लोणावळा : नगरपरिषदेची निवडणूक जवळ आल्याने लोणावळ्याचे राजकारणही आता तापू लागले आहे. नगरपरिषदेची मुदत सोमवारी (ता. १० जानेवारी) संपत असल्याने नगरसेवकांना निरोप देण्यासाठी ऑफलाइन सभेसह विशेष सभा आयोजित केली होती. मात्र, कोरोनाचे कारण देऊन प्रशासनाने ही सभा रद्द केली. त्यानंतर काँग्रेसचे (congress) शहराध्यक्ष प्रमोद गायकवाड यांनी आपले नगरसेवक, शिवसेना व अपक्ष तसेच भाजपमधील नाराज नगरसेवकांसह राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके (sunil shelke) यांची भेट घेतली. या सर्वांनी नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्यावर मनमानीचा आरोप करत हल्लाबोल केला. त्यामुळे लोणावळ्यात महाविकास आघाडीची चर्चा रंगू लागली आहे. (Congress Lonavla city president Pramod Gaikwad meet to Sunil Shelke)
भाजपबरोबर सत्ताधारी गटात असलेल्या काँग्रेसच्या सदस्यांनी बहिष्कार टाकल्याने चार जानेवारीला नगर परिषदेने बोलावलेली विशेष सभा गणपूर्तीअभावी तहकूब करण्यात आली होती. खंडाळ्यातील जागेचे भूसंपादन व एका जागेवरील नेचर रिझर्व्हचे रहिवास झोनमध्ये बदल करणे, या विषयपत्रिकेतील विषयांमुळे नाराज काँग्रेसच्या सदस्यांमुळे सभा तहकूब करावी लागल्याचे सांगितले जात आहे. त्यातच नगर परिषदेची मुदत संपत असल्याने नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी सदस्यांना निरोप देण्यासाठी सोमवारी (ता. १० जानेवारी) सर्वसाधारणसह विशेष सभेचे आयोजन केले होते. पण, कोरोना नियमांचे कारण देत मुख्याधिकाऱ्यांनी ही सभा ऑनलाइन पद्धतीने घ्यावी, अशा सूचना केली होती. पण, ऑनलाइन सभेवर काँग्रेससह इतर सदस्यांनी बहिष्कार टाकण्याची भूमिका घेतली. या शह-कटशहाच्या राजकारणातच दोन्ही सभा रद्द झाल्या. त्यातून भाजप आणि काँग्रेसचा गेली पाच वर्षे थाटलेला संसार मोडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
दरम्यान, नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी मुख्याधिकारी सोमनाथ जाधव यांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली. मुख्याधिकाऱ्यांनी सदस्यांना वेळीच कल्पना न देता सभा रद्द करण्याचा निर्णय योग्य नाही. हा निर्णय घेताना मुख्याधिकाऱ्यांनी सदस्यांना विश्वासात घेणे आवश्यक होते. विषय पत्रिकेवरील सर्वच विषय नगरसेवकांच्या फायद्याचे नव्हते, असेही त्यांनी स्पष्ट केले.
भाजपच्या सुरेखा जाधव यांनी पाच वर्षांपूर्वी थेट जनतेतून निवडून येत काँग्रेसमध्ये प्रवेश करत लोणावळा नगरपरिषदेची सत्ता चालवली होती. मात्र, पाच वर्षांत त्यांच्यावर काँग्रेसह शिवसेना आणि भाजपमधीलही काही नगरसेवकांनी नाराजी व्यक्त केली. काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रमोद गायकवाड आणि आमदार शेळके यांच्या भेटीत ती पुन्हा दिसून आली. गायकवाड यांच्यासह सर्वपक्षीय नगरसेवकांनी नगराध्यक्षा जाधव यांच्यावर मनमानी कारभाराचा आरोप केला. तसेच शहराच्या विकासात सर्वांचा हातभार असल्याचे सांगितले. त्यामुळे लोणावळ्यात पुन्हा महाआघाडीची चर्चा रंगू लागली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.