Baramati residents meet MP Sunetra Pawar at her residence, urging her to take responsibility for Baramati’s leadership and continue the development vision of late Ajit Pawar. Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Sunetra Pawar News: सुनेत्रा पवार यांनी पालकत्व स्विकारण्याची बारामतीकरांची मागणी

Baramati Leadership Demand : अजित पवार यांच्या निधनानंतर बारामतीकरांनी सुनेत्रा पवार यांनी नेतृत्व स्वीकारून विकासाची धुरा सांभाळावी, अशी भावना व्यक्त करत दादांचे स्वप्न पूर्ण करण्याची मागणी केली.

मिलिंद संगई :सरकारनामा

Baramati News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर आता बारामतीच्या सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने खासदार सुनेत्रा पवार यांनी ही जबाबदारी स्विकारावी अशी अनेक बारामतीकरांची भावना आहे. सांत्वनासाठी आलेल्या अनेक महिलांसह नागरिकांनीही दादांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही तुमचे दुःख बाजूला सारुन आता बारामतीचे पालकत्व स्विकारा, अशी मागणी सुनेत्रा पवारांकडे केली.

बारामतीतील सहयोग सोसायटीतील निवासस्थानी आज असंख्य बारामतीकरांनी सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार यांची भेट घेत त्यांचे सांत्वन केले. या प्रसंगी डॉ. रजनी इंदुलकर सुनंदा पवार, शुभांगी पवार उपस्थित होत्या.

दादा गेल्याचे दुःख आभाळाइतके आहे, त्यांची पोकळी कधीच भरुन न येणारी आहे, असे असले तरी आता दुःखातून सावरुन बारामतीचे पालकत्व तुम्ही स्विकारा, या शहराच्या सर्वांगिण विकासासाठी दादांनी जे स्वप्न पाहिले होते ते साकारण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्या, अशी भावना व्यक्त केली गेली.

दादा हे कामाचा माणूस म्हणून जनमानसात प्रसिध्द होते. त्यांनी हाती घेतलेले प्रकल्प पूर्ण करण्यासह या शहराच्या शिस्तबध्द विकासासाठी तुम्ही पुढे यावे अशी मागणी काही महिलांनी केली. अजित पवार सत्तेत असताना राज्य स्तरीय कामे हक्काने मुंबईत जाऊन बारामतीकर करुन घेत असत. त्या मुळे विकासाची प्रक्रीया पुढे न्यायची असेल तर बारामतीच्या लोकप्रतिनिधीने सत्तेत राहणे आवश्यक आहे, अशी व्यापारी वर्ग तसेच बांधकाम व्यावसायिकांचीही भूमिका आहे.

दरम्यान बारामतीचे नगराध्यक्ष सचिन सातव यांनीही दादा गेल्याचे दुःख आभाळाइतके आहे, मात्र तरिही या पुढील काळात अजितदादांची जागा सुनेत्रावहिनींनी घ्यावी व त्यांची राहिलेली कामे वेगाने पूर्ण करण्यासाठी पुढे यायला हवे, अशी अपेक्षा व्यक्त केली.

बारामती इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट असोसिएशनचे अध्यक्ष धनंजय जामदार यांनीही देशातील सर्वात सुंदर शहर करण्याचे जे स्वप्न अजित पवार यांनी पाहिले होते, ते पूर्ण करण्यासाठी आता सक्रीय होत बारामतीचे पालकत्व स्विकारावे, अशी भूमिका मांडली.

सुनेत्रावहिनी पवार (Sunetra Pawar) यांनी अनेक दशके अजितदादा यांचे राजकारण, समाजकारण जवळून पहिले आहे. त्यासाठी त्यांनी त्यागही केला आहे. त्यांनी तालुक्याची जबाबदारी घ्यावी अशी विनंती आम्ही केली आहेच शिवाय राज्याची जबाबदारी पेलण्यास त्या सक्षम आहेत, जसे अजितदादा यांच्या पाठीशी आम्ही उभे होतो तसाच भक्कम पाठिंबा त्यांनाही देऊ, असे मत सोमेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी मांडले.

अजित पवार यांचे समाजकारण व राजकारण सुनेत्रावहिनींनी गेल्या अनेक वर्षात जवळून पाहिले आहे, त्या मुळे दादांच्या पश्चात त्यांनी नेतृत्व स्विकारुन बारामती व राज्याच्या विकासाला गती दयावी, असे क्रेडाई महाराष्ट्रचे अध्यक्ष प्रफुल्ल तावरे म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT