Bhagirath Bhalke
Bhagirath Bhalke Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

भगिरथ भालकेंनी पत्नीचा अर्ज मागे घेऊन सामान्य कार्यकर्त्याला दिली उमेदवारी!

सरकारनामा ब्यूरो

पंढरपूर : घराणेशाहीचा आरोप होताच भगिरथ भालके (Bhagirath Bhalke) यांच्या पत्नी प्रणिती भालके यांनी विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या (Vitthal Sugar Factory) निवडणुकीसाठी भरलेला उमेदवारी अर्ज आज (ता. २७ जून) मागे घेतला. त्यांच्या जागी सर्वसामान्या कार्यकर्त्याला संधी देण्याचा निर्णय भगिरथ भालके यांनी घेतला आहे. दरम्यान, भगिरथ यांचे बंधू व्यंकट भालके यांचा अर्ज छाननीत बाद झाला होता. (Bhagirath Bhalke's wife Praniti Bhalke's candidature application withdrawn)

पंढरपूर तालुक्यातील सरकोली येथील विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक सुरू आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आज (ता. २७ जून) शेवटचा दिवस होता. त्यामुळे प्रणिती भालके यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला. विठ्ठल सहकारी साखर कारखान्याची निवडणूक तिरंगी होत आहे. भगिरथ भालके आणि कल्याणराव काळे गट, युवराज पाटील आणि गणेश पाटील गट, तसेच उद्योजक अभिजित पाटील यांचा पॅनेल असे तीन गट कारखान्याच्या निवडणुकीत उतरले आहेत.

युवराज पाटील आणि गणेश पाटील यांच्या प्रचारसभांतून भगिरथ भालके यांच्या गटावर घराणेशाहीचा आरोप होत होता. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे एकाच घरातील तीन व्यक्तींना उमेदवारी दिल्याने भालके आणि काळे गटाच्या कार्यकर्त्यांमध्येही दबक्या आवाजात चर्चा सुरू होती. त्यामुळे भगिरथ भालके यांनी आपली पत्नी प्रणिती भालके यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार प्रणिती भालके यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यांच्या जागेवर सामान्य कार्यकर्त्याला संधी देण्याचा निर्णय भालके गटाने घेतला आहे.

दरम्यान भालके गटाचा पॅनेल जाहीर झाला आहे. त्यामध्ये भाळगणी गट- बाळासाहेब विष्णू यलमर, विलास विष्णू देठे, रुक्मिणी बागल, करकंब- दशरथ खळगे, हणमंत पवार, मारुती भिंगारे, मेंढापूर- तानाजी भूसनर, विलास भोसले, तुंगत- महेश कोळेकर, धनाजी घाडगे, सरकोली- भगिरथ भालके, नयना शिंदे, कासेगाव-विजयसिंह देशमुख, गोकुळ जाधव, बाळासाहेब आसबे, संस्था मतदारसंघ- समाधान काळे, अनुसूचित जाती-जमाती-दत्तात्रेय कांबळे, महिला गट-साधना सावंत, वनिता बाबर, इतर मागासवर्गीय- अभिषेक पुरवत, भटक्य जाती-जमाती विशेष मागास प्रवर्ग प्रतिनिधी-बाबासाहेब हाके यांना भालके-काळे गटाने उमेदवारी दिली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT