Banda Tatya karadkar Controversy News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

बंडातात्यांना शांत करण्यासाठी विलासराव देशमुखांनी लंडनमधून सूत्र हलवली होती...

Bandatatya Karadkar controversy : वादात सापडण्याची बंडातात्यांची ही पहिलीच वेळ नाही...

सरकारनामा ब्युरो

पुणे : बंडातात्या कराडकर. मागच्या दोन दिवसांपासून सर्वपक्षीय कार्यकर्ते आणि सरकारच्या निशाण्यावर सापडलेले व्यक्तिमत्व. सरकारचे वाईन विक्रीचे धोरण म्हणजे "ढवळ्याशेजारी बांधला पवळ्या" असे आहे, असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्यावर सडकून टीका केली. यावेळी त्यांची जीभ घसरली आणि त्यांनी भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) आणि राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्याबद्दल अक्षेपार्ह आणि खालच्या पातळीवरील वक्तव्य केली. (Bandatatya Karadkar controversy News)

बंडातात्यांचा (Bandatatya Karadkar) हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून त्यांच्यावर टीकेची झोड उठत आहे. त्यांच्या या विधानामुळे वाद वाढत गेल्यावर त्यांनी माफी मागून विषय थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांच्याविरुद्ध प्रशासनाने कारवाईला सुरुवात केली. महिला आयोग आता त्यांना नोटिस पाठवणार आहे. याशिवाय सातारा पोलिसांनी देखील त्यांना ताब्यात घेतले आहे. त्यांना लवकरच अटक केली जाणार आहे. मात्र बंडातात्या कराडकर वादात सापडण्याचे किंवा चर्चेच येण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्यांनी यापूर्वी 'मविआ' सरकारवर तर टीका केली आहेच मात्र त्याही आधी त्यांनी २ मुख्यमंत्र्यांशी थेट पंगा घेतला होता. (Bandatatya karadkar News)

कोण आहेत नेमके बंडातात्या कराडकर?

बंडातात्यांना महाराष्ट्रातील ज्येष्ठ कीर्तनकार आणि प्रबोधनकार म्हणून ओळखले जाते. वारकरी संप्रदायात बंडातात्यांना ओळखत नाही असा माणूस शोधून सापडणे देखील कठिण. ७२ वर्षीय बंडातात्या मूळचे सातारा जिल्ह्यातील कराडमधील शुक्रवार पेठेतील रविवासी. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात कराडच्या मारूती बुवा कराडकर मठाची १२ नंबरची दिंडी असते. ही दिंडी बंडातात्या कराडकरांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असते. महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाव्यतिरिक्त कराड आणि सातारा भागात बंडातात्यांना मानणारा एक मोठा युवक वर्ग आहे. (Who is Bandatatya karadkar)

सातारा जिल्ह्यात बंडातात्यांची अनेक समाजोपयीगी कामं सुरु असतात. यात बंडातात्यांनी १९९६ मध्ये व्यसनमुक्त युवक संघाची स्थापना केली आहे. व्यसनाच्या आहारी गेलेल्या तरुणांना व्यसनमुक्त करण्यासाठी ही संस्था काम करते. त्याशिवाय तरुणांना आपला इतिहास माहित व्हावा म्हणून १९९७ पासून ते गडकोटांवर प्रतापी संस्कार सोहळ्याचे आयोजन करतात. बंडातात्यांनी महाराष्ट्रात पहिली वारकरी शिक्षण देणारी शाळाही सुरु केली आहे. सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील पिंपरद या गावातील या शाळेतून गुरुकूल पद्धतीने शिक्षण दिलं जातं.

महाविकास आघाडी सरकारवर टीका

मात्र दुसऱ्या बाजूला बंडातात्या कराडकर सातत्याने वेगवेगळ्या कारणांनी चर्चेत असतात. अलिकडीलच काही गोष्टी बघितल्या तर लॉकडाऊन काळात महाराष्ट्र सरकारने मंदिरं खुली न केल्यामुळे बंडातात्यांनी सरकारवर टीका केली होती. एक पत्र लिहून त्यांनी सरकारचा निषेध म्हणून यंदा दिवाळी साजरी करू नका, असे आवाहन केले होते. त्यानंतर गत वर्षी पंढरपूरच्या पायी वारीला राज्य सरकारने परवानगी नाकारली होती. तेव्हा बंडातात्यांनी या निर्णयावरून सरकारवर टीका केली होती. तसेच निर्णयाचा निषेध म्हणून स्वतः चालत पायी वारीसाठी पंढरपूरकडे रवाना झाले होते. त्यावेळी पिंपरी चिंचवड पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते.

दोन मुख्यमंत्र्यांशी पंगा.

२००८ साली देहू येथील भामचंद्र गडाजवळील डाऊ या परदेशी कंपनीविरोधात बंडातात्या कराडकर यांच्या नेतृत्वाखाली वारकरी संघ आणि व्यसनमुक्त युवक संघाने राज्यभर तीव्र आंदोलन केले होते. तुकारामांच्या भूमीचे पावित्र्य नष्ट करणारा हा प्रकल्प असल्याची भूमिका त्यांनी घेतली होती. त्यावेळा या कंपनीची संरक्षक भिंत पाडून तिथले ट्रक आणि साहित्य पेटवून देण्यात आले होते. याशिवाय कराडजवळ पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर टाळ-मृंदगाच्या जयघोषात रास्ता-रोको आंदोलन करत वाहतूक ठप्प पाडली होती.

या प्रकरणात बंडातात्यांना कॉंग्रेस-राष्ट्रवादी सरकारने तुरुंगात घातले होते. मात्र परिस्थिती चिघळलेली पाहून मुख्यमंत्री असलेल्या विलासराव देशमुख यांनी लंडन येथून कंपनी डाऊ कंपनीचे काम थांबवण्याची घोषणा केली होती. त्यानंतर २०१२-२०१३ साली महाराष्ट्रात गोहत्या बंदी कायद्यासाठी त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांना अडवले होते. इतकेच नाही तर गोहत्या बंदी कायदा महाराष्ट्रात लागू करण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांची शासकीय महापूजाही रोखण्याचा इशारा दिला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT