कागल : आमदार हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी नगरपालिका निवडणुकीत भावजयीचा पराभव करून माणिक माळी यांना नगराध्यक्ष केले. पाच वर्षे पालिकेच्या बिलांवर नगराध्यक्ष म्हणून सह्या करता, प्रोसेडिंग घरात नेऊन ठेवता, मग तुम्ही नामधारी कसे म्हणता? नगराध्यक्ष म्हणून तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) पाच वर्षे सत्ता दिली. तुम्ही प्रथम राजेंना फसवलं, तेथून बाहेर पडून संजय घाटगे यांच्या गटात गेला, त्यानंतर मुश्रीफ गटात आला. आता राहिलेले गटही करा. अशा लोकांना घेऊन विश्वासाची लढाई जिंकता येत नाही, हे भाजपने ध्यानात ठेवावे, असा टोला कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे (KDCC Bank) संचालक भैया माने यांनी लगावला. (Bhaiya Mane's reply to the allegations of Manik Mali & Ramesh Mali who quit NCP)
माजी नगराध्यक्षा माणिक माळी व माजी उपनगराध्यक्ष रमेश माळी यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्या पार्श्वभूमीवर पत्रकार परिषदेत भैया माने बोलत होते. ते म्हणाले की‘‘आमदार मुश्रीफ यांच्या सख्ख्या भावजयीने तिकीट मागितले होते. त्यांना नाकारून माणिक माळी यांना संधी दिली. आमदार मुश्रीफ एकमेव असे नेते असतील की ज्यांनी भावजयीला पराभूत करून कार्यकर्त्याच्या पत्नीला निवडून आणले. भविष्यात अशा गोष्टी पुन्हा होऊ नयेत, यासाठी लोकांनीच त्यांना धडा शिकवण्याची गरज आहे. पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस मोठ्या मतांच्या फरकाने विजयी होईल.’’
प्रकाश गाडेकर म्हणाले, ‘‘भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी काहीतरी कारण हवे; म्हणूनच आज माळी चुकीचा आरोप करत आहेत. कारभारावर लक्ष ठेवण्यासाठी समन्वय समिती असते. जर समन्वय समिती नसती तर माळी यांनी नगरपालिका विकून खाल्ली असती. माळी यांच्या भाजप प्रवेशाने खिंडार पडले नाही. त्यांच्याबरोबर दोन-तीनच लोक दिसले. नगराध्यक्षपदी राहून हीच ताकद तयार केली काय.’’
माजी नगराध्यक्ष अजित कांबळे म्हणाले, ‘‘माळी यांना नगराध्यक्ष केले पाहिजे म्हणून आमदार मुश्रीफ यांच्या डोळ्यातून अश्रू आले होते. मग त्यांनी काढलेले अश्रू खोटे होते का. याचे उत्तर माळी यांनी जनतेला द्यावे.’’
चंद्रकांत गवळी यांनी मनोगत व्यक्त केले. पक्षप्रतोद, नितीन दिंडे, संजय चितारी, अस्लम मुजावर, ॲड. संग्राम गुरव, अशोक जकाते, इरफान मुजावर, संदीप भुरले, गंगाधर शेवडे, नवाज मुश्रीफ, सुनिल कदम, बाबासो नाईक, सुनिल माने, सुनिल माळी आदींसह राष्ट्रवादीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.