Vishal Phate Scam News Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

'बार्शी स्कॅम' प्रकरणात मोठी घडामोड : फटे पिता-पुत्रांची न्यायालयात धाव

बार्शीचा हर्षद मेहता (Harshad Mehta) अशी ओळख असलेल्या विशाल फटे (Vishal Phate) याच्या गैरव्यवहाराने राज्यभरात खळबळ उडाली आहे.

सरकारनामा ब्युरो

सोलापूर : बार्शीचा हर्षद मेहता (Harshad Mehta) अशी ओळख असलेल्या विशाल फटे (Vishal Phate) याच्या गैरव्यवहाराने राज्यभरात खळबळ उडाली आहे. शेअर बाजारात (share Market) मोठा परतावा मिळवून देण्याच्या नावाखाली झालेल्या या बार्शी गैरव्यवहार प्रकरणात मोठी घडामोड घडली आहे. न्यायालयीन कोठडीत असलेल्या अंबादास फटे आणि वैभव फटे यांनी आता न्यायालयात धाव घेतली आहे. या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचा दावा या दोघांनी केला असून, जामिनासाठी सत्र न्यायालयात अर्ज केला आहे. हे दोघेही पिता-पुत्र 20 जानेवारीपासून न्यायालयीन कोठडीत आहेत.

अंबादास फटे आणि त्यांचा पुत्र वैभव यांची पाच दिवसांची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली होती. या प्रकरणात मुख्य आरोपी विशाल फटे आहे. असे असले तरी त्याच्या विशालका कन्सल्टंट सर्व्हिसेस कंपनीत अंबादास फटे हे संचालक आहेत. या प्रकरणाशी काहीही संबंध नसल्याचा दावा अंबादास आणि वैभव हे करीत आहेत. परंतु, विशालकडून त्यांच्यासोबतही पैशाचे व्यवहार झाले आहेत. या प्रकरणात विशालची आई आणि पत्नी याही आरोपी आहेत. त्यांना अद्याप अटक झालेली नाही.

विशाल फटे हा सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. या प्रकरणी विशाल फटेच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली असून, त्याने शेअर बाजारात पैसे गुंतवलेच नाहीत. आता त्याने या पैशांचे नेमके काय केले, याचा शोध पोलिसांनी सुरु केला आहे. विशाल फटे हा शेअर बाजाराच्या माध्यमातून जादा परताव्याचे आमिष दाखवत होता. तो गुंतवणूकदारांकडून कोट्यवधी रुपये गोळा करीत होता. मात्र, हे पैसे तो शेअर बाजारात गुंतवत नव्हता. खुद्द फटेनेच पोलीस कोठडीदरम्यान त्याच्या झालेल्या चौकशीत ही माहिती उघड केली आहे. यामुळे त्याने एवढ्या गुंतवणूकदारांकडून जमा केलेल्या पैशाचे केले काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यामुळे आर्थिक गुन्हे शाखेने फटेने पैशाची विल्हेवाट कशी लावली याचा माग काढण्यास सुरवात केली आहे. (Barshi Scam News)

विशाल फटे याने केलेल्या धक्कादायक खुलाशामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. फटे हा गुंतवणूकदारांकडून पैसे गोळा करीत होता. नंतर एकाकडील पैसे तो दुसऱ्याकडे फिरवत होता. अशी त्याची कार्यपद्धती सुरू होती. सुरवातीला त्याचे व्यवस्थित सुरू होते. नंतर गुंतवणूकदार आणि त्यांचे पैसे वाढले. त्याला पैसे देण्यास अडचण आल्यानंतर तो फरार झाला होता. आता त्याने कुठे आणि कसे पैसे घालवले याचा शोध आर्थिक गुन्हे शाखा घेत आहे. (Vishal Phate News Updates)

विशाल फटे याने बार्शीसह राज्यभरात अनेक गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचे समोर येत आहे. फटे विरोधातील तक्रारींचा ओघ सुरूच आहे. आतापर्यंत 106 जणांनी तक्रार दिलेली आहे. यामुळे फसवणुकीचा आकडाही वाढून 20 कोटी रुपयांवर पोचला आहे. फटेने फसवणूक केल्याप्रकरणी पुढे आलेले बहुतांश गुंतवणूकदार हे बार्शीतील आहेत. तसेच, उस्मानाबाद आणि पुण्यातील काही जणांचाही समावेश आहे. आर्थिक गुन्हे शाखा या तक्रारदारांच्या कागदपत्रांची तपासणी करुन फसवणुकीची आकडा निश्चित करीत आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT