Sunil Shinde and Aditya Thackeray Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

भाऊ कोरगावकरांचा पत्ता कट : सुनील शिंदे व बबन घोलपांवर नगर जिल्हा शिवसेनेची जबाबदारी

भाऊ कोरगावकर यांच्याकडून अहमदनगर जिल्ह्यातील शिवसेनेची जबाबदारी काढून घेण्यात आली आहे.

सरकारनामा ब्युरो

अहमदनगर - अहमदनगर जिल्ह्यातील शिवसेनेचे संपर्क प्रमुख भाऊ कोरगावकर यांच्या बाबत युवा सेनेचे अहमदनगर जिल्हा प्रमुख विक्रम राठोड व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी तक्रार केली होती. त्यानुसार भाऊ कोरगावकर यांच्याकडून अहमदनगर जिल्ह्यातील शिवसेनेची जबाबदारी काढून घेण्यात आली आहे. ( Bhau Korgaonkar's Address Conspiracy: Responsibility of Nagar District Shiv Sena on Sunil Shinde and Baban Gholap )

अहमदनगर जिल्ह्यातील शिवसेना संपविण्याचे काम भाऊ कोरगावकर करत असल्याचा आरोप मागील दोन वर्षांपासून सुरू होता. एक वर्षांपूर्वी झालेल्या अहमदनगर महापौर निवडणुकीत भाऊ कोरगावकर यांनी घेतलेल्या भुमिकेमुळे अहमदनगर शहरातील शिवसैनिकांत नाराजी होती. एका शिवसैनिकाने तर कोरगावकरांना धक्काबुक्कीही केली होती.

कोरगावकरांबाबतची नाराजी दिवसा गणित वाढत होती. युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे मागील आठवड्यात शिवसंपर्क अभियाना अंतर्गत अहमदनगर जिल्ह्यात आले होते. ते शिर्डीत आले असताना विक्रम राठोड, माजी महापौर अभिषेक कळमकर, उपशहर प्रमुख गिरीश जाधव, अशोक दहिफळे आदी शिवसैनिकांनी भेट घेतली. त्यांनी भाऊ कोरगावकर हे अहमदनगर जिल्ह्यातील शिवसेना संपविण्यास निघाले असल्याबाबत तक्रार केली होती. या वेळी आदित्य ठाकरे यांनी लवकरच कोरगावकरांबाबत निर्णय घेण्याचे आश्वासन शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले होते. तसेच या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडेही कोरगावकरांबाबत तक्रार केली होती.

त्यानुसार अहमदनगर जिल्ह्याकरिता जिल्हा संपर्कप्रमुखांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. यात कोरगावकरांकडून अहमदनगर जिल्ह्याची जबाबदारी काढून घेण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून शिवसेना सचिव, खासदार विनायक राऊत यांनी पत्रकाद्वारे ही माहिती दिली. जिल्ह्यात एकच संपर्क प्रमुख नेमण्या ऐवजी लोकसभा मतदार संघ निहाय दोन संपर्क प्रमुख नियुक्त करण्यात आले आहेत. यात अहमदनगर दक्षिण जिल्ह्याची जबाबदारी विधानपरिषदेतील आमदार सुनील शिंदे यांच्यावर तर शिर्डी लोकसभा मतदार संघाची जबाबदारी माजी बबनराव घोलप यांच्यावर सोपविण्यात आली आहे.

युती सरकारच्या काळात बबनराव घोलप हे मंत्री होते. त्यांच्यावर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले होते. 2014मध्ये घोलप यांनी शिर्डीतून लोकसभा निवडणूक लढविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र न्यायालयीन तांत्रिक कारणामुळे त्यांना उमेदवारी अर्ज माघारी घ्यावा लागला होता. त्या ऐवजी सदाशिव लोखंडे यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली. लोखंडे हे दोन वेळा शिवसेनेकडून खासदार झाले. काही दिवसांपूर्वी ते शिंदे गटात गेल्याने शिवसैनिकांत मोठी नाराजी आहे. आदित्य ठाकरे हे शिर्डी आले असता त्यांनी घोलप हेच लोकसभेच्या आगामी निवडणुकीतील शिवसेना उमेदवार असतील असे जाहीर केले होते. आदित्य ठाकरे यांच्या शिर्डी दौऱ्याच्या वेळी आमदार सुनील शिंदे उपस्थित होते.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT