Malhunge Nande Road Accidents; NCP MLA Shankar Mandekar sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Roads Accidents Death : पुण्यात खड्ड्यांमुळे चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू: अपघातावर प्रश्न विचारताच NCP आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य

Bhor NCP MLA Shankar Mandekar Statement On Malhunge Nande Road Accidents : भोर वेल्हा मुळशी मतदारसंघाचे आमदार शंकर मांडेकर यांनी रस्ते अपघातावर वादग्रस्त विधान करून नव्या वादाला तोंड फोडले आहे.

Aslam Shanedivan

Pune News : पुणे महापालिका हद्दीतील म्हाळुंगे – नांदे रस्त्यावर खड्ड्यांमुळे रिषभ पाटोळे या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. खड्ड्यांमुळे झालेल्या या भीषण अपघातात रिषभचा ट्रकच्या चाकाखाली चिरडून मृत्यू झाला. या प्रकरणानंतर ट्रक चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. पण या प्रकरणात कोणत्याच प्रशासकीय अधिकाऱ्याला जबाबदार धरण्यात आलेले नाही. यामुळे आता या प्रकरणावरून वाद सुरू झाला असून, चोर सोडून संन्यासाला फाशी देणारा प्रकार सुरू असल्याची टीका परिसरातील नागरिकांकडून होताना दिसत आहे. अशातच भोर वेल्हा मुळशी मतदारसंघाचे आमदार शंकर मांडेकर यांचे वादग्रस्त विधान समोर आले आहे.

महापालिका हद्दीतील म्हाळुंगे – नांदे खराब रस्ते आणि खड्ड्यांमुळे दहा वर्षांच्या चिमुकल्या रिषभ पाटोळेचा वडिलांसमोरच दुर्दैवी मृत्यू झाला. या मृत्यूवरून पत्रकारांनी मांडेकर यांना प्रश्न विचारत, याची जबाबदारी कोण घेणार? असा सवाल केला. यावर मांडेकर यांनी, ‘रस्ते आहेत तर अपघात होणारच’, असे चीड आणणारे वक्तव्य केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता म्हाळुंगे परिसरातील नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. तसेच महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या कारभारावरदेखील रोष व्यक्त केला जात आहे.

पुणे महापालिका हद्दीतील म्हाळुंगे – नांदे रस्त्यावर खड्ड्यांमुळे चाळण झाली असून, येथे सोमवारी (ता. १७) भीषण अपघात झाला. या अपघातात दहा वर्षांच्या चिमुकल्या रिषभ पाटोळेचा ट्रकच्या चाकाखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला होता. ज्यानंतर बावधन पोलिसांकडून या प्रकरणात ट्रक चालकाचा कोणताही थेट संबंध नसताना, त्यांचा कोणताही धक्का लागलेला नसताना गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, घटनेनंतर स्थानिक आमदार शंकर मांडेकर यांनी घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी बेजबाबदार अधिकारी आणि यंत्रणांवर कोणती कारवाई होणार? याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल त्यांना करण्यात आला. त्यांना संतप्त नागरिकांच्या प्रचंड रोषाला सामोरे जावे लागले. यावेळी त्यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना, या प्रकरणात आपण मुख्यमंत्र्यांची भेट घेऊ, असे आश्वासन दिले. तसेच उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचीदेखील भेट घेणार असून, हा रस्ता मार्गी लावण्याचा प्रयत्न करणार असल्याचे आश्वासनदेखील दिले.

पण याचवेळी त्यांनी, ‘रोड आहेत तर अपघात होणार आहे. ज्याची मोठी गाडी आहे, त्याच्यावर गुन्हा दाखल होतो’, असे असंवेदनशील वक्तव्य आमदार मांडेकर यांनी केले आहे. अपघात झाल्यावर गाडी चालकावर गुन्हा दाखल होत असतो. आता असे होऊ नये, पण काय करणार? तुम्ही आज मला प्रश्न विचारताय, मी गेली दोन वर्षे सभागृहात आवाज उठवत आहे. माझ्या उपस्थितीचे कार्ड दाखवू का? असेही आमदार मांडेकर पत्रकारांना म्हणाले. शेवटी, ‘गव्हर्मेंट आहे, मी तरी काय करणार त्याला’, असे म्हणत त्यांनी एकप्रकारे हात वर केल्याने संताप व्यक्त होत आहे.

तसेच ज्या रस्त्यावर हा अपघात झाला, त्या रस्त्यावर दुहेरी वाहतूक सुरू आहे. तर त्याच्या बाजूच्या रस्त्याचे अजूनही अधिग्रहण झाले नसल्याने त्या ठिकाणी रस्ता पूर्ण होऊ शकला नाही. मी स्वतः जवळपास तीन कोटी रुपये खर्च करून या रस्त्याची कित्येकदा डागडुजी केली आहे. पूर्वी हा रस्ता पीएमआरडीएकडे होता. मात्र, आता तो पीसीएमसीकडे गेला आहे. त्यामुळे रस्ता बनवण्यासाठी निधीची तरतूद कोणी करायची, यावरून गोंधळ सुरू आहे. यामुळे हा मार्ग रखडला आहे. यावरून आजही उठवत आहे. तसेच रस्त्यावरील खड्डे बुजवण्याच्या सूचना दिल्या आहेत.

आमदार भडकले

यावेळी पत्रकारांनी आमदारांना योग्य उत्तर देण्याची मागणी करताच आमदार मांडेकर चांगलेच भडकले. त्यांना पत्रकारांना थेट एकेरी बोलत तू पत्रकार असलास तर मी जबाबदार आमदार आहे. सध्या या वादाचीही जोरदार चर्चा होताना दिसत असून त्यांनी प्रशासनाला जबाबदार धरण्यावरून हात झटकल्याचेही आता समोर आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT