकामाची आणि दुरुस्तीची जी काही कामे आहेत, त्या कामांबाबत क्वॉलिटी कंट्रोल विभागाचे गंभीर आक्षेप आहेत. त्याबाबत चौकशी करून दोष असणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित करण्याबाबत सरकार निर्णय घेणार का. तसेच, चुकीच्या काम करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाईची भूमिका घेऊन कोल्हापुरातील एसटीच्या कामाबाबत एक महिन्यात निर्णय घ्याला का, असा सवाल आमदार प्रकाश आबिटकर यांनी केला.

आमदार प्रकाश आबिटकर यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला परिवहन मंत्री दादा भुसे यांनी उत्तर दिले. ते म्हणाले की, कोल्हापूर जिल्ह्यातील कामांची तांत्रिक पद्धतीने चौकशी करण्यात येईल. तसेच, यामध्ये अधिकारी दोषी असेल तर त्याच्यावर निश्चितपणे कठोर कारवाई केली जाईल.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT