Shikhar Pahariya Sarkarnama
पश्चिम महाराष्ट्र

Shikhar Pahariya : सुशीलकुमार शिंदेंच्या नातवाकडून नरेंद्र मोदींना वाढदिवसाच्या शुभेच्छा; चक्क भाजप कार्यालयाबाहेर उभारले बॅनर

Narendra Modi Birthday Banner : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त उद्योजक शिखर पहारिया यांच्या फाउंडेशनकडून सोलापुरातील भाजप शहर कार्यालयाबाहेर शुभेच्छा बॅनर लावण्यात आले. या बॅनरमुळे राजकीय चर्चांना उधाण आले.

सरकारनामा ब्यूरो

Solapur. 18 September (आप्पासाहेब हाताळे) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांचे नातू, उद्योजक शिखर पहारिया यांच्याकडून बॅनर उभारून शुभेच्छा दिल्या आहेत. विशेष म्हणजे पहारिया यांच्या फाउंडेशनकडून भारतीय जनता पक्षाच्या शहर कार्यालयाबाहेर हे शुभेच्छा बॅनर उभारण्यात आले आहेत, त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. भाजप कार्यालयाबाहेर लावण्यात आलेला हा फलक कार्यकर्त्यांसह या मार्गावरून जाणाऱ्या नागरिकांचेही लक्ष वेधून घेत होता.

सिव्हिल हॉस्पिटलजवळील नाथ प्लाझामध्ये भाजपचे शहर कार्यालय आहे. या कार्यालयाच्या परिसरात पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी (ता. १७ सप्टेंबर) शुभेच्छा देणारा फलक लावण्यात आला आहे. त्यावर शुभेच्छुक म्हणून ‘उद्योजक शिखर पहारिया फाउंडेशन’ असा उल्लेख आहे. ‘विकासाच्या वाटेवर भारत... नेतृत्वाच्या शिखरावर मोदीजी!’ तसेच ‘सेवेपासून संकल्पापर्यंत राष्ट्र प्रथम!’ असा मजकूर या बॅनरवर ठळकपणे देण्यात आला आहे.

शिखर पहारिया फाउंडेशनकडून गेल्या काही वर्षांपासून सोलापूर शहरात विविध सामाजिक उपक्रम राबविण्यात येत आहेत. मात्र, पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त प्रथमच भाजपच्या शहर कार्यालयालगत शुभेच्छा बॅनर लावण्यात आल्याने त्याची विशेष चर्चा रंगली आहे. मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपच्या शहर कार्यालयात गुरुवारी दिवसभर पदाधिकारी व कार्यकर्त्यांची वर्दळ होती. त्याच परिसरात पहारिया यांच्याकडून लावण्यात आलेला शुभेच्छा फलक पाहून अनेक कार्यकर्त्यांकडून आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

उद्योजक शिखर पहारिया यांनी गेल्या वर्षी गणेशोत्सवात सोलापुरात हजेरी लावली होती. त्यांनी काही गणेश मंडळांना भेटी देत आरती केली होती. तसेच, शहरातील अनेक उपक्रमात त्यांच्या फाउंडेशनकडून सहभाग घेतला जातो. अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात, त्यामुळे त्यांच्या राजकीय एन्ट्रीची चर्चा सोलापुरात होत असते, आता तर त्यांनी चक्क पंतप्रधान मोदी यांना भाजप कार्यालयाबाहेर बॅनर उभा करून शुभेच्छा संदेश दिला आहे.

या फलकाने रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांचेही लक्ष वेधून घेतले. शिखर पहारिया हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांचे नातू आहेत, तर त्यांच्या मावशी प्रणिती शिंदे या काँग्रेसच्या खासदार आहेत. या राजकीय पार्श्वभूमीवर भाजप कार्यालयाबाहेर मोदींना दिलेल्या शुभेच्छांमुळे शहरातील राजकीय वर्तुळात विविध चर्चांना सुरुवात झाली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT