Bhagirath Bhalke Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Bhagirath Bhalke News : भगिरथ भालकेंचं ठरलं; 'बीआरएस' प्रवेशाबाबत रविवारी घेणार निर्णय

BRS And Bhagirath Bhalke : मंगळवेढ्यानंतर भालके करणार पंढरपुरातील कार्यकर्त्यांशी संवाद

हुकूम मुलाणी

Bhagirath Bhalke Decision On Political Career : पंढरपूरमधील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भगिरथ भालके यांनी काही दिवसांपूर्वी तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांची भेट घेतली. त्यावेळी भालके 'बीआरएस'मध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. भालके यांनी मात्र कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यानंतर शनिवारी (ता. २४) भालके यांनी मंगळवेढा येथील कार्यकर्त्यांशी संवाद साधला. यानंतर ते रविवारी (ता. २५) पंढरपूर येथील कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. त्यानंतर रविवारी ते आपल्या निर्णय जाहीर करणार असल्याची माहिती आहे.

मंगळवेढा येथे भालके यांनी भविष्यातील राजकीय वाटचालीबाबत विचार विनिमय बैठकीचे आयोजन करण्यात आली होती. यावेळी भालके यांनी त्यांच्यावर होणारे विधानसभेसाठी 'बीआरएस'मध्ये जाणार असल्याचे आरोप फेटाळून लावले. तसेच स्थानिक स्वारज्य संस्थांच्या निवडणुका लढवूनच पुढील निर्णय घेणार असल्याचे सूचक वक्तव्य भालके यांनी यावेळी केले.

भगिरथ भालके म्हणाले की, "येणारी विधानसभा निवडणूक समोर ठेवून मी पक्ष बदला निर्णय घेत नाही. त्यापूर्वी ग्रामपंचायत, नगरपालिका, पंचायत समिती, जिल्हा परिषद निवडणुका होणार आहेत. त्या पूर्ण ताकतीने लढवणार आहे. त्यानंतरच विधानसभेला सामोरे जाणार आहे. स्व. भारतनानाच्या जाण्याने कुटुंबाचं व मतदासंघाचे छत्र हरपले होते. अशा परिस्थितीत राजकीय पोरकेपणा दूर करण्यासाठी राजकीय सावली धरायची सोडून पक्षाने वेगळी दिशा दाखवण्याचे काम केले. त्यामुळेच स्वाभिमान जिवंत ठेवण्यासाठी पक्ष बदलाचा निर्णय तुमच्या बरोबरीने घेत आहे."

यावेळी भालके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर काही आरोप केले. ते म्हणाले, "स्व.नाना कोणत्याही पक्षात असले तरी राष्ट्रवादीच्या नेत्यावर श्रध्दा ठेवली. राष्ट्रवादीच्या नेत्यावर जिल्ह्यात कुणीही विरोधी भूमिका मांडल्यास पहिल्यांदा त्यावर प्रत्युत्तर देण्याचे काम नानांनी केले. पण अडचणीच्या काळात राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्याकडून आधार, आपुलकी आणि प्रेमाची गरज होती. प्रतिकूल परिस्थितीत कारखान्याला मदत मागितली पण ही मंडळी मदत करू शकली नाही. एमएससी बँकेचा प्रमुख सरकारचा ऐकत नाहीत."

संकटकाळात बीआरएसकडून दिलासा मिळाल्याचेही भालके यांनी यावेळी स्पष्ट केले. ते म्हणाले, "तेलंगणचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी माझ्याशी सातत्याने संपर्कात राहून आधार देण्याचे काम केले. माझ्या विनंतीला मान देऊन त्यांनी पंढरपूरला आषाढी वारीला येण्याचे मान्य केले. मग त्यांनी मला पक्षप्रवेशाचे आमंत्रण दिले. मात्र स्व. नानाला मानणाऱ्या जनतेला विचारूनच मी त्याबाबत निर्णय घेणार आहे. राज्यातील कांदा खरेदी करून चांगला दर देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. आता दूध खरेदी करण्याच्या प्रश्नावर देखील विचार करीत आहे."

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT