Bandatatya Karadkar 
पश्चिम महाराष्ट्र

मी क्षमा मागतो! अडचणीत येताच बंडातात्या माफी मागून झाले मोकळे!

कीर्तनकार बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) हे वादग्रस्त वक्तव्य करुन अडचणीत आले आहे.

सरकारनामा ब्युरो

सातारा : कीर्तनकार बंडातात्या कराडकर (Bandatatya Karadkar) हे वादग्रस्त वक्तव्य करुन अडचणीत आले आहेत. राजकारण्यांची मुले दारू पितात, असे विधान त्यांनी केले होते. याचे पुरावे मागितल्यास तेही देऊ, असे जाहीर आव्हानही त्यांनी दिले होते. अखेर हे प्रकरण अंगाशी येताच बंडातात्यांनी सपशेल माघार घेतली आहे. त्यांनी आता माफी मागून या प्रकरणातून अंग काढून घेतले आहे. दरम्यान, सातारा पोलिसांनी (Satara Police) बंडातात्यांना ताब्यात घेतले असून, त्यांना लवकरच अटक केली जाणार आहे.

राज्य सरकारने सुपर मार्केटमध्ये वाईन (Wine) विक्रीला परवानगी देण्याचा निर्णय घेतल्यानंतर विविध स्तरातून टीका केली जात आहे. विरोधी पक्ष असलेल्या भाजपसह काही सामाजिक कार्यकर्त्यांनीही या निर्णयावरून सरकारवर टीकेची झोड उठवली. कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनीही साताऱ्यात 'दंडवत दंडुका' या आंदोलनाद्वारे सरकारच्या वाईन विक्रीबाबतच्या निर्णयाचा विरोध केला. त्यावेळी त्यांनी राजकीय नेत्यांवर गंभीर स्वरुपाचे आरोप केले होते.

बंडातात्यांनी आज या प्रकरणी जाहीर माफी मागितली आहे. ते म्हणाले की, मी काही व्यक्तींची नावे घेतली होती. त्यांच्याबद्दल माझ्या मनात आकस नाही तसेच, मी त्यांचा द्वेषही करत नाही. राजकीय हेतूने मी आरोप केले नाहीत. मी आरोप केले त्यांचीच नव्हे तर इतर लोकांचीही माफी मागत आहे. माझे विधान अनावधानाने झाले आहे. त्याबद्दल मी क्षमा मागतो. पोलीस त्यांचे कर्तव्य पार पाडतील. आदेशप्रमाणे ते मला ताब्यात घेतील आणि आम्ही अटक करून घेऊ.

राज्य सरकारचा वाईन विक्रीचा निर्णय चुकीचा आहे. या मतावर मी ठाम आहे, असे सांगून बंडातात्या म्हणाले की, राजकीय नेत्यांच्या बोलण्यामागे राजकीय हेतू असतो. माझा तसा राजकीय हेतू नाही. अजित पवार यांच्याबद्दल मला आदर आहे. मी फक्त वाईनच्या निर्णयावर म्हण म्हटली होती. ढवळ्याशेजारी पवळा बांधला, असे मी म्हटले होते. राजकीय नेत्यांची माफी मागितल्याने माझे अध्यात्मिक आणि नैतिक वजन वाढले. माझ्या 70 वर्षाच्या जीवनात माझा कधीच वाकडा पाय पडला नाही.

दरम्यान, बेकायदा आंदोलन केल्याप्रकरणी बंडातात्या यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना या प्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे. बेकायदा आंदोलन करणे, कोविडचे नियम न पाळता आंदोलन करणे यासह इतर नियमांचा भंग केल्याप्रकरणी बंडातात्या कराडकर यांच्यासह इतर कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. चिथावणीखोर भाषण केल्याचीही नोंद तक्रारीत करण्यात आली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT