महेश बारटक्के :
Satara News : जावळी तालुक्याचे नेते व राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांचे बंधू ऋषिकांत शिंदे यांनी आज मुंबईत मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यावर शिवसेनेत प्रवेश केला. या प्रवेशामुळे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं असून आमदार शशिकांत शिंदेंना हा मोठा धक्का मानला जात आहे.
जावळी तालुक्यात आमदार शशिकांत शिंदे यांचे मोठे वर्चस्व असून अलीकडच्या काळात भाजपचे आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी जावळीत आपले वर्चस्व निर्माण केले आहे. मध्यंतरी जावळीतील नेते अमित कदम यांनी भाजपला सोडचिट्टी देत राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यामुळे जावळी तालुक्यात राष्ट्रवादीची ताकद वाढल्याचे बोलले जात होते.
पण आता आमदार शशिकांत शिंदे यांचे बंधू ऋषिकांत शिंदे यांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे जावळीत एकनाथ शिंदे यांची ताकद वाढणार आहे. त्या बरोबरच हा राष्ट्रवादीला मोठा धक्का मानला जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांना यामुळे ताकद मिळण्याची शक्यता आहे.
आगामी काळात भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) निवडणूक एकत्र लढणार आहेत. त्यासाठी हे बेरजेचे राजकारण जिल्ह्यात सुरू असल्याचे बोलले जात आहे.ऋषिकांत शिंदे यांच्या मागे माथाडीची मोठी ताकद आहे. त्यामुळे शिवसेनेला (शिंदे गट) याचा मुंबई आणि सातारा जिल्ह्यात फायदा होणार आहे.
ऋषिकांत शिंदे यांच्या या प्रवेशामुळे राष्ट्रवादीचे आमदार शशिकांत शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे. आता शशिकांत शिंदे काय भूमिका घेतात? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नुकत्याच झालेल्या राष्ट्रवादीच्या मेळाव्यात भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) हे आपले विरोधक आहेत, असं आमदार शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केलं होतं. पण आता त्यांचे बंधूच विरोधकांना मिळाल्याने त्यांची चांगलीच अडचण झाली आहे.
Edited By- Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.