Shani Deva Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

शनिदेवाला 500 रुपयांचा तेलाभिषेक म्हणताच 'भूमाता' भडकल्या

अहमदनगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर देवस्थान हे भारत भरात प्रसिद्ध आहे.

सरकारनामा ब्युरो

अहमदनगर - अहमदनगर जिल्ह्यातील शनिशिंगणापूर देवस्थान हे भारत भरात प्रसिद्ध आहे. या ठिकाणी चौथऱ्यावर शनिदेवाची शिलारुपी मूर्ती आहे. या शनिदेवाला तेलाभिषेक करण्यासाठी देवस्थानने काल ( शनिवार ) पासून 500 रुपये शुल्क आकारण्यास सुरवात केली आहे. देवस्थानच्या या निर्णयावर भूमाता ब्रिगेडने आक्षेप घेतला आहे. ( 'Bhumata' erupted when she called Shanideva anointed with oil of Rs.500 )

काही वर्षांपूर्वी याच भूमाता ब्रिगेडने शनी चौथऱ्यावर महिलांना दर्शन मिळावे यासाठी आंदोलन केले होते. या आंदोलनाला ग्रामस्थ व देवस्थानने विरोध केला होता. मात्र अखेर महिलांना या चौथऱ्यावर दर्शन देण्याचा मार्ग मोकळा झाला. याच देवस्थानने आता चौथऱ्यावर जाऊन तेलाभिषेक करण्यासाठी शुल्क आकारण्यास कालपासून सुरवात केली. या निर्णयाबाबत भूमात ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

तृप्ती देसाई म्हणाल्या, शनिशिंगणापूर येथील शनी चौथऱ्यावर पुरूषांप्रमाणेच महिलांनाही प्रवेश मिळावा यासाठी आम्ही आंदोलन केले होते. हे आंदोलन यशस्वी झाले. कोरोना संकटकाळात हे मंदिर बंद ठेवण्यात आले होते. चौथऱ्यावर प्रवेश नव्हता. मात्र आता शनी चौथऱ्यावर महिला व पुरुष दोघांनाही प्रवेश मिळणार आहे. या निर्णयाचे भूमाता ब्रिगेड स्वागत करते मात्र देवस्थानने एक अट घातली आहे की, ज्याला चौथऱ्यावर जायचे त्याला 500 रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे.

त्या पुढे म्हणाल्या, 500 रुपये शुल्क आकारण्याचा देवस्थानच्या विश्वस्तांचा निर्णय चुकीचा आहे. लाखो भाविक दुरून शनिदेवाचे दर्शन घ्यायला येतात. कोणी गरीब असतो, कोणी श्रीमंत असतो. ज्या गरीब भक्ताकडे 500 रुपये नसतील तर ते चौथऱ्यावर दर्शनासाठी पोचू शकणार नाहीत. त्यामुळे हा शुल्क विश्वस्तांना तातडीने रद्द करावा. जर त्यांनी हा शुल्क रद्द केला नाही तर आम्हाला आवाज उठवावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला.

भक्तांवर हिटलरशाही प्रमाणे शुल्क नसावा. तो ऐच्छिक असावा. अनेक भक्त ऐच्छिक देणगी देत असतात. चौथऱ्यावर जाण्यासाठी कोणी ऐच्छिक देणगी देत असेल तर त्याचे स्वागत आहे. सर्वांकडून शुल्क आकारण्याचा ठराव केला असेल तर तो गरीब व श्रीमंत भक्तांत भेदभाव करणारा आहे. गरीब भक्ताला दर्शनापासून दूर ठेवणारा आहे, असे त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT