Solapur, 30 March : करमाळा तालुक्याच्या राजकारणात एक मोठी घडामोड घडली असून तब्बल 20 वर्षे ताब्यात असलेल्या श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतून सत्ताधारी असलेल्या बागल गटाने माघार घेतली आहे, त्यामुळे आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीत आता आमदार नारायण पाटील, माजी आमदार जयवंतराव जगताप आणि संजय शिंदे यांच्या गट उरला आहे. मात्र, बागल गटाची माघार कोणाच्या पथ्यावर पडणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतून (Adinath Sugar Factory election) माघार घेण्याच्या निर्णयाची माहिती बागल गटाचे मार्गदर्शक विलास घुमरे यांनी दिली. ते म्हणाले बागल गटाला राजकीयदृष्ट्या अडचणीत आणण्यासाठी आतापर्यंत सातत्याने श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्याला लक्ष्य करण्यात आले आहे. तो प्रकार पुन्हा होऊ नये, यासाठी आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय बागल गटाने घेतला आहे.
आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीसाठी बागल गटाच्या (Bagal Group) वतीने ज्यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे, ते सर्व इच्छूक आपला उमेदवारी अर्ज दोन दिवसात माघारी घेतील, असेही घुमरे यांनी स्पष्ट केले.
बागल यांच्या संपर्क कार्यालयात शनिवारी (ता. 29 मार्च) सायंकाळी श्री आदिनाथ कारखान्याच्या निवडणुकीसाठी बागल गटाच्या वतीने ज्यांनी आपले फॉर्म भरले आहेत, त्यांची विचार विनिमय बैठक झाली. त्या बैठकीत आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीतून माघार घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
या बैठकीसाठी मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष दिग्विजय बागल हेही यावेळी उपस्थित होते. या बैठकीत बाजार समितीचे माजी सभापती शिवाजीराव बंडगर, आदिनाथ कारखान्याचे अध्यक्ष धनंजय डोंगरे, चिंतामणी जगताप, कल्याणराव सरडे, रणजीत शिंदे, अंगद पाटील, केरू गव्हाणे, ॲड नानासाहेब शिंदे यांनी आपली मते मांडली.
या बैठकीत आदिनाथ सहकारी साखर काखान्याच्या निवडणुकीसंदर्भात निर्णय घेण्याचे अधिकार एकमुखाने भाजप महिला प्रदेश उपाध्यक्षा तथा साखर संघाच्या संचालिका रश्मी बागल आणि मार्गदर्शक विलास घुमरे यांना देण्यात आले. रश्मी बागल आणि विलास घुमरे जो निर्णय घेतील, तो सर्वांनी मान्य करावा, असे आवाहन दिग्विजय बागल यांनी केले.
करमाळा तालुक्यातील बागल गटाच्या राजकारणाला अडचणीत आणण्यासाठी आतापर्यंत आदिनाथ सहकरी साखर कारखान्याला लक्ष्य करण्यात आले. हा प्रकार पुन्हा होऊ नये म्हणून बागल गटाने आदिनाथ साखर कारखान्याच्या निवडणुकीतून माघार घेण्याचा निरअ्णय घेतला आहे. आम्ही केवळ निवडणुकीतून माघार घेतली आहे, आदिनाथ कारखाना व्यवस्थित चालण्यासाठी आमचे सहकार्य कायम सत्ताधाऱ्यांना असणार आहे, असेही बागलट गटाच्या वतीने सांगण्यात आले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.