Hasan mushrif
Hasan mushrif Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

अध्यक्षपदाच्या राजकारणातून हसन मुश्रीफांचाच ‘कार्यक्रम’ करण्याचा डाव!

सरकारनामा ब्यूरो

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत (kdcc bank) राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ कमी करून बँकेचे अध्यक्ष आणि ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ (hasan mushrif) यांनाच शह देण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा आहे. त्यातूनच पतसंस्था व प्रक्रिया गटातील सत्तारूढ गटाच्या उमेदवारांच्या पराभवाचे राजकारण शिजल्याचे सांगितले जात आहे. यात दोन्ही काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांचाच हात असल्याचीही चर्चा आहे. (Attempt to reduce Hasan Mushrif's dominance in Kolhapur District Bank elections)

दरम्यान, मुश्रीफ यांचे जिल्हा बँकेच्या राजकारणातील उत्तराधिकारी भैया माने यांना मानले जाते. त्यांच्या विरोधातील नवख्या उमेदवाराला पडलेली मते व त्यांचेही घटलेले मताधिक्य पाहता या जागेवरही धक्का देण्याचा प्रयत्न याच राजकारणातून झाल्याचे दिसते.

कोल्हापूर जिल्हा बॅंकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे पर्यायाने मुश्रीफ यांना मानणारे आठ संचालक निवडून आले आहेत. शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने यांच्या मातोश्री माजी खासदार निवेदिता माने याही सत्तारूढ गटातून निवडून आलेल्या आहेत. त्यांनी सत्तारूढला पाठिंबा दिला; तर ही संख्या नऊवर जाते. प्रक्रिया व पतसंस्था गटातील तीन जागा विजयी झाल्या असत्या, तर ‘राष्ट्रवादी’चे १२ संचालक झाले असते. त्यातून मुश्रीफ यांचेच बँकेवर निर्विवाद वर्चस्व बँकेवर राहिले असते, तसे होऊ नये म्हणूनच या दोन गटातील उमेदवारांसह मुश्रीफ यांचाही काटा काढल्याचे पुढे आले आहे.

भुदरगडसह राधानगरी, करवीर व शिरोळमध्ये त्या-त्या तालुक्यातील सत्तारूढ नेत्यांकडेच प्रक्रिया गटात मतांची मोठी संख्या होती. पण, या गटातील सत्तारूढच्या उमेदवारांना मिळालेली मते पाहता नेत्यांनीच हा ‘कार्यक्रम’ केला की काय? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. कागलमध्ये उमेदवारनिहाय पडलेली मते पाहता सत्तारूढ गटाची १०-१२ मते फुटली आहेत. शहरात सत्तारूढ गटाच्या उमेदवारांना मिळालेल्या तीन आणि पाच मतांमुळे कोणी दगा दिला, याचीही चर्चा सुरू आहे.

पतसंस्था गटात तर शहरासह करवीर तालुक्यात सत्तारूढमधूनच विरोधी मतांसाठी फोन केल्याचे काही पुरावेही नेत्यांना मिळाले आहेत. शहरातील या गटाची यंत्रणा तर ‘वाड्या’वरून हलली आहे. काही माजी नगरसेवक मतदान केंद्राबाहेर थांबून या ‘जोडण्या’ लावत होते. हातकणंगले वगळता इतर तालुक्यात या गटातील सत्तारूढ गटाचे उमेदवार आमदार प्रकाश आवाडे यांना पडलेली मते पाहता त्यांनाही मदत झाली नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

मुख्यमंत्री कार्यालयातून फोन; तर उपमुख्यमंत्र्यांचा आदेश

दोन गटांतील सर्व तालुक्यांतील मते एकत्रित करून मोजली तर आपले बिंग फुटणार नाही; म्हणून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना एकत्रित मतमोजणीसाठी थेट मुख्यमंत्री कार्यालयातूनही फोन करायला लावल्याचे समजते. याची माहिती मिळताच ‘राष्ट्रवादी’ने थेट उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकरवी ही मोजणी एकत्रित न करता स्वतंत्र करण्याचे आदेश दिल्याचे बोलले जाते.

पराभवाचे विश्‍लेषण सुरू आहे

प्रक्रिया व पतसंस्था गटातील पराभवाचे विश्‍लेषण आमच्या पातळीवर सुरू आहे. भय्या माने यांना मते कमी का पडली, याचाही अभ्यास सुरू आहे. यात कोणतीही नुरा कुस्ती नव्हती. तसे असते तर मी तालुकानिहाय स्वतंत्र मते मोजण्याचा आग्रह धरला नसता. एकत्रित मते मोजली तर संशयाला वाव नव्हता, पण विनाकारण एखाद्यावर चुकीचे आरोप झाले असते, अशी प्रतिक्रिया ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

आम्ही आघाडी म्हणूनच मते दिली

सत्तारूढमधून प्रक्रिया संस्था गटात बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर यांच्याऐवजी दिलेला उमेदवार खासदार संजय मंडलिक यांच्या सूचनेनुसार दिल्याची माहिती आली आहे. आसुर्लेकर पॅनेलमध्ये असतील तर मला गृहीत धरू नका, स्वतंत्र पॅनेल करण्याची परवानगी द्या, हे मी सहा महिन्यांपूर्वी सांगितले होते. एकदा उमेदवार ठरल्यावर सर्वांनी प्रामाणिक राहणे आवश्‍यक होते. याच आघाडीतील व गटातील उमेदवारांना शाहूवाडी, पन्हाळा, हातकणंगलेतून मते देताना यातील काही उमेदवार विरोधात असताना ते कोणाचे आहेत, म्हणून नव्हे तर आघाडीचे आहेत म्हणून मते दिली आहेत, अशी प्रतिक्रिया आमदार डॉ. विनय कोरे यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT