सोलापूर : बार्शीचा हर्षद मेहता (Harshad Mehta) अशी ओळख असलेल्या विशाल फटे (Vishal Phate) याच्या गैरव्यवहाराने राज्यभरात खळबळ उडाली आहे. तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. या प्रकरणी विशाल फटेच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली असून, त्याने शेअर बाजारात (share Market) पैसेच गुंतवलेच नाहीत. आता त्याने या पैशांचे नेमके काय केले, याचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे.
विशाल फटे हा शेअर बाजाराच्या माध्यमातून जादा परताव्याचे आमिष दाखवत होता. तो गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी रुपये गोळा करीत होता. मात्र, हे पैसे तो शेअर बाजारात गुंतवत नव्हता. खुद्द फटेनेच पोलीस कोठडीदरम्यान त्याच्या झालेल्या चौकशीत ही माहिती उघड केली आहे. यामुळे त्याने एवढ्या गुंतवणूकदारांकडून जमा केलेल्या पैशाचे केले काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यामुळे आर्थिक गुन्हे शाखेने फटेने पैशाची विल्हेवाट कशी लावली याचा माग काढण्यास सुरवात केली आहे.
विशाल फटे याने केलेल्या धक्कादायक खुलाशामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. फटे हा गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा करीत होता. नंतर एकाकडील पैसे तो दुसऱ्याकडे फिरवत होता. अशी त्याची कार्यपद्धती सुरू होती. सुरवातीला त्याचे व्यवस्थित सुरू होते. नंतर गुंतवणूकदार आणि त्यांचे पैसे वाढले. त्याला पैसे देण्यास अडचण आल्यानंतर तो फरार झाला होता. आता त्याने कुठे आणि कसे पैसे घालवले याचा शोध आर्थिक गुन्हे शाखा घेत आहे. (Vishal Phate News Updates)
दरम्यान, विशाल फटे याने बार्शीतीलच (Barshi Scam) नव्हे तर राज्यभरातील हजारो लोकांना गंडा घातल्याची चर्चा आहे. फटेविरोधात तक्रारींचा ओघ सुरूच आहे. त्यामुळे या प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत आहे. या प्रकरणी फिर्यादी दीपक आंबुरे यांच्या फिर्यादीवरुन मुख्य सूत्रधार विशाल फटे याच्यासह पत्नी राधिका फटे, वडील अंबादास फटे, भाऊ वैभव फटे व अलका फटे (सर्वजण रा. कर्मवीर हौसिंग सोसायटी, अलिपूर रोड, बार्शी) यांच्याविरुध्द 14 जानेवारीला गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी वडील व भावाला अटक केल्यानंतर विशाल फटे पोलिसांना शरण आला होता. त्यानंतर न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली होती. आता तो न्यायालयीन कोठडीत आहे. (Vishal Phate did not invest in stock market)
विशाल फटे याने बार्शीसह राज्यभरात अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचे समोर येत आहे. फटे विरोधातील तक्रारींचा ओघ सुरूच आहे. आतापर्यंत 99 जणांनी तक्रार दिलेली आहे. यामुळे फसवणुकीचा आकडाही वाढून 20 कोटी रुपयांवर पोचला आहे. फटेने फसवणूक केल्याप्रकरणी पुढे आलेले बहुतांश गुंतवणूकदार हे बार्शीतील आहेत. तसेच, उस्मानाबाद आणि पुण्यातील काही जणांचाही समावेश आहे. आर्थिक गुन्हे शाखा या तक्रारदारांच्या कागदपत्रांची तपासणी करुन फसवणुकीची आकडा निश्चित करीत आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.