JeevanDutt Argade
JeevanDutt Argade  Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

काँग्रेसच्या माजी शहराध्यक्षास चोळी-काकणांचा आहेर; दिव्यांग महिलेस टाकली अश्लिल पोस्ट

प्रशांत काळे

बार्शी (जि. सोलापूर) : महिला दिनी दिव्यांग महिलेला सोशल मीडियावर लज्जास्पद पोस्ट टाकून भावना दुखावणे, मानहानी केल्याप्रकरणी काँग्रेसचे (congress) माजी बार्शी शहराध्यक्ष ॲड. जीवनदत्त आरगडे याच्यावर बार्शी आणि मुंबई येथे ॲट्रोसिटी व विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. आरगडे याला पोलिस बार्शीतून सोलापूर येथे घेऊन जात होते. त्यावेळी बार्शी बसस्थानक चौकात महिला, तृतियपंथियांनी राडा करत त्याला चोळी-बांगडीचा आहेर देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे सुमारे अर्धा तास वाहतूक ठप्प झाली होती. (Barshi's Former Congress city president JeevanDutt Argade charged with molestation & atrocity)

याबाबतची हकीकत अशी की, काँग्रेस पक्षाचे तत्कालिन बार्शी शहर अध्यक्ष ॲड .जीवनदत्त आरगडे यांनी नुकत्याच झालेल्या महिला दिनी दिव्यांग महिलेस सोशल मिडियावर लज्जास्पद पोस्ट टाकून तिच्या भावना दुखावल्या होत्या. याबाबत बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.  त्यानंतर महिला मंडळ मुंबईत महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांना भेटण्यासाठी गेल्या होत्या. तेथेही ॲड. आरगडे महिलांना दिसला होता, त्यावेळी त्याने अपशब्द वापरले होते. त्यामुळे चिडलेल्या महिलांनी मरिन ड्राईव्ह पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

मुंबई पोलिसांनी ॲड. आरगडे यास अटक करुन त्याची ऑर्थर रोड तुरुंगात रवानगी केली होती. दरम्यान, बार्शी पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करण्यासाठी मुंबई येथून गुरुवारी रात्री आरगडे याला बार्शी येथे आणले होते. रात्री उशिरापर्यंत तपास करुन त्याचा मोबाईल पंचनामा करुन जप्त करण्यात आला आहे.

शुक्रवारी (ता.१८ मार्च) सकाळी आरगडे यास सोलापूर येथील विशेष दिव्यांग न्यायालयात उभे करण्यासाठी पोलिस वाहनातून घेऊन जात असताना पोलिसांचे वाहन बसस्थानक चौकात आले. त्यावेळी रणरागिणींनी तसेच तृतियपंथियांनी पोलिसांचे वाहन अडवले. या संशयितास चोळी व बांगडी देण्याचा प्रयत्न केला. या वेळी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती, तर वाहतूक ठप्प झाली होती. अखेर पोलिस बंदोबस्त बोलावून स्थिती आटोक्‍यात आणली. बार्शीचे सहायक पोलिस निरीक्षक ज्ञानेश्वर उदार तपास करीत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT