MNS Bala Nandgaonkar
MNS Bala Nandgaonkar Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

बाळा नांदगावकर म्हणाले, पक्ष शिस्त व विश्वासार्हतेत तडजोड नाही...

अमित आवारी

अहमदनगर - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या ( MNS ) स्थापनेला 16 वर्षे पूर्ण होऊनही पक्षाच्या यशाचा आलेख उतरता होऊ लागला आहे. त्यामुळे पक्षाचे नेते माजी मंत्री बाळा नांदगावकर ( Bala Nandgaonkar ) यांनी राज्यातील विविध ठिकाणी पक्षाचे मेळावे घेऊन पक्ष संघटना मजबूत करण्याच्या हालचालींना वेग आणला आहे. त्यानुसार आज अहमदनगर येथे बाळा नांदगावकर यांच्या अध्यक्षतेखाली अहमदनगर जिल्हा कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. ( Bala Nandgaonkar said, there is no compromise in party discipline and credibility ... )

या प्रसंगी त्यांनी जिल्ह्यातील मनसेच्या परिस्थितीवर तीव्र नाराजी व्यक्त करत तीनही जिल्हाध्यक्षांना जिल्ह्यातील मनसेची स्थिती सुधारण्यासाठी तीन महिन्यांचे अल्टिमेटम दिले. या मेळाव्याला मनसेचे जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, देवीदास खेडकर, बाबा शिंदे, शहर प्रमुख गजेंद्र राशीनकर, राजेश घुटे, सुमीत वर्मा, परेश पुरोहित, निती भुतारे आदी उपस्थित होते.

बाळा नांदगावकर म्हणाले, या पूर्वी मी ज्या पक्षात काम करत होतो त्या पक्षात मी अहमदनगर जिल्हा संघटन मजबूत करण्याचे काम केले. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्याशी माझे जुने रुणानुबंध आहेत. नगर विषयी भावना वेगळी आहे. नगर जिल्हा मागत असताना मी दोन जिल्हाध्यक्ष निवडले यात एक होते बाबूशेट टायरवाल व दुसरे होते शिवाजीराव धुमाळ. मी जिल्ह्यात 1200 पेक्षाही जास्त शाखा तयार केल्या होत्या. ते ही जिल्ह्यातील प्रस्थापितासमोर. जिल्ह्यात हिंदू मुस्लिम दंगलीही व्हायच्या. जुन्यांना बरोबर घेऊन चालत असताना नव्यांना बाजूला सारून चालत नाही.

ते पुढे म्हणाले की, संघर्ष केल्याशिवाय कुठलेही संघटन कधीच उभे राहत नाही. कुठल्याही संघटनेचा आत्मा आंदोलन असते. ते आंदोलन करणारे कार्यकर्ते हे पक्षाची खरी ताकद असतात. मी 10 ते 15 दिवसांपूर्वी अहमदनगर मधील जिल्हाध्यक्षांना बोलावून सांगितले की मला इथे पक्षाचे काहीही दिसत नाही. तुम्ही काही तरी करा नाही तर घरी बसा. उगाच खुर्च्या कशाला अडवता. चर्चा झाली त्यात ठरलं की या जिल्हाध्यक्षांना पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी मेळावा घ्यायला सांगितले. मला पहायचे होते कार्यकर्ते आहेत की नाहीत. की दुर्बिण लावून कार्यकर्ते शोधावे लागतील. मात्र मेळाव्यात दिसतेय कार्यकर्ते आहेत. तुम्हाला पक्ष मोठ करायचे असेल तर संघटन वाढवायला हवे.

आपण 16 वर्षांत काय केले. तुम्ही कोरोना काळात जे काम केले त्या बद्दल अभिनंदन. मात्र पक्ष संघटन उभे राहत नाही. कारण तुम्ही एकमेकांच्या हातात हात घालून काम करत नाहीत. एकमेकांचा दुस्वास करतात. तुम्हाला इतरांना पदावरून काढण्याचे अधिकार दिले कुणी? तो अधिकार फक्त राज ठाकरेंना आहे. एखादा कार्यकर्ता योग्य वागला नाही तर त्याची तक्रार करू शकता मात्र पक्षातून काढू शकत नाही. तुम्ही पक्ष शिस्त पाळली पाहिजे आणि लोकांचा विश्वास गमवायला नको. पक्ष शिस्त व विश्वासार्हतेत तडजोड नाही. तुम्ही दुसऱ्याला मान देणार नसाल तर तुमचा लोक सन्मान करणार नाहीत. तीन महिन्यात पक्षात सुधारणा करा अथवा पद सोडा, असे नांदगावकर यांनी मनसेच्या तीनही जिल्हाध्यक्षांना स्पष्ट केले.

महिलांची अनुपस्थिती खटकली

या मेळाव्यात केवळ दोन महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या यावर नांदगावकरांनी उपस्थित मनसे कार्यकर्त्यांना सुनावले की, महिलांना संधी द्या. संघटन उभे करा. राज ठाकरेंचे भाषण महिला सर्व कामे बाजूला ठेऊन ऐकतात. महिला व ज्येष्ठ नागरिकांपर्यंत पोहचा. राजीव गांधी पंतप्रधान होते त्यावेळी भाजपचे केवळ दोन खासदार होते. आता त्यांची संख्या 303 झाली आहे. पक्षाच्या परिस्थित बदल होत असतात. नवीन पिढीची विचार करण्याची पद्धत वेगळी आहे. त्यांच्या प्रमाणे आपल्याला बदलायला हवे, असे मत नांदगावकरांनी व्यक्त केले.

या नेत्यांच्या झाल्या भेटी

पुण्याला मी एका कार्यकर्त्याबरोबर हॉटेलात गेलो. ते हॉटेल भानुदास कोतकर यांचे होते. त्यांची भेट झाली. आता ते राजकारणापासून दूर आहेत. चांगली गोष्ट आहे. त्यावेळी आमची जुन्या गोष्टींवरून चर्चा झाली. मी त्यांना म्हणालो, तुम्ही केडगावमध्ये पक्षाची शाखा काढून देत नव्हता. त्यावेळी केवढ्या मारामाऱ्या कराव्या लागल्या आम्हाला. मात्र आम्ही शाखा उघडायची सोडली नाही. आज सकाळी मी शनिशिंगणापूरला शनिदेवाचे दर्शन घेण्यासाठी गेलो. त्यानंतर राज्यातील मंत्री शंकरराव गडाख यांच्या घरी गेलो. त्यांना भेटलो त्यांनाही सांगितल सोनईत माझा शरद काळे नावाचा कार्यकर्ता होता. तुम्ही सोनईत शाखा उघडू देत नव्हता. त्यानंतर खासदार डॉ. सुजय विखे पाटील व जिल्हा पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांचीही भेट घेतल्याचे नांदगावकर यांनी सांगितले.

जिल्हाध्यक्षांना दिली या तालुक्यांची जबाबदारी

सचिन डफळ - नगर शहर, नगर तालुका, श्रीगोंदे, पारनेर व राहुरी

देवीदास खेडकर - कर्जत, जामखेड, पाथर्डी व शेवगाव

बाबा शिंदे - नेवासा, श्रीरामपूर, संगमनेर

राजेश घुटे - अकोले, राहाता, कोपरगाव

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT